Chemist Association : online pharmacies : सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या ऑनलाइन फार्मसी वर कारवाई करा  : केमिस्ट असोसिएशन

Categories
Breaking News आरोग्य पुणे
Spread the love

सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या ऑनलाइन फार्मसी वर कारवाई करा

: केमिस्ट असोसिएशनची अन्न व औषध प्रशासनाला मागणी

पुणे : ऑनलाइन फार्मसीमधून मागवलेल्या औषधांमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कायद्यानुसार प्रत्येक औषधांची विक्री ही रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या देखरेखीखालीच झाली पाहिजे. या नियमाला सर्रास धाब्यावर बसवून या ऑनलाइन कंपन्या औषधांची विक्री करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांनी केली आहे.

एका ऑनलाइन कंपनी द्वारे  मागवण्यात आलेले एक औषध हे मुदतबाह्य असल्याचे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औषधासोबत दिलेल्या बिलावर मुदत संपल्याची तारखेचा उल्लेख नसल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टने (सीएपीडी) हा प्रकार समोर आणला आहे. त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निदर्शनास आणून दिला आहे. जे औषध मागवण्यात आले होते ते केवळ ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध होते. ते औषध दिल्लीवरून पाठवले गेले होते. औषधाचे आलेले पाकिट उघडून पाहिले असता ते औषध मुदतबाह्य झालेले स्पष्ट झाले. तसेच त्यासोबत आलेल्या बिलावर त्या औषधाची मुदत संपल्याच्या तारखेचा उल्लेख नव्हता. काही दिवसांमध्ये ऑनलाइन पोर्टल किंवा अॅपद्वारे नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

अन्न व औषध प्रशासन किंवा इतर जबाबदार सरकारी संस्था या ऑनलाइन फार्मसीवर कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे ऑनलाइन फार्मसीमधून मागवलेल्या औषधांमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, असा आरोप केमिस्ट असोसिएशनने केला आहे. मुदतबाह्य औषधे, बनावट औषधे, भेसळयुक्त औषधे किंवा ज्या औषधांना प्रिस्क्रिप्शनशिवाय विकण्यास बंदी आहे. अशी औषधे सुद्धा सर्रासपणे ऑनलाइन माध्यमातून विकली जात आहेत. या औषधांच्या संभाव्य धोक्यांबाबत माहिती पुरवणारी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसते. कायद्यानुसार प्रत्येक औषधांची विक्री ही रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या देखरेखीखालीच झाली पाहिजे. या नियमाला सर्रास धाब्यावर बसवून या ऑनलाइन कंपन्या औषधांची विक्री करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केमिस्ट
असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांनी केली.

Leave a Reply