Mother’s Name Mandatory | Maharashtra Cabinet | सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश अनिवार्य!

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Mother’s Name Mandatory | Maharashtra Cabinet | सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश अनिवार्य!

 Mother’s Name Mandatory | Maharashtra Cabinet  – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मे 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
 जन्म प्रमाणपत्र, शाळेची कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांसारख्या सर्व सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश अनिवार्य करण्याचा निर्णय काल महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे.
  आयकर विभागाने 2018 मध्ये स्पष्ट केले होते की अर्जदाराची आई एकल पालक असलेल्या प्रकरणांमध्ये पॅन अर्जामध्ये वडिलांच्या नावाचा उल्लेख करणे अनिवार्य असणार नाही.  त्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने नियमांमध्ये सुधारणा केली होती जी अर्जदाराला आई एकल पालक आहे की नाही आणि अर्जदाराला फक्त आईचे नाव सांगायचे आहे की नाही याचा पर्याय देतो.
—-

 अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना

 यंदाच्या जागतिक महिला दिनी (8 मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पटकावला असून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी, सुटीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली आहे.
 मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यालये आहेत. त्यामुळे सहाव्या मजल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे. राज्याच्या महिला धोरणाची तात्काळ अंमलबजावणीबद्दल, कृतीशील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आले. त्यादिवशी महाशिवरात्रीची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी आली. 8 मार्चनंतर सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालयात आलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची  ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ ही पाटी आश्चर्याची आणि कौतुकाचा विषय ठरली, तसेच  अजित पवार यांच्या कृतीशील कार्यशैलीचा पुनर्प्रत्यय देऊन गेली.
——–