Spread the love

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

: पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पुणे : शिवशाहीर, शिवचरित्र्यकार अशी साऱ्या महाराष्ट्राला ओळख असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पाच वाजून 10 मिनिटांनी (ता.१५) पुण्यात एका खासगी रूग्णालयात वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले.त्यांना न्यूमोनिया झाला होता. गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्यांच्या पश्‍च्यात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

घरात तोल जाऊन पडल्याने २६ ऑक्टोबरला त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले. त्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या दोन दिवसात त्यांची प्रकृती खालावली होती. रविवारी त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते.

ओघवत्या, लालित्यपूर्ण वत्कृत्त्वाने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महाराष्ट्रासमोर उभे केले आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.

शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रात घरोघरी पोचले. त्यांचे ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकामुळे देशभरात छत्रपतींच्या चरित्राची पारायणे केली गेली. ‘जाणता राजा’ या महानाट्याने इतिहास घडवला. जगभरात प्रचंड लोकप्रियता आणि आदर प्राप्त केला. वयाची नव्वदी उलटल्यानंतरही त्याच्या वाणीतील आणि विचारांतील उत्साह कायम होता.

आपल्या एका विशिष्ट शैलीने गेल्या साठ वर्षांपासून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य महाराष्ट्रातील घराघरात पोचविले. अमोघ वक्तृत्वाने ऐकणाऱ्या समोर इतिहास उभा करण्याचे कसब त्यांच्यात होते. बाबासाहेब म्हणजे उत्साहाचा धबधबा होते. कोरोनाचा दीड वर्षाचा काळ सोडला तर या वयातदेखील ते कायम व्यग्र होते. व्याख्याने, सभांना ते या वयातही उत्साहाने उपस्थित असायचे. या वयातही सलगपणे दीड-दोन तास बोलण्याची त्यांची सवय होती.

Leave a Reply