Sharad Pawar : कुठल्याही नागरिकाला सरकार जर धर्म-जातीच्या नजरेतून पाहणार असेल, तर देश  प्रगती करू शकत नाही  : शरद पवार यांनी लगावला टोला 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

कुठल्याही नागरिकाला सरकार जर धर्म-जातीच्या नजरेतून पाहणार असेल, तर देश  प्रगती करू शकत नाही

: शरद पवार यांनी लगावला टोला

देशातील कुठल्याही नागरिकाला देशातील सरकार जर धर्माच्या जातीच्या नजरेतून पाहणार असेल, तर देश कधीही प्रगती करू शकत नाही. आपल्या भारतात असलेली परिस्थिती अभूतपूर्व अशी आहे. या अगोदर देशातील कुठल्याही सरकारने या पद्धतीने कधीही राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही. असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

शरद पवार यांनी निमंत्रित केलला सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रम काल कोंढव्यातील लोणकर लॉन्स येथे संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर देशातील नामवंत कवी व कलाकारांनी सादर केलेले मुशायरा व कवी संमेलन देखील पार पडले. हिंदू,मुस्लिम,शीख,बौद्ध,ईसाई,पारशी, बोहरी,इराणी या विविध धर्मगुरुंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी बोलतांना पवार म्हणाले की,  भारत आज शिक्षण, उद्योग, व्यापार, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात प्रगती करु शकला. दुर्दैवाने गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये सर्व क्षेत्रात असणारी घौड दौड मागे पडून निव्वळ धार्मिक कट्टरतावादी , सामाजिक तेढ निर्माण करणारे वातावरण निर्मिती सुरू असून, ही बाब आपल्या सर्व धर्म समभाव जपणाऱ्या देशात अशोभनीय आहे.  पवार म्हणाले, “राजकीय कारकीर्दीत मी कधीही कुठलेही पद देताना कुणालाही धर्माच्या अथवा राजकीय नजरेतून पाहिले नाही आणि मुस्लिम बांधवांनी देखील मी जगातील ज्या ज्या देशांमध्ये जाईल त्या त्या देशाने प्रेम आणि आपुलकी दिली हे या धर्माचे वैशिष्ट्य असून आपली एकी हेच आपल्या प्रगतीचे गमक आहे”.
सामाजिक सलोख्याचा विचार जतन करणं, भागा-भागांमध्ये, लोका-लोकांमध्ये, जाती-जातींमध्ये, भाषा-भाषांमध्ये एकप्रकारची एकवाक्यता निर्माण करणं, भाईचारा वाढवणं, संकटाच्या काळामध्ये मदतीला धावून जाणं, जो आपल्यापेक्षा दुबळा असेल त्याला देखील शक्ती देण्यासाठी प्रयत्न करणं या अनेक गोष्टीसाठी आजही विविध धर्मांच्या माध्यमातून सहकार्य मिळते.कोणताही धर्म कधीही कोणाचा द्वेष करा असे सांगत नाही. ईद होऊन गेली आहे. मात्र ईदच्या निमित्तानं, एकवाक्यता तयार करण्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की सामान्य माणसाला संघटित करून, त्याचा आत्मसन्मान वाढवून सामान्य लोकांचं राज्य प्रस्थापित करू.
काही लोक जाती-धर्माच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्हाला भांडणतंटा नको. आम्हाला विकास पाहिजे. आम्हाला महागाईपासून सुटका पाहिजे. आमच्या नव्या पिढीला रोजगार पाहिजे. आपलं राज्य व देश सगळ्या दृष्टीनं प्रगत कसा होईल, अशी स्थिती आम्हाला निर्माण करायची आहे”.

या कार्यक्रमानंतर सर्वधर्मीय बांधवांनी स्नेह भोजनाचा लाभ घेतला तसेच मुशायरा व कवी संमेलनासाठी सुप्रसिद्ध मुशायराकार संपत सरल व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली तसेच मोठ्या संख्येने सर्व धर्मीय नागरिक देखील उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,  आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे ,जयदेवराव गायकवाड, काँग्रेस शहराध्यक्ष.रमेश बागवे , माजी नगरसेविका नंदाताई लोणकर, रत्नप्रभा जगताप,फारुख भाई इनामदार,ॲड.हाजी गफुर पठाण, हाजी फिरोज शेख,हाजी रईस सुंडके,मोहसिन शेख,समीर शेख आदींसह मोठ्या संख्येने सर्वधर्मीय बंधु भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply