Kumar Gandharva | पं. कुमार गंधर्व यांचे गायन मनाला प्रफुल्लीत करणारे | उल्हास पवार

Categories
Breaking News cultural social पुणे

पं. कुमार गंधर्व यांचे गायन मनाला
प्रफुल्लीत करणारे | उल्हास पवार

पुणे |  पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीमध्ये असणारा भक्तीरस मनाला भावणारा आहे. त्यांची गायकी मनाची प्रसन्नता निर्माण करणारी आहे. अगदी लहान वयापासून त्यांनी आपल्या गायकीवर प्रभूत्व मिळवून आपल्या स्वराने श्रोत्यांवर पकड निर्माण केली. देशभरातून त्यांच्या कार्यक्रमाला मागणी वाढत गेली. त्यांच्या मैफलीत रंग चढत गेला. आजही त्यांचे गायन मनाला आनंद देत आहे, अशा या महान गायकाच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीचा प्रारंभ पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकाराने होत आहे ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले.

ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार अशा सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण करणारे पद्मविभूषण कै. पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दिनानिमित्त शनिवार दि. ८ एप्रिल रोजी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद येथे कला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. डॉ. मोहनकुमार दरेकर, पं. राजेंद्र कंदलगांवकर, मीनाताई फातर्पेकर, आयोजक मोहन जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. पं. कुमार गंधर्व यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. निवेदिता मेहेंदळे यांनी रचलेले व शिरीषा जोशी यांनी स्वरबद्ध केलेले मालकंस रागातील देवीस्तवन- “देवी शारदे आमुचे वंदन” तन्मयी मेहेंदळे यांनी सादर केले. सर्व शास्त्रीय गायकांचा उल्हासदादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

पुण्यामध्ये पं. कुमार गंधर्व यांचा पुतळा उभारुन उचित स्मारक व्हावे, या आयोजक मोहन जोशी यांच्या कल्पनेबद्दल त्यांचे अभिनंद करुन उल्हास पवार म्हणाले, पं. कुमार गंधर्व यांच्या शास्त्रीय संगीताची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण होती. आजही त्यांच्या गायनाच्या शैलींचे गारुड देशभर आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या गायनाच्या शैलीचा गौरव केला होता. यापेक्षा मोठा गौरव होणे नाही. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी मध्यप्रदेशातील धार येथे पं. कुमार गंधर्वांची आर्वजून भेट घेतली होती. या भेटीत पं. कुमार गंधर्व यांचे शास्त्रीय गायन त्यांनी आवर्जून ऐकले. असे, सांगून उल्हास पवार म्हणाले की, पं. नेहरुंना कमी वेळ असूनदेखील पं. कुमार गंधर्वांचे गायन ऐकण्यासाठी त्यांनी अधिक वेळ दिला, असल्याची आठवण त्यांनी सांगितली.
पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमावेळी लाईट गेली, असल्याची आठवण सांगताना पवार म्हणाले, पं. कुमार गंधर्व यांचे सुरेल गायनाच्या कार्यक्रमात श्रोते तल्लीन झाले होते. अचानक लाईट गेली. मेणबत्या लावल्या गेल्या त्याचे भानही श्रोत्यांना नव्हते. इतके सारेजण तल्लीन झाले होते, असे उल्हास पवार म्हणाले. पं. कुमार गंधर्व यांचे निर्गुणी भजनाचे स्वर मला ऐकायला मिळाले हे माझे भाग्य असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

पं. डॉ. मोहनकुमार दरेकर म्हणाले, सवाई गंधर्वातील एका कार्यक्रमात पं. कुमार गंधर्व यांना भेटता आले. त्यांच्या गायनाचा कार्यक्रम मला ऐकण्याचे भाग्य लाभले. ईश्वराचे दर्शन वारंवार होत नाही, तर एकदाच होते. असेच पं. कुमार गंधर्व यांच्या गाण्यात होते. त्यांच्या गाण्यांचे पारायण सुरु असून पुढील पिढीला ते नक्कीच दिशा देणारे असेल असेही यावेळी पं. दरेकर यांनी सांगितले. पं. कुमार गंधर्व यांनी आपल्या गायनातून बोली भाषेत उच्चाराला फार महत्व दिले. त्यांच्या गायनाची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. अवघ्या सहा वर्षाचा मुलगा रेकॉर्डींग ऐकून जसेच्यातसे ऐकलेले राग गाण्याची हातोटी त्यांच्या अंगी होती. त्यांचे गाणे कधीही तंबोर्याच्या बाहेर गेले नाही. तंबोरा आणि तबल्यात त्यांचा स्वर विरुन गेला असल्याचे यावेळी पं. दरेकर यांनी सांगितले. पं. दरेकर यांनी आपल्या आवाजात पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीची झलक दाखवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पंडित राजेंद्र कंदलगांवकर म्हणाले, पं. कुमार गंधर्व यांच्यात स्वरांची सिद्धी होती. त्यांनी गायलेल्या स्वरांची आस दीर्घकाळ असायची. प्रत्येक गायनात त्यांच्या स्वरवाक्य दिसून येत होते. त्यांच्या गायनाचा अभ्यास आपल्याला कसा करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या कलाविष्कारांचा अभ्यास करुन नव्या पिढीला देण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी संयोजक मोहन जोशी यांना सांगितले.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मीनाताई फातर्पेकर म्हणाल्या, पं. कुमार गंधर्व आणि आमच्या घराण्यांचा संबंध होता. माझी आजी सरस्वतीबाई राणे व हीराबाई बडोदेकर यांच्यामुळे गायनाचे धडे मला सतत मिळाले. अनेक मोठ्या कलाकारांचा राबता घरात असायचा. पं. कुमार गंधर्व यांच्या खूप आठवणी घरात ऐकायला मिळाल्या. पं. कुमार गंधर्व यांची शैली वेगळी होती, हृद्याला भिडणारी होती. त्यांच्या निर्गूणी भजनांची कॉपी करता येत नाही. आम्ही इंदोरमध्ये असताना इंदोरजवळील देवास येथे त्यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली. माझ्या आजीने मला त्यांच्यापुढे बंदीश गायला सांगितली. या गायनाच्या संधीमुळे त्यांनी मला दिल्लीच्या कार्यक्रमात गायनाला संधी दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यांचे गायन आम्ही कलाकार पुढे घेऊन जाऊ असेही यावेळी त्यांनी सांगितले. जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम स्तूत्य असल्याचे कौतूक करुन मोहन जोशी यांना धन्यवाद फातर्पेकर यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश गुजर यांनी केले. प्राजक्ता जाधव यांनी आभार मानले.

| पं. कुमार गंधर्व यांचे पुण्यात स्मारक व्हावे…-मोहन जोशी

पद्मविभूषण कै. पं. कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमाचा प्रारंभ पुण्याहून सुरु होत आहे ही आनंदाची बाब आहे, असे सांगून संयोजक पुणे कला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, पं. कुमार गंधर्व यांची जन्मभूमी कर्नाटक आहे. तर महाराष्ट्र व मध्यप्रदेश ही कर्मभूमी आहे. पुण्याशी पं. कुमार गंधर्व यांचे नाते भावनिक होते. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यात पं. कुमार गंधर्व यांचा जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या गायनाचा प्रवास व गायकी पुढील पिढीपर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आम्ही राबविणार आहोत. पुण्यात कै. पं. कुमार गंधर्व यांचे स्मारक व पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारला विनंती व पाठपुरावा करणार आहोत, असे टाळ्यांच्या कडकडाटात मोहन जोशी म्हणाले.

 

Kumar Gandharva | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ | दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ

| दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार अशा सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण करणारे पद्मविभूषण कै. पं. कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दिनानिमित्त शनिवार, ८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परीषद, टिळक मार्ग, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक सर्वश्री पं. डॉ. मोहनकुमार दरेकर, पं. राजेंद्र कंदलगांवकर व श्रीमती मीनाताई फातर्पेकर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार भूषवणार आहेत अशी माहिती आयोजक पुणे कला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

कै. पं. कुमार गंधर्व यांचे प्रतिमेचे पूजन केल्यानंतर दीपप्रज्वलन व तन्मयी मेहेंदळे यांनी सादर केलेली प्रार्थना झाल्यानंतर तीनही पाहुणे कै. पं. कुमार गंधर्व यांच्याबद्दलच्या आठवणी व त्यांच्या गायिकीची वैशिष्टे विशद करतील. सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे असे आयोजक मोहन जोशी यांनी सांगितले.