Autorickshaw fare hike | पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती क्षेत्रात १ ऑगस्टपासून ऑटोरिक्षांच्या दरात वाढ

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती क्षेत्रात १ ऑगस्टपासून ऑटोरिक्षांच्या दरात वाढ

पुणे|पुणे जिल्ह्यातील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी येत्या १ ऑगस्टपासून पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान देय असलेल्या सद्याच्या २१ रूपये भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर २३ रूपये करण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे १४ रूपयावरून १५ रूपये करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तसेच खटुआ समितीच्या शिफारशीला अनुसरून ऑटोरिक्षा भाडेसुधारणा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सुधारित केलेल्या भाडेदरावर पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीसाठी २५ टक्के अतिरिक्त भाडेदर असणार आहे. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीसाठी ४० टक्के अतिरिक्त भाडेदर राहणार आहे.

प्रवाशांसमवेतच्या सामानासाठी ६० X ४० सेमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी ३ रूपये इतके शुल्क राहणार आहे. ऑटोरिक्षाचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलीब्रेशन) १ ऑगस्टपासून ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे ऑटोरिक्षा चालक १ ऑगस्टपासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षाधारकांसाठी भाडे सुधारणा लागू राहणार आहे.

मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान ७ दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी १ दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये मात्र किमान ५०० रूपये आणि कमाल तडजोड शुल्क २ हजार रूपयांपर्यंत असेल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी कळविले आहे.