MANS Vs Bageshwar Dham Sarkar | राज्याच्या गृह खात्याचे संविधान विरोधी कृत्यांना पाठबळ | धिरेंद्र शास्त्रीच्या दरबारात गृहमंत्री, पोलीस अधिकारी नतमस्तक | महा. अंनिस चा आरोप 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

MANS Vs Bageshwar Dham Sarkar | राज्याच्या गृह खात्याचे संविधान विरोधी कृत्यांना पाठबळ | धिरेंद्र शास्त्रीच्या दरबारात गृहमंत्री, पोलीस अधिकारी नतमस्तक | महा. अंनिस चा आरोप

 

MANS Vs Bageshwar Dham Sarkar |वादग्रस्त असलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरातील तीन दिवशीय सत्संग आणि दरबार कार्यक्रम 22 नोव्हेंबर २०२३ रोजी संपला असला तरी आमचे काम अद्याप संपलेले नाही. अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य, दिशाभूल, फसवणूक करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य धिरेंद्र शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यात देखील झाली आहे, असा आरोप महा. अंनिसने केला आहे. गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी पोलीस यंत्रणेकडे कार्यक्रमपूर्व केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस अधिकारी धिरेंद्र शास्त्री यांच्या चरणी लिन झाले आहेत. राज्याचा गृह विभाग अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य वक्तव्य, भाष्य, कृत्य करणाऱ्याला, दिशाभूल, फसवणूक करणाऱ्याला व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्याला बळ, पाठींबा देत आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाचे हे वर्तन संविधान विरोधी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी केले आहे. महा. अंनिसने मागण्यांचे निवेदन पुन्हा गुरुवारी पोलीस प्रशासनाला दिले आहे. पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आर राजा यांची भेट घेतली. यावेळी विशाल विमल, एकनाथ पाठक, प्रतीक पाटील उपस्थित होते.

अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. असाध्य आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देतो, आदी दावे धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या कार्यक्रमातून केले आहेत. तसेच संतांसंबंधी चुकीची बदनामीकारक वक्तव्य केली आहेत. धिरेंद्र शास्त्री यांनी महा. अंनिसच्या चमत्कार सिद्ध चाचणीला सामोरे जाण्याऐवजी पळवाट काढली आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी भक्त आणि संयोजकांमध्ये हाणामारी झाली. शहरात पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आदी सर्व बाबी या तत्सम कायद्यांच्या नियमांचा भंग करणाऱ्या असून कारवाईसाठी पात्र आहे. त्यामुळे वरील बाबींसंदर्भात गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी, अशीही मागणी महा. अंनिसने केली आहे.

 

१) पुण्यात झालेल्या सदर कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली होती. ते व्हिडीओ शूटिंग उपलब्ध करून द्यावे. प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधाने, भाष्य, वक्तव्ये, इशारे, कृत्य धिरेंद्र शास्त्री यांनी केल्याचे प्रसारमाध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडीओ तपासून धिरेंद्र शास्त्री यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट आणि तत्सम कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी. २) संतांसंबंधी धिरेंद्र शास्त्री यांनी चुकीची, बदनामीकारक वक्तव्य केली आहे. त्यामुळे धिरेंद्र शास्त्री यांना समज देण्यात यावी आणि तत्सम कायद्यांच्या आधारे गुन्हे दाखल करून कारवाई करावी. ३) धिरेंद्र शास्त्री हे चमत्काराचे अशास्त्रीय, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करत आहेत. ते दावे त्यांनी सिद्ध करून दाखवावेत आणि आमचे 21 लाख रुपये बक्षीस मिळवावे, असे आव्हान आहे. राज्यात सोईच्या ठिकाणी, तज्ञ कमिटीसमोर, निवडक कार्यकर्त्यांसह ही दावे सिद्धता चाचणी होईल. ही चाचणी घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने सहकार्य करावे आणि धिरेंद्र शास्त्री यांना हजर करावे. ४) वर्दीवर असणारे पोलीस अधिकारी हे धिरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात जाऊन शास्त्रीपुढे नतमस्तक झाले. त्यांनी अशास्त्रीय पद्धतीने समस्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे दरबारात जाणे हे महाराष्ट्र सेवा अधिनियम व तत्सम कायद्यांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. ५) धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भक्त आणि संयोजक यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. तसेच शहरात वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यासंबंधी संबंधितांवर कारवाई व्हावी. ६) धिरेंद्र शास्त्री यांची विधाने, भाष्य, कृत्ये याला महा. अंनिसचा विरोध असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे कार्यक्रमपूर्व केली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पुण्यातील कार्यक्रमात देखील पुन्हा धिरेंद्र शास्त्री यांनी अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाविरोधी, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, चुकीची माहिती देणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य केली आहेत. धिरेंद्र शास्त्री यांची ही कार्यपद्धती थांबत नाही. त्यामुळे पुन्हा पुण्यात धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. पुन्हा होणाऱ्या कार्यक्रमाला महा. अंनिसचा विरोध असणार आहे. ७) धीरेंद्र शास्त्री हे करत असलेले दावे अशास्त्रीय असल्याची उकल करून शास्त्रीय विचारधारा समाजात रुजवण्यासाठी शासन संस्थेने प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्था आदींमार्फत प्रयत्न करावेत. ८) धीरेंद्र शास्त्री यांच्या दाव्यांविरोधी महा. अंनिस शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे काम करत आहे, त्याला पाठबळ द्यावे.

भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला देव धर्म श्रद्धा उपासना स्वातंत्र्य दिले. त्याचा महा. अंनिस संघटना आदर करते. मात्र व्यक्तीची देव धर्म श्रद्धा उपासनेच्या आधारे फसवणूक, दिशाभूल, शोषण होत असेल, त्यातून सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता, कायदा सुव्यवस्थेला अडथळा येत असेल तर त्याविरोधी संघटना भूमिका, प्रबोधन, प्रतिकार, कृतिकार्यक्रम करत आली आहे. महा. अंनिसचे हे वर्तन घटनेशी सुसंगत असून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठीचे आहे. धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत. लोकांना ते सांगून प्रभावित करत असून अशास्त्रीय मार्गाने जगण्यास प्रवृत्त करत आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने विसंगत आहे. भारतीय राज्य घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. मात्र धीरेंद्र शास्त्री हे अशास्त्रीय, अवैज्ञानिक दावे करून लोकांना प्रभावित करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहोत.