Road ‘Safety’ | Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आजपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर (Mumbai Pune Expressway) अपघाताचे (Road Accident)  प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी १ डिसेंबर पासून पुढील ६ महिन्यांसाठी २४ तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा (Road Safety) जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत (RTO) करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे व वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती व अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते.

त्यानुसार परिवहन विभागाने ‘सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथकात ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही महामार्गावर यामधील प्रत्येकी ६ पथके व १५ अधिकारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.

रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रमांतर्गत दोन्ही महामार्गावर विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत अपघातग्रस्त ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) तसेच अपघाप प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करणे, त्याठिकाणी रस्ता सुरक्षेच्या हेतूने सर्व उपाययोजना करणे आणि वाहन चालकांच्या माहितीकरीता त्याठिकाणी घडलेल्या अपघातांची माहिती देणारे फलक प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

अवैधरित्या रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करणे आणि रस्त्यावर वाहतुकीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करणे. दोन्ही महामार्गावरील टोल नाक्यावर उद्घोषणा करुन जनजागृती करणे. इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. उजव्या मार्गिकेत ट्रक, बस, कंटेनर आदी कमी वेगाने चालणारी वाहने, चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे. विना हेल्मेट, विना सिटबेल्ट प्रवास करणाऱ्या चालकांवर आणि प्रवाशांवर कारवाई करणे आदी उपाययोजना या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे.

रस्ता सुरक्षा निर्माण करण्याच्या हेतूने ‘सुरक्षा’ हा उपक्रम प्रथमच परिवहन विभागामार्फत राज्यात सहा महिन्यांच्या कालावधीकरीता सुरु करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत पहिले ७ दिवस दोन्ही महामार्गावरील महामवरील टोल नाक्यावर व वाहनांवरील पीए प्रणालीमार्फत जनजागृती व उद्घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व वाहतुक नियमांचे पालन करण्याच्या हेतूने कारवाई करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस विभाग, महामार्ग पोलीस, स्वयंसेवी संस्था आदींचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता त्यामध्ये ८० टक्के पेक्षा जास्त अपघात हे चालकांचा निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती व वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होत असल्याचे दिसून आले असून चालक व नागरिकांनी वाहन चालवतांना नियमांचे पालन करण्यासाठी करण्याचे आवाहन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.

Autorickshaw fare hike | पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती क्षेत्रात १ ऑगस्टपासून ऑटोरिक्षांच्या दरात वाढ

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती क्षेत्रात १ ऑगस्टपासून ऑटोरिक्षांच्या दरात वाढ

पुणे|पुणे जिल्ह्यातील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी येत्या १ ऑगस्टपासून पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान देय असलेल्या सद्याच्या २१ रूपये भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर २३ रूपये करण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे १४ रूपयावरून १५ रूपये करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली.

विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तसेच खटुआ समितीच्या शिफारशीला अनुसरून ऑटोरिक्षा भाडेसुधारणा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सुधारित केलेल्या भाडेदरावर पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीसाठी २५ टक्के अतिरिक्त भाडेदर असणार आहे. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागाकरिता रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीसाठी ४० टक्के अतिरिक्त भाडेदर राहणार आहे.

प्रवाशांसमवेतच्या सामानासाठी ६० X ४० सेमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी ३ रूपये इतके शुल्क राहणार आहे. ऑटोरिक्षाचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलीब्रेशन) १ ऑगस्टपासून ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे ऑटोरिक्षा चालक १ ऑगस्टपासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षाधारकांसाठी भाडे सुधारणा लागू राहणार आहे.

मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान ७ दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी १ दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये मात्र किमान ५०० रूपये आणि कमाल तडजोड शुल्क २ हजार रूपयांपर्यंत असेल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी कळविले आहे.

Helmet : RTO : PMC : हेल्मेट न घालणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई  : कारवाईत दुजाभाव केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप 

Categories
Breaking News PMC पुणे

हेल्मेट न घालणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

: कारवाईत दुजाभाव केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप

पुणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहतूक विभागाने हेल्मेट न घालणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आज सकाळी ही कारवाई पुणे महापालिकेत झाली. मात्र या कारवाईत दुजाभाव झाल्याचा आरोप महापालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणेकरांवर हेल्मेट सक्ती लादण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याला विरोध झाल्याने ही सक्ती माघारी घ्यावी लागती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले होते कि ही सक्ती फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असेल. त्यानुसार वाहतूक विभागाने देखील ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी वाहतूक पोलिसांनी ही कारवाई पुणे महापालिकेत केली. सकाळी 9:30 वाजताच वाहतूक विभागाचे कर्मचारी महापालिकेच्या इन गेटवर थांबून करू लागले. ज्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात महापालिकेचे ID कार्ड होते, त्यांच्यावरच फक्त ही कारवाई होत होती. ज्यांच्याकडे ID नव्हते त्यांना मात्र सोडून देण्यात येत होते. शिवाय pmp डेपोकडील बाजूने जे कर्मचारी प्रवेश करत होते, तिकडे मात्र वाहतूक विभागाचे कुणीही नव्हते. याबाबत मात्र कर्मचाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेल्मेट च्या दंडाशिवाय आधीच्या मोडलेल्या नियमांचे देखील पावत्या केल्या गेल्या. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना 5 हजार पर्यंत दंड भरावा लागला. हे सगळं होत असताना मात्र गेटवर उभे असलेले सुरक्षा कर्मचारी याचा चांगलाच आनंद घेत होते.

ST workers Strike: PMP: पीएमपीच्या बसेस ग्रामीण भागात धावणार! : प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय 

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पीएमपीच्या बसेस ग्रामीण भागात धावणार

: प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (PMP) बसेस जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीशेजारील ग्रामीण भागांमध्येदेखील सोडण्याच्या सूचना पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तरी प्रवाशांनी आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) संजय ससाणे यांनी केले आहे.

: खासगी बसेसना संप मागे घेईपर्यंत परवानगी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाने सर्व खाजगी प्रवासी बसेस, शाळेच्या बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास संप मागे घेईपर्यंत मान्यता दिली आहे.

या संदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे पुणे कार्यक्षेत्रातील प्रवाशांना खाजगी बस सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, वाहतूक पोलीस, पीएमपीएमएल व खाजगी बस वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या अधिसूचनेच्या अधीन राहून पुणे शहरातील एस.टी बस स्थानकांमधून खाजगी बसेसद्वारे आज (10 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजल्यापासून प्रवासी वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. खाजगी बस वाहतूकदारांनी एस.टी. प्रशासनाकडून सध्याच्या एस.टीच्या प्रचलीत भाडेदरांप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारुन कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या आहेत.