Anantrao Pawar College | अनंतराव पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांचे वाटप

Categories
Breaking News cultural Education पुणे

अनंतराव पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांचे वाटप

१५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनंतराव पवार महाविद्यालयात  मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. कलाम साहेबांच्या प्रतिमेस मा. प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी या होत्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, डॉ. प्रवीण चोळके, ग्रंथपाल प्रा. अविनाश हुंबरे, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. अविनाश हुंबरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी वाचन प्रेरणा दिनाविषयी माहिती देऊन या दिनाचे औचित्य साधून मराठी आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. प्राचार्य यांनी डॉ. कलाम साहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात, त्यांची कष्ट करण्याची असणारी तयारी आणि त्यामध्ये असणारे सातत्य याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य पुढे म्हणाल्या की, डॉ.कलाम साहेबांच्या एकेका विधानातून आपणास प्रेरणा मिळत असते, त्यांचे प्रत्येक पुस्तक आपणास प्रेरणादायी आहे. डॉ. कलाम साहेबांच्या दृष्टिकोनातून युवा वर्गाची शक्ती आणि युवा वर्गाकडून असणाऱ्या अपेक्षा याविषयी मा. प्राचार्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. दत्तात्रय फटांगडे यांनी कलाम साहेबांच्या जीवनाचा जीवनकार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर कोमल रामतीर्थे (द्वितीय वर्ष वाणिज्य), आदित्य गायकवाड (प्रथम वर्ष कला), अनुजा टेकाळे (प्रथम वर्ष कला) या विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम साहेबांच्या कार्यावर, त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर, त्याचबरोबर वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगताना एक पुस्तक कितीतरी मित्रांपेक्षाही अधिक जवळचा मित्र होऊ शकते याविषयी विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले.

यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाची अभिरुची निर्माण व्हावी, आपल्या दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनाने व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना विविध वृत्तपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच मराठी विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘सृजन भित्तीपत्रका’चे प्रकाशन मा. प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर ग्रंथालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या संदर्भ ग्रंथांचा, कोशवाङ्मयाचा, अवांतर वाचनाच्या पुस्तकांचा, विश्वकोशाचा परिचय व्हावा या उद्देशाने ग्रंथालय विभागामध्ये ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या प्रदर्शनाचा विद्यार्थी – प्राध्यापक यांनी लाभ घेऊन उत्सुकतेने ग्रंथांची पाहणी केली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मराठी आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णवी ववले, आरती गोपालघरे, मुक्ता काकडे, तन्वी वाल्हेकर, श्रुती जगताप, कुशल पैठणे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. समन्वयक – सूत्रसंचालक म्हणून डॉ. गणेश चौधरी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रा.अश्विनी जाधव यांनी मानले.