PMC : पुण्यात 173 नगरसेवक होण्याची शक्यता!  : राज्य सरकारचे परिपत्रक प्रसिद्ध 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

पुण्यात 173 नगरसेवक होण्याची शक्यता!

राज्य सरकारचे परिपत्रक प्रसिद्ध

राज्यशासनाने महापालिकेच्या कमाल आणि किमान सदस्यांची संख्या निश्‍चित केल्याने पुण्यात 173 नगरसेवक होण्याची शक्यता आहे. सरकारने नुकतेच याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.  तर, या निवडणुका 3 च्या प्रभाग रचनेनुसार होणार असल्याने आता शहरात 57 प्रभाग 3 सदस्यांचे होणार असून 1 प्रभाग 2 सदस्यांचा होण्याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर वर्तवला जात आहे.

निकषानुसार 71 जागा ओबीसी, एससी, एसटी या आरक्षणांसाठी असणार आहेत. 102 जागा या खुल्या गटातील असण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, विद्यमान महापालिकेत चार सदस्यांचे प्रभाग असून सध्या एकूण प्रभाग संख्या 42 आहे. मात्र, आता तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने तसेच सदस्यांची किमान आणि कमाल मर्यादा वाढविण्यात आल्याने 16 ने वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

सदस्य संख्या वाढल्याने प्रभागांची संख्याही वाढणार आहे. परिणामी, प्रभागासाठीच्या मतदारांच्या संख्येचा आकडा कमी होणार असून प्रभाग संख्या तीनची असली, तरी त्यासाठीचे मतदान मात्र दोनच्या प्रभागाएवढे म्हणजेच 49 ते 54 हजारांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. सध्या चार प्रभागात ही मतदारसंख्या सुमारे 70 ते 80 हजारांच्या आसपास होती. त्यामुळे ही प्रभाग रचना मिनी विधानसभाच समजली होती. मात्र, आता मतदार संख्या कमी झाल्याने राजकीय समीकरणेही बदलणार असून त्यामुळे राजकीय चुरस निर्माण होणार असून महापालिकेत कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळेल का नाही, याबाबत साशंकता उपस्थित केली जात आहे.

 : प्रभाग रचनेच्या कामास येणार वेग 

 

महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी राज्य शासनाने या संस्थांच्या सदस्य संख्येत वाढ केली आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार हा निर्णय घेतला असून त्याबाबतचे राजपत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या आता 173 होणार आहे. सध्या महापालिकेत 164 नगरसेवक आहेत. त्यात या वाढीच्या निकषांनुसार 9 सदस्यांची भर पडणार असून, ही संख्या 173 होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत ही सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याचवेळी शासनाने दिलेल्या निवेदनात 17 टक्के नगरसेवक वाढणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे नेमके किती नगरसेवक पुण्यात वाढणार? याबाबत गोंधळाची स्थिती होती.

 

मात्र, अखेर शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाल्याने हा गोंधळ मिटला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, पुण्याची लोकसंख्या 30 लाखांपेक्षा अधिक असल्याने पूर्वीच्या नियमानुसार पुण्यात कमीत कमी 156 आणि जास्तीत जास्त 168 सदस्यसंख्या असावी, असा नियम होता. मात्र, शासनाने त्यात बदल केल्याने आता 30 लाखांपर्यंत 168 तर त्यापुढे प्रत्येक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक असणार आहे.

तर शहरात नगरसेवक तसेच प्रभागांची संख्या वाढणार असल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.आता प्रभाग तीनचा असला, तरी मतदान मात्र 50 ते 55 हजारांचे असणार आहे. ते दोन सदस्यांच्या प्रभागांएवढेच असणार आहे. महापालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून तीन सदस्यांचा प्रभाग रचनेच कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. मात्र, 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. करोनामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. असल्याने शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत स्पष्टता आली नसल्याने प्रभाग रचनेचे काम रखडलेले होते. मात्र, आता या कामास वेग येणार आहे, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

PMC : Corporators : महापालिकेत किती नगरसेवक वाढणार हे अजून निश्चित नाही!   : सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

महापालिकेत किती नगरसेवक वाढणार हे अजून निश्चित नाही!

: सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार

पुणे: महापालिकेत नगरसेवकांची संख्या 15-17% वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र शहर आणि समाविष्ट गावांची लोकसंख्या गृहीत धरता किती नगरसेवक किंवा किती प्रभाग वाढतील, हे अजून पर्यंत निश्चित झालेले नाही. त्यासाठी राज्य सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. मात्र पुणे महापालिकेत 175 च्या वर नगरसेवक जाणार नाहीत, हे मंत्रिमंडळ निर्णयानुसार स्पष्ट होत आहे.

: 175 च्या पुढे नगरसेवक जाणार नाहीत

महापालिकेची नगरसेवक संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता नेमका कोणाचा फायदा होणार आणि कोणाची ताकद वाढणार, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या महिनाभरापूर्वीच्या आदेशाने शहरातील नवीन प्रभागांची संख्या 55 वर जाणार होती. मात्र, शासनाच्या आदेशातील गोंधळामुळे ही प्रभागांची संख्या 59 अथवा 62 पर्यंत जाईल. तर 2017 च्या निवडणुकांवेळी ही प्रभाग संख्या 41 होती. त्यानंतर 11 समाविष्ट गावांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर ही प्रभाग संख्या 42 वर गेली आहे. सरकारने निर्णयात म्हटले आहे कि 30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी 161 नगरसेवक असतील. त्यापुढे प्रत्येकी 1 लाखासाठी 1 नगरसेवक असेल. शहर आणि समाविष्ट गावे यातील लोकसंख्या गृहीत धरता नगरसेवकांची संख्या 173 पर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. मात्र अंतिम संख्या अजून निश्चित झालेली नाही. त्यासाठी राज्य सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. सरकारला अगोदर 34 गावांची 2011 ची लोकसंख्या गृहीत धरावी लागणार आहे. त्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल.

मात्र पुणे महापालिकेत 175 च्या वर नगरसेवक जाणार नाहीत, हे मंत्रिमंडळ निर्णयानुसार स्पष्ट होत आहे. असे असले तरी मात्र सर्व पक्ष आता कसून तयारीला लागले आहेत.