Encroachment action : विरोध झाल्याने रात्री १० नंतर अतिक्रमण कारवाई नाही  : दुपारी २ ते १० अशी कारवाई होणार 

Categories
Breaking News PMC पुणे

विरोध झाल्याने रात्री १० नंतर अतिक्रमण कारवाई नाही

: दुपारी २ ते १० अशी कारवाई होणार

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील अवैध फेरीवाल्यानंतर आता  वैध म्हणजेच नोंदणीकृत व्यावसायिक जे नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. ही कारवाई रात्री  १० नंतर फुटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली होती. मात्र याला विरोध झाला. त्यामुळे अतिक्रमण विभागाने १० नंतर ची कारवाई बंद केली आहे. याबाबत विभागाने राज्य सरकारचे मार्गदर्शन मागितले आहे. दरम्यान कारवाई दुपारी २ ते रात्री १० वाजे पर्यंत  सुरु राहणार आहे.  त्यामुळे व्यावसायिकांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन अतिक्रमण विभागाने केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ता/पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या अधिकृत परवानाधारक फेरीवाला व्यवसायिकांनी आपले व्यवसायाची वेळ संपल्यानंतर दैनंदिन व्यवसायाचे साधन, माल, साहित्य इ. हटवून सदरची जागा रिकामी करणे अपेक्षित आहे. तथापि अधिकृत
फेरीवाला व्यवसायिक सदरची जागा रिकामी करत नसल्याचे व महानगरपालिकेने घालून दिलेल्या अटी/शर्तीचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे रात्री १० नंतर ज्या फेरीवाला
व्यवसायिकांनी आपले व्यवसायाचे साधन, माल, साहित्य इ. हटवून न नेल्यामुळे नुकतीच कारवाई करण्यात आली. तसेच जे फेरीवाला व्यवसायिक रात्री १० वाजल्यानंतर व्यवसायाची वेळ संपल्यानंतर दैनंदिन व्यवसायाचे साधन, माल, साहित्य इ. हटवून सदरची जागा रिकामी करणार नाहीत अशा व्यवसायिकांवर दैनंदिन प्रभावीपणे कठोर कारवाई करण्यात येणार, असा इशारा अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आला होता.

मात्र रात्रीच्या या कारवाई ला विरोध होऊ लागला. शिवाय हे नियमात बसते का नाही, याबाबत ही प्रशासन संभ्रमात आहे. त्यामुळे प्रशासनाने आता राज्य सरकारचे मार्गदर्शन मागितले आहे. तोपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे. मात्र ती दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सुरु राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन अतिक्रमण विभागाने केले आहे.

 

Paud Road Encroachment action : पौड रोड च्या अतिक्रमण कारवाई वरून महापालिका प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात 

Categories
Breaking News PMC social पुणे

पौड रोड च्या अतिक्रमण कारवाई वरून महापालिका प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

: काही सोसायट्या वगळून केली कारवाई

पुणे : महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण कारवाई बद्दल कौतुक होत असतानाच बुधवारी झालेल्या पौड रोड च्या अतिक्रमण कारवाई वरून मात्र महापालिका प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भुसारी कॉलनी परिसरातील कारवाई करताना काही सोसायट्या वगळून कारवाई करण्यात आली. संबंधित सोसायट्यांना नोटीस दिल्या असताना देखील त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

: नोटिसा देऊनही कारवाई नाही

महापालिका प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये अतिक्रमण आणि बांधकाम विभाग एकत्र मिळून कारवाई करत आहेत. प्रशासनाकडून साईड मार्जिन, फुटपाथ वर कारवाई करण्यात येत आहे. त्याआधी नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटीस दिल्या जातात. नागरिकांनी स्वतः हुन काढून नाही घेतले तर कारवाई केली जाते. त्यानुसार पौड रोड वरील नवीन हद्द परिसर म्हणजेच भुसारी कॉलनीतील अनधिकृत बांधकाम असणाऱ्या सर्व सोसायट्यांना मार्च महिन्यात नोटिसा देण्यात आल्या होत्या. यामध्ये कलाग्राम/नाट्यचित्र को ऑप हाऊसिंग सोसायटी चा समावेश होता. सोसायटीतील बऱ्याच नागरिकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. मात्र नागरिकांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे आज सकाळ पासून कारवाईस सुरुवात करण्यात आली. मात्र महापालिका प्रशासनाकडून कारवाई करताना कॉलनीतील कलाग्राम/नाट्यचित्र सोसायटी सोडून कारवाई करण्यात आली. परिसरातील स्वप्न साकार सोसायटीच्या दुकानावरील बोर्ड वर देखील कारवाई करण्यात आली. मात्र नाट्यचित्र सोसायटी तशीच सोडून दिली. यामुळे मात्र नागरिकांमध्ये रोष आहे. प्रशासनाच्या कामकाजाबाबत परिसरातील नागरिक उलट सुलट चर्चा करत होते.
कायदा सर्वांना समान आहे. अनधिकृत काम करणाऱ्या सर्वांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कारवाई केली गेली. मग फक्त नाट्यचित्र/कलाग्राम सोसायटीवरच कारवाई का केली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेबाबत आमच्या मनात संभ्रम आहे. प्रशासनाने याबाबत खुलासा करावा.
राकेश धोत्रे, नागरिक.

Encroachment action at night : आता रात्री देखील अतिक्रमण कारवाई! 

Categories
Breaking News PMC पुणे

आता रात्री देखील अतिक्रमण कारवाई!

: रात्री १० नंतर फुटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील अवैध फेरीवाल्यावर जोरदार कारवाई सुरु आहे. दरम्यान आता आगामी काळात वैध म्हणजेच नोंदणीकृत व्यावसायिक जे नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई रात्री देखील असणार आहे. रात्री १० नंतर फुटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रिय कार्यालय हद्दीमधील रस्ता, पदपथांवर केंद्र शासनाच्या पथविक्रेता अधिनियम-२०१४ चे मधील तरतुदीनुसार तसेच सदर कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून बनविण्यात आलेली पथविक्रेता योजना-२०१७ चे मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत झालेल्या पात्र पथविक्रेत्यांचे मान्य हॉकर्स झोनमध्ये यापूर्वी सर्व संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडून रितसर पुनर्वसन करण्यात आलेले आहे. पुनर्वसन झालेल्या ज्या व्यवसायिकांकडे सन १९८८ पूर्वीचे अधिकृत स्थिर/हातगाडी/बैठा व गटई (खोंचा) याप्रकारची व्यवसाय साधने वापरून प्रत्यक्ष मान्य झोनमध्ये मान्य ५४४ फुट मापाच्या जागेत व्यवसाय करणे अपेक्षित आहे. तसेच उपरोक्त कायद्याअंतर्गत ज्या अनधिकृत व्यवसायिकांची संगणकीय नोंदणी करून त्यांना सन २०१४ नंतर फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात येवून मान्य झोनमध्ये त्यांचे रितसर पुनर्वसन केलेले आहे, अशा व्यवसायिकांनी त्यांचे मान्य जागी फक्त ५X४ फुट मापाच्या जागेत पथारी अथवा खोंचा ठेवूनच व्यवसाय करणे आवश्यक आहे.

तथापि सद्यस्थितीत प्रत्यक्ष जागेवर वारंवार तपासणीत असे आढळून आलेले आहे की, पूर्वीचे अधिकृतव्यवसायिक तसेच सन २०१४ नंतर वरील कायद्याअंतर्गत नोंदणीकृत झालेले व्यवसायिक त्यांना नेमून दिलेल्या झोनमधील मान्य मापाचे जागेत वर नमूद केलेनुसार मान्य व्यवसाय साधनांचा वापर करताना आढळून येत नाही. अनेक व्यवसायिकांनी मान्य व्यवसाय साधने ठेवून व्यवसाय करण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर व्यवसाय साधनामध्ये परस्पर बदल करून उदा. १) मान्य बैठा/गटई परवानाधारकांनी बैठा पथारी लावून अथवा खोंचा ठेवून व्यवसाय करण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर स्टॉल अथवा छोटी चाके लावलेली हातगाडी किंवा स्थिर हातगाडी लावून व्यवसाय करणे. २) पूर्वीच्या स्थिर हातगाडीधारकाने प्रत्यक्ष जागेवर स्टॉल अथवा छोटी चाके लावलेली हातगाडी सदृश स्टॉल ठेवून व्यवसाय करणे. ३) गटई (खोंचा) ठेवून व्यवसाय करण्याऐवजी प्रत्यक्ष जागेवर स्टॉल किंवा स्थिर हातगाडी लावून व्यवसाय करणे. इत्यादी प्रकारची अनधिकृत व्यवसाय साधने परस्पर ठेवून व्यवसाय करताना आढळून येत आहे. तसेच सदर साधनांमध्ये अनधिकृतपणे वीज, पाणी, ड्रेनेज कनेक्शन घेणे, व्यवसाय जागेवर पक्क्या स्वरुपात व्यवसाय साधनांची उभारणी करणे इत्यादी बाबी देखील अनधिकृतपणे केल्याचे आढळून येत आहे.
याबाबत उपायुक्त माधव जगताप म्हणाले, आता आगामी काळात वैध म्हणजेच नोंदणीकृत व्यावसायिक जे नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई रात्री देखील असणार आहे. रात्री १० नंतर फुटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जगताप यांनी सांगितले कि, रात्री १० नंतर व्यवसाय तर करताच येणार नाही. शिवाय त्यांना संबंधित जागा स्वच्छ ठेवावी लागणार आहे. तसेच तिथे कुठलीही सामग्री ठेवता येणार नाही. तसे झाले तर ते जप्त केले जाईल. जगताप म्हणाले, यासाठी ५ टीम तयार करण्यात येणार आहेत. सुरुवातीला मध्यवर्ती भागात कारवाई केली जाईल. त्यानंतर उपनगरात कारवाई केली जाणार आहे. याचे नियोजन क्षेत्रीय कार्यालयांनी करायचे आहे. असे ही जगताप यांनी सांगितले.