Pune : MSRTC : भाजपचे जगदीश मुळीक म्हणतात; एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार

Categories
Political पुणे महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या  संपाला शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी स्वारगेट येथील आगारात जाऊन पाठिंबा दिला.

मुळीक म्हणाले, राज्यातील अकार्यक्षम महाविकास आघाडी सरकार केवळ आणि केवळ वसुली आणि अधिकाऱ्यांच्या  बदल्यांमधील भ्रष्टाचारात गुंतलेले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमध्ये सरकारला अजिबात स्वारस्य राहिलेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे.

मुळीक पुढे म्हणाले, गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यातील एक लाखांहून अधिक कर्मचार्यांचे पगार झालेले नाही. साडेतीनशे कर्मचार्यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला. आजपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये ३५ कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या. परंतु सरकारला याचे गांभीर्य नाही. केवळ आर्यन खान आणि नवाब मलिकांच्या जावयाला निर्दोष ठरविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार दिवस-रात्र कार्यरत असल्याची राज्यातील नागरिकांची भावना झालेली आहे. शासनाने तातडीने एसटी कर्मचार्यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.

Lal Pari : MSRTC : आता गावाकडून यायचं कसं?  : लाल परी बंद असल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल 

Categories
social पुणे महाराष्ट्र

आता गावाकडून यायचं कसं?

: लाल परी बंद असल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल

पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यांत जवळपास ११९ डेपोत सध्या संप सुरू आहे. त्यामुळे एसटीला रोज जवळपास ४ कोटींचा फटका बसत आहे. महागाई भत्ता व घर भत्ता या मागण्या मान्य झाल्यावर आता कर्मचारी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणच्या मागणीसाठी संप करीत आहे. त्यामुळे आता गावावरून यायचं कसं? असा सवाल प्रवासी करत आहेत.

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने जवळपास १४ ते १५ तास राज्यभर संप केला. यात त्यांनी महागाई भत्ता, घरभत्ता यासह एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, ही प्रमुख मागणी केली होती. त्यापैकी महागाई भत्ता व घर भत्ता वाढविण्याची मागणी मान्य झाली. मात्र विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून काही आगार बंद आहेत. सुरुवातीला १० ते २०  आगार बंद करण्यात आले. आताही संख्या ११९ आगारांवर गेली आहे.

जिल्ह्यातील तीन आगार बंद 

पुणे जिल्ह्यात १३ आगार आहेत. त्यापैकी रविवारी तीन आगार बंद झाले. यात नारायणगाव, राजगुरूनगर ,इंदापूर या तीन आगारात एसटीचा १०० टक्के संप झाला. यामुळे एसटी ला जवळपास ४० ते ५० लाख रुपयांचा फटका बसला.

एसटीचे 4 कोटीचे नुकसान

पुणे विभागातील तीन डेपोसह रविवारी राज्यातील 119 आगरात संप झाला.त्यामुळे एसटीला एक दिवसाचे जवळपास 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा आकडा आता वाढण्याची शक्यता आहे. कारण बंद पडणाऱ्या आगराची संख्या वाढत जात आहे.पूर्वी विदर्भ, मराठवाड्यापुरते मर्यादित असणारा संप आता पुणे, मुंबईला देखील होत आहे.

प्रवाशांना फटका

एसटी कर्मचाऱ्यांनी संपास सुरुवात केल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.दिवाळीत झालेली भाडेवाढ सहन करीत एसटीचा प्रवासी पुन्हा एसटीने प्रवास करण्यास इच्छुक आहे.मात्र संपामुळे त्याची मोठी गैरसोय होत आहे. त्याला दुप्पट व तिप्पट दर देऊन ट्रॅव्हल्सने प्रवास करावे लागत आहे.

Private Travels : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा असा ही परिणाम!

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा उलटा परिणाम

: खासगी कॅब, ट्रॅव्हल्सने सर्वसामान्य प्रवाशंची लूट सुरू केली

पुणे : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा. या तसेच इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संघटना आणि राज्य सरकार यांच्यात बोलणी सुरू आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका पुणे, मंबईतून दिवाळीनिमित्त गावाकडे गेलेला नागरिकांना बसत आहे. सोमवार (दि.८) पासून पुन्हा ते मुंबई-पुण्याकडे परतू लागले आहेत. मात्र, खासगी कॅब, ट्रॅव्हल्सने सर्वसामान्य प्रवाशंची लूट सुरू केली आहे.

एसटी गाड्यांचे मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद उस्मानाबाद, बीड, लातूरसाठी साधरण २०० ते ५०० रूपयांच्या दरमान्य भाडे आहे. मात्र, संपामुळे प्रवाशांना आपआपल्या गावावरून पुणे, मुंबईकडे येण्यासाठी अक्षरश: लूट सुरू झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्स, कॅब वाल्यांनी याचा गैरफायदा घेत गाडीभाड्यात तिप्पट-चौपट दर केले आहे.

खासगी ट्रॅव्हल्सचे वाढीव दर

शिवाजीनगर ते अमरावती १५०० रूपये

पुणे  ते उस्मानाबाद ११०० रूपये

पुणे  ते लातूर १२०० रूपये

पुणे ते बीड १००० रूपये

पुणे  ते वर्धा १२०० रूपये

पुणे ते नाशिक ५०० ते ६०० रूपये

पुणे ते नागपूर १५०० ते १८०० रूपये

पुणे ते औरंगाबाद ७०० रूपये

पुणे ते मुंबई ६०० ते ७००

MSRTC : एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ; जाणून घ्या, राज्यातील प्रमुख मार्गांचे नवे तिकीट दर

Categories
Breaking News महाराष्ट्र

लालपरीचा प्रवास महागला,

एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ;

मुंबई – एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ,  टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाकडे भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता, मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. आज मंजुरी मिळाल्याने निर्णय लागू करण्यात आला आहे.

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र  स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत आहे.
२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रकमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे

अशी असेल भाडेवाढ –

नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत असून २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

रात्रीचा प्रवास झाला स्वस्त

रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (जी सेवा सायंकाळी ७ वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा.पर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकिट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकिट दराच्या तुलनेत  १८ टक्के जास्त होते. उदयापासून सदर अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.