7th Pay Commission : महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना लवकरच 7व्या वेतन आयोगाचा मिळणार लाभ  : सरसकट रक्कम जमा होणार खात्यात 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना लवकरच 7व्या वेतन आयोगाचा मिळणार लाभ

: सरसकट रक्कम जमा होणार खात्यात

पुणे : महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे सुरु झाले आहे. मात्र सेवानिवृत्त सेवकांचे वेतन निश्चितीकरण अजून झालेले नाही. मात्र याबाबत वित्त व लेखा विभागाने गंभीरपणे लक्ष घातले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त सेवकांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. सरसकट रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

: वित्त व लेखा विभागाने गंभीरपणे घातले लक्ष

महापालिका कमर्चाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे आणि त्यांचा फरक मिळाला तरीही सेवानिवृत्त सेवकांना मात्र याचा लाभ मिळालेला नाही. याबाबत सेवकांनी आंदोलन देखील केले होते. याला विविध विभागातील पगार लेखनिक जबाबदार आहेत. त्यामुळे आता याकडे महापालिकेच्या वित्त आणि लेखा विभागाने ही बाब गंभीरपणे लक्षात घेतली आहे. सेवानिवृत्त सेवकांचे ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीकरण करून संपुर्ण पुर्ततेसह पेन्शन प्रकरण 31 मे पर्यंत विभागाकडे पाठवण्याचे आदेश वित्त व लेखा विभागाने दिले आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त सेवकांना दिलासा मिळाला आहे.

: वित्त व लेखा विभागाचे असे आहेत आदेश

राज्यातील महानगरपालिकांमधील अधिकारी / कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन आयोग लागू करण्याची कार्यवाही संदर्भ क्र. १ अन्वये विहित करण्यात आली आहे. संदर्भाकित विषयानुसार मनपाची सर्व खाती व क्षेत्रिय कार्यालय यामध्ये कार्यरत असणारे पगार लेखनिक यांना सुचित करण्याबाबत संदर्भ क्र. ६ व ७ चे कार्यालयीन परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. तथापि बहुतेक कार्यालयाकडून याबाबतच्या वारंवार सुचना देवूनही सेवानिवृत्त सेवकांचे ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीकरण करून संपुर्ण पुर्ततेसह पेन्शन प्रकरण आमच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याचे दिसून येत नाही. याबाबत मान्यताप्राप्त पुणे मनपा कामगार युनियन, इतर कामगार संघटना, सेवानिवृत्त सेवक यांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. व लागणार आहे. दिनांक १/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांची सेवापुस्तके पेन्शन विभागाकडे मागणी करून त्यांची ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीकरण करून वेतन आयोग कमिटी कडून तपासणी करून त्यांच्या मान्यतेसह आकारणी तक्त्यावर योग्य त्या नोंदी व स्वाक्षरीसह सेवापुस्तकात डकवून आमच्या कार्यालयाकडे पाठविण्यात यावे. तरी संबंधित कार्यालयाकडील मा. खाते प्रमुख यांनी याबाबत आपले कार्यालयाकडील बिल लेखनिक / पेन्शन लेखनिक यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे व्यक्तीशः सुचित करुन पेन्शन प्रकरण संपूर्ण पुर्ततेसह दिनांक३१/०५/२०२२ पर्यंत त्वरित आमच्या कार्यालयाकडे पाठविण्यात यावे, अन्यथा प्रकरणी विलंब झाल्यास सेवानिवृत्त सेवकांचे रोषास / आंदोलनास मा. खातेप्रमुख जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. सर्व खात्यांचा विलंब अहवाल मा. महा.आयुक्त यांना ३१/०५/२०२२ नंतरच्या १० दिवसात अवगत करण्यात येईल.