Fifa World Cup Final | Argentina Vs France | लिओनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले | ३६ वर्षानंतर अर्जेन्टिना संघाने फिफा वर्ल्ड कप जिंकला

Categories
Breaking News Sport देश/विदेश लाइफस्टाइल
Spread the love

लिओनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले | ३६ वर्षानंतर अर्जेन्टिना संघाने फिफा वर्ल्ड कप जिंकला

लिओनेल मेस्सी (Lionel Messi) ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्ष अथक परिश्रम करत होता अखेर ते आज पूर्ण झाले… वातावरण पहिल्या सेकंदापासून ते रेफरीची अखेरची शीटी वाजेपर्यंत मेस्सीमय राहिले आणि पुढील अनेक वर्ष ते तसेच राहिल याची काळजी मेस्सीने आजच्या खेळातून घेतली.  २०१४ला वर्ल्ड कप विजयाचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेन्टिना (Argentina) संघ मैदानावर उतरला. लिओनेल मेस्सी अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेन्टिना च्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्स (France) कडून तोडीसतोड खेळ झाला अन् कायलिन एमबाप्पे  एकटा भिडला. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली. (Fifa world cup 2022)

फुटबॉलमध्ये अखेरच्या सेंकदातही काही होऊ शकते याची प्रचिती वर्ल्ड कप फायनलमध्ये आली. ८०व्या मिनिटापर्यंत २-० अशा आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला १ मिनिट व ३७ सेकंदात दोन धक्के बसले. कायलिन एमबाप्पेच्या दोन गोलने फ्रान्स च्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले. ८ मिनिटांच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांच्या गोलरक्षकाने एकेक गोल रोखला अन् सामना अतिरिक्त ३० मिनिटांत  गेला. पहिली १५ मिनिटे तोडीसतोड खेळ झाल्यानंतर लिओनेल मेस्सीची जादू पुन्हा चालली अन् त्याने १०८व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून दिला असे वाटत असताना एमबाप्पेने गोल करून सामना १२० मिनिटांच्या खेळात ३-३ असा बरोबरीत सोडवला. (Lionel Messi)

  • अर्जेंटिना सहाव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळतेय आणि जर्मनीने सर्वाधिक ८ वर्ल्ड कप फायनल खेळले आहेत. अर्जेंटिनाने १९७८ व १९८६ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.

अर्जेंटिनाने आज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला. ९व्या मिनिटाला अर्जेंटिनाने कॉर्नर कमावला अन् फ्रान्सच्या बचावपटूंनी चांगलाच कस लागलेला पाहायला मिळाला.  १९व्या मिनिटाला डी पॉलने पेनल्टी बॉक्सबाहेर फाऊल केला अन् फ्रान्सला फ्री किक मिळाला. ऑलिव्हर जिरूडने हवेत गरूड भरारी घेत हेडरद्वारे चेंडूला दिशा दिली, परंतु तो पोस्टच्या वरून गेला. २१व्या मिनिटाला डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. अपेक्षांचे प्रचंड ओझं घेऊन मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने करिष्मा करून दाखवला. सांघिक खेळ कसा करावा याचं उत्तम उदाहरण ३६व्या मिनिटाला अर्जेंटियन खेळाडूंनी दाखवून दिले. मॅक एलिस्टर चेंडू ज्या पद्धतीने घेऊन पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला त्याला रोखण्यासाठी फ्रान्सची फौज उभी राहिली, परंतु त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलेय हे दिसताच चेंडू डी मारियाला दिला अन् अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली. पहिल्या हाफमध्ये फ्रान्स हताश झालेले दिसले. (Argentina Vs France fifa world cup 2022)

दुसऱ्या हाफमध्येही अर्जेंटिनाचा तोच पवित्रा दिसला अन् ४८व्या मिनिटाला त्यांच्याकडून आणखी एक ऑन टार्गेट प्रयत्न झाला. मेस्सीने चेंडूवर ताबा राखताना फ्रान्सच्या बचावपटूंचा छळ करणं सुरूच ठेवलं होतं. फ्रान्सकडून आता धक्काबुक्कीचा खेळ सुरू झाला आणि त्यात अर्जेंटिनाचे खेळाडू जखमी झालेले दिसले. पण, त्यांचा आज निर्धार पक्का होता. आक्रमणाची धुरा अलव्हारेज व मेस्सीने  सक्षमपणे सांभाळली होती, तर बचावात डी मारिया, ख्रिस्टीयन रोमेरियो आदी उल्लेखनीय खेळ करताना दिसले. मेस्सी व अलव्हारेझ यांना रोखणे फ्रान्सच्या खेळाडूच्या हाताबाहेरचे होते. त्यांच्याकडून सातत्याने गोल प्रयत्न झाले, परंतु चेंडू यावेळेस पोस्ट शेजारून गेला. ७९व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या निकोलस ओटामेंडीने पेनल्टी क्षेत्रात स्टीव्ह मँडांडाला पाडले अन् फ्रान्सला पेनल्टी मिळाली. कायलिन एमबाप्पेने गोल करून फ्रान्सच्या चाहत्यांना जागं केलं… अखेरच्या १० मिनिटांत आता खरी लढत सुरू झाली. ८१व्या मिनिटाला एमबाप्पेने अर्जेंटिनाची बचावभींत भेदली अन् सामना २-२ असा बरोरीत आणला. जबरदस्त व्हॉलीद्वारे त्याने हा गोल केला…  (Football world cup)

फ्रान्सच्या या कमबॅकने अर्जेंटिनाचे खेळाडू बिथरले आणि त्यांच्याकडून आता धक्काबुक्की होऊ लागली. १०४व्या मिनिटाला मेस्सीने भन्नाट गोल केलाच होता, परंतु फ्रान्सच्या खेळाडूंनी सुरेख ब्लॉक केला. पुढच्याच मिनिटाला अकुनाने फ्रान्ससाठी आणखी एक गोल रोखला अन् यावेळेस गोल प्रयत्न करणारा लौटारो मार्टिनेझ होता. त्याने रेफरीकडे पेनल्टीची मागणी केली. १०७व्या मिनिटाला मेस्सीचा गोल रोखला गेला. पुढच्याच मिनिटाला अर्जेंटिनाने गोल केला.. मार्टिनेझचा तो प्रयत्न गोलरक्षकाने रोखला, परंतु चेंडूवर ताबा राखता न आल्याने मेस्सीला गोल संधी मिळाली आणि अर्जेंटिनाने ३-२ अशी आघाडी घेतली. ११६ व्या मिनिटाला हँड बॉलमुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली एमबाप्पेने त्यावर गोल करून सामना पुन्हा ३-३ असा बरोबरीत आणला. (Kylin Mbappe)