Tulajabhavani : तुळजाभवानी मातेच्या दरबारात ‘गोरमाळकर’ जपतात आपली ‘शान’

Categories
cultural social महाराष्ट्र
Spread the love

तुळजाभवानी मातेच्या दरबारात ‘गोरमाळकर’ जपतात आपली ‘शान’

: पुरातन काळापासून मिळतो आहे पालखी प्रदक्षिणेचा ‘मान’

तुळजापूर : एके काळी द्राक्षे आणि त्यानंतर आता सीताफळ या पिकासाठी प्रसिद्ध असलेलं गाव अशी बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावाची ओळख आहे. शिवाय तुळजाभवानी मातेच्या दरबारात विशेष मान असल्याने गोरमाळे ची ओळख सर्वदूर आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मातेच्या पालखीच्या शिडाला खांदा देण्याचा मान गोरमाळे गावातील लोकांना मिळतो. गावातील लोक देखील मिळालेल्या या संधीचे ‘सोनं’ करतात. वर्षानुवर्ष पासून हा ‘मान’ टिकवून गावातील लोकांनी आपली ‘शान’ जपली आहे. खासकरून युवा वर्ग यात खासा सहभाग घेत आपल्या गावाचे नाव ‘रोशन’ करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पंचक्रोशीत गोरमाळे गावाचे कौतुक होताना दिसून येते.

तालुक्यातील दोन गावांना मिळतो मान

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानीमातेच्या पालखी प्रदक्षिणेचा मान बार्शी तालुक्यातील आगळगाव व गोरमाळे गावाला मिळाला आहे. या दोन्ही गावांतील गावकऱ्यांना तुळजाभवानीमातेच्या दरबारात विशेष मान आहे. या दोन गावांना विशेष महत्त्व  आहे. अहमदनगरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या मानाच्या पालखीचे या गावांतील मानकरी उत्साहात स्वागत  करतात. नवरात्र महोत्सवादरम्यान दसऱ्याच्या दिवशी पहाटेच तुळजापूर  येथील तुळजाभवानीमातेच्या मूर्तीची मंदिराभोवती पालखीमधून प्रदक्षिणा घालण्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. या पालखीच्या पुढच्या शिडाला खांदा देण्याचा मान आगळगाव या गावाचा तर मागच्या शिडाला खांदा देण्याचा मान गोरमाळे गावाला मिळतो.

: युवा वर्गाचा खासा सहभाग

गोरमाळे हे गाव दुष्काळी पट्ट्यात असले तरी येथील लोकांनी द्राक्ष पिकांत एके काळी सोलापूर जिल्ह्यात आघाडी घेतली होती. त्यानंतर आता सीताफळ नर्सरी साठी या गावाने प्रसिद्धी मिळवली आहे. गाव अशा आधुनिक पद्धतीने प्रगती करत असताना मात्र गावातील लोक पुराण काळापासून चालत आलेल्या परंपरा मात्र विसरत नाहीत. तुळजाभवानी मातेच्या दरबारात हा मान तसाच टिकून राहण्याचे श्रेय गावाच्या सामूहिक प्रयत्नांना जाते. या सामूहिक प्रयत्नांत गावातील युवा वर्ग हिरीरीने सहभाग घेत असतो. कोरोनामुळे मागील वर्षी नवरात्र उत्सव काहीसा थंडावला होता. यावर्षी मात्र मंदिरे उघडल्यामुळे नवरात्र थाटात साजरा करण्याचे गावातील लोकांनी ठरवले होते. दसऱ्याच्या दिवशी पहाटेच पालखीला खांदा द्यायचा असल्याने गावातील संध्याकाळीच तुळजापूरला पोचतात. यावर्षी त्याची जोशात तयारी केली गेली होती. नवरात्र आणि इतर वेळी देखील तुळजाभवानी मातेचं मंदिर पूर्ण देशाचं लक्ष वेधून घेते. अशा ठिकाणी आपल्या गावाला मान मिळत असतो, या भावनेने गावातील लोक ही आपली शान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्याला साथ मिळते ती युवा वर्गाची. प्रदक्षिणा संपल्यानंतर पालखी मोडण्याचा कार्यक्रम असतो. तो मान दरवर्षी गोरमाळकरच मिळवत असतात. यावर्षी देखील हेच पाहायला मिळाले.

गुलालाने माखलेले शरीर, लालेलाल झालेले कपडे आणि मनात मानाची  पालखी मोडण्याच्या प्रसन्न आठवणी घेऊन गावकरी मंडळी तुळजापुरातील ‘मान’ घेत आणि आपली ‘शान’ जपत पहाटे नंतरच्या ‘शहाण्या सकाळी’ गावात ‘ऐटीत’ प्रवेश करतात. अर्थातच गाव त्यांचं स्वागत करायला तयार असतंच.

Leave a Reply