Jumbo Covid Center : Mahavikas Aghadi : Thackrey Govt : पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’! 

Categories
Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र संपादकीय

पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’!

: येनकेन प्रकारेण कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

पुणे : केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप अर्थात विरोधी पक्ष ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. महाविकास आघाडीतील महत्वाचे मोहरे या त्रासाला कंटाळले आहेत. नुकतीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेत भेट दिली. त्यांच्या भेटीवरून देखील ठाकरे सरकारला टार्गेट करण्याचे काम केंद्र सरकार करते आहे, हे आता उघड होत आहे.

: महाराष्ट्र बाबत आकस वाढला

किरीट सोमय्या हे जम्बो कोविड सेंटर ची तक्रार करण्यासाठी महापालिकेत आले होते. ते ही सुट्टीच्या दिवशी. गम्मत म्हणजे हे सेंटर चालवले जाते PMRDA कडून. महापालिकेचा त्याचा फक्त डॅशबोर्ड शी संबंध आहे. सगळी प्रक्रिया PMRDA कडून राबवली जाते. तरीही सोमय्या महापालिकेत तक्रार देण्यासाठी आले. शिवसैनिकांशी धक्काबुक्की झाल्यानंतर सोमय्या हॉस्पिटल मध्ये गेले. हॉस्पिटल मधून नंतर महापालिकेत व्हीलचेअर वर आले. सुरक्षा रक्षकांना निवेदन देताना मात्र उभा राहून फोटो काढला. संजय राऊत यांना टार्गेट करण्यासाठी सोमय्या या प्रकरणाच्या मागे लागले आहेत. त्यात कहर म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक पथक देखील पुण्यात पाठवले आहे.  यातून सिद्ध एकच होते कि यामागे जनतेची काळजी नसून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आहे.
आतापर्यंत फक्त राज्यातील विरोधी नेतेच महाविकास आघाडी सरकारविषयी आकस दाखवण्याचे काम करत होते. मात्र परवाच्या संसदेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून देखील हेच दिसून आले. शिवाय केंद्र सरकारने राज्यातील मंत्री आणि मोठ्या नेत्यांच्या मागे केंद्रीय एजेंसीचा ससेमिरा मागे लावून ठेवला आहेच.
महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे सरकार आणि त्यांचे मंत्री याचा सामना कसा करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chandrakant Patil : हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या

: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान

पुणे : सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले असल्याने गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले आणि विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला – बुलढाणा – वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असे आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

विधान परिषद निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून विजयी झालेले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला – बुलढाणा – वाशिम मतदारसंघातून विजयी झालेले वसंत खंडेलवाल यांचे मा. प्रदेशाध्यक्षांनी हार्दिक अभिनंदन केले. विधान परिषद निवडणुकीत यापूर्वीच भाजपाचे मुंबईतून राजहंस सिंह आणि धुळे – नंदूरबार मतदारसंघातून अमरिश पटेल बिनविरोध विजयी झाले असून पक्षाने एकूण सहापैकी चार जागा जिंकल्या आहेत. भाजपाला मुंबई आणि अकोला – बुलढाणा – वाशिम या जागा नव्याने मिळाल्या आहेत. प्रदेशाध्यक्षांनी सर्वच विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळली असून निवडणुकीत मतदानाची संधी मिळताच जनता भाजपाला मतदान करते. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. सदस्य म्हणून अपात्र ठरण्याच्या भितीने ते त्या त्या पक्षासोबत राहत असले तरी गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भाजपाला मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाचा विकास होणार नाही याची या लोकप्रतिनिधींना विशेषतः शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जाणीव आहे.

त्यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आमदारांच्या गुप्त मतदानाने करावी, असा विधानसभेचा मूळ नियम आहे आणि तसा प्रघातही आहे. आघाडीला आपल्याच आमदारांची खात्री नसल्याने नियम बदलून आवाजी मतदानाने निवडणूक करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपले महाविकास आघाडीला आव्हान आहे की, त्यांनी मूळ नियमानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी आणि आमदारांना गुप्त मतदानाची मुभा द्यावी, मग त्यांना कळेल की अध्यक्ष कोण होतो.

भाजपाने सहकार्य केल्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही विधान परिषद निवडणूकही बिनविरोध करावी असे ठरले होते व त्यासाठी आम्ही कोल्हापूरमध्ये उमेदवार मागे घेतला पण काँग्रेसने ठरल्याप्रमाणे पूर्ण सहकार्य केले नाही. त्या पक्षाने नागपूरच्या जागेवर निवडणुकीचा आग्रह धरला आणि अखेरीस पोरखेळ केला, अशी टीका त्यांनी केली.

Chandrkant Patil : Mahavikas Aghadi : चंद्रकांत पाटील म्हणाले, संधी मिळाली की लोक हे सरकार फेकून देतील

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

संधी मिळाली की लोक सरकार फेकून देतील

: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या दोन वर्षातील भ्रष्टाचार व गोंधळ यामुळे राज्यात प्रशासन कोसळले असून खुलेआम मोगलाई अवतरली आहे. सरकारचे शेतकरी, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, अनुसूचित जाती – जमाती, विद्यार्थी, कामगार अशा कोणाकडेच लक्ष नाही. कोविडसह सर्व विषयात अपयशी ठरलेले हे सरकार संधी मिळाली की लोक फेकून देतील, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे येथे केली.

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आघाडी सरकारने केलेली फसवणूक आणि सरकारचे अपयश स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बेफिकीरीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे राज्यातील प्रशासन कोसळले आहे. राज्याच्या एका पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर शंभर कोटी वसुलीचा आरोप केला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने चौकशी सुरू केली. न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि बरेच दिवस ते परागंदा होते. आरोप करणारे पोलीस आयुक्तही परागंदा होते. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री चौकशीच्या फेऱ्यात आहेत.

सचिन वाझे यांना खंडणीवसुलीचा आदेश दिला असा आरोप केला गेला आहे. त्या सचिन वाझे यांना सोळा वर्षांच्या निलंबनानंतर आणि उच्च न्यायालयाची प्रतिकूल टिप्पणी असतानाही परत पोलीस खात्यात सेवेत दाखल करून घेतले. वाझे यांना परत सेवेत घेण्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण गमावले आणि ते पुन्हा लागू होण्यासाठी काहीही हालचाल नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी अध्यादेश काढला तरी त्याला उच्च न्यायालयात आव्हान मिळाले असून अनिश्चितता आहे. सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांच्या एसटीचा संप चालूच आहे. सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. अनुसूचित जाती जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा घोळ आहे. शाळा महाविद्यालयांच्या वेळापत्रकाचा गोंधळ आहे. या सरकारचे कोणत्याही समाज घटकाकडे लक्ष नाही आणि कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. गेल्या दोन वर्षात या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयावरून त्यांना न्यायालयाने फटकारले आहे.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री मदत निधीत कोरोनासाठी सहाशे कोटी शिल्लक आहेत पण राज्य सरकार खर्च करत नाही. दुसरीकडे कोरोनाच्या बाबतीत सर्व काही केंद्रावर ढकलले जात आहे. महाविकास आघाडी सरकारला दारुवरचा कर कमी करता येतो तर पेट्रोल डिझेलवरचा का कमी करता येत नाही, असा आमचा सवाल आहे.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा कार्यरत व्हावेत, यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देतो. परंतु, त्यांनी आपला पदभार अन्य कोणाकडे सोपविलेला नाही आणि गेले १९ दिवस मुख्यमंत्रिपदाचे काम ठप्प आहे. गेले दहा महिने विधानसभेला अध्यक्ष नाही. अशा प्रकारे सरकार चालू शकत नाही.