Mahavikas Aghadi Vs BJP : Metro Bridge : महाविकास आघाडी म्हणते, विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न; तर भाजप म्हणते, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

विकासाच्या नावाखाली गणेश उत्सव परंपरा नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न : महाविकास आघाडी

: गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण : भाजप

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या पुलावरून महापालिकेचे मुख्य सभागृह आणि बाहेर देखील महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप च्या नेत्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.    मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. तर भाजपने आरोप केला कि गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडी राजकारण करते आहे.

: आमचा विरोध हे महापौरांचे हास्यास्पद वक्तव्य – प्रशांत जगताप

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि “गणेशोत्सव” म्हणजे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव… पुणे शहरातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीची भुरळ केवळ महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे. मात्र पुणे शहराच्या या वैभवाला गालबोट लागतेय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुणे शहरातील सर्व मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक ही छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) येथून जाते. गेल्या 131 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज पुलावरून प्रस्तावित असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पुलामुळे ही परंपरा खंडीत होणार आहे. या मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. याबाबत आज महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रश्न उपस्थित केले असता महाविकास आघाडीचा मेट्रो प्रकल्पास विरोध असल्याचे हास्यास्पद वक्तव्य  महापौरांनी केले आहे.  पालक मंत्री आदेशाने मेट्रोचे काम सुरु झाले असे  महापौर महोदयांनी सांगितले, जर हे खरे असेल तर महापौरांनी सप्टेबर मध्ये काम थांबवताना कोणत्या अधिकारांत मेट्रोचे काम थांबवले होते. पुणे शहराच्या अस्मितेच्या या प्रश्नावर महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी केली असता भर सभागृहात महापौरांचं खोटं वक्तव्य उघडं पडेल म्हणून भारतीय जनता पक्षाने चर्चा घडू दिली नाही. पुणेकरांच्या प्रतिनिधींना सभागृहात बोलण्याची संधी न देता महापौरांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही पॅटर्न पुणे महानगरपालिकेत राबवला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराच्या विकासाला विरोध नाही तसेच मेट्रोला देखील विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली पुण्याच्या परंपरेला नष्ट करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा ठेका घेतलेल्या भाजपचे देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो DPR केला त्यात या चुका झाल्या आहेत त्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे हे पुणेकरांच्या समोर आणण्यासाठी आज सभागृहात बोलू देण्याची आमची मागणी होती परंतू हे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणूनच महापौरांनी आम्हाला सभागृहात बोलू दिलं नाही.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

: महाविकास आघाडीचे नेते गणेश मंडळांची दिशाभूल करत आहेत : महापौर

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या आडून महाविकास आघाडीचे राजकारण सुरु आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना खोटे सांगून त्यांची दिशाभूल केली जात आहे. कारण काम सुरु करण्याचे आणि ते ही पोलिस बंदोबस्तात करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आम्ही सभागृहात सर्व नेत्यांना सांगत होतो कि आपण अजित दादांना भेटून हा प्रश्न निकाली लावू. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचे ऐकले नाही. आम्हाला सभा चालू द्यायची होती. कारण शहराच्या हिताचे ३०० विषय मंजूर करायचे आहेत. मात्र विरोधी नगरसेवकांनी गोंधळ घालत सभा बंद करण्याचे काम केले. सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, महानगरपालिकेची सर्वसाधारण झाल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊ. यावर काही उपाय काढता येईल का? यासाठी महापौर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्व पक्षांचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ असा उपाय सुचविला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यात रस नव्हता. केवळ राजकारण करून महाविकास आघाडी गणेश मंडळाची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. अजूनही आम्ही दोन्ही नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा करण्यास तयार आहोत. तर स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, विकासाच्या आड कधीही गणेश मंडळ कार्यकर्ता येत नाही. टी पुण्याची परंपरा नाही. मात्र महाविकास आघाडी वेगळेच राजकारण खेळू पाहत आहे.

Leave a Reply