Maratha community students | मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता | उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता | उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबर पासून 100 मुलांचे वसतीगृह सुरु होईल यांचे कालबद्ध नियोजन करावे, तसेच याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती द्यावी तसेच वसतीगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी, महाज्योती, संबंधित जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बैठक घेऊन अंतिम नियमावली सादर करावी.

केंद्र सरकारच्या एनसीईआरटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 प्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील 200 नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ/संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख इतक्या मर्यादेत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेंतर्गत अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य याकरिता रुपये 50 हजार रुपये देण्यात येणार असून विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी ची प्रतिपूर्ती आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व भोजन शुल्क रक्कम अदा करण्यात येणार आहे.

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थीं परदेशातील नामांकित विद्यापीठामधील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे पदव्युत्तर पदवीसाठी प्रती वर्षी रुपये 30 लाख मर्यादेत आणि पीएचडी साठी रुपये 40 लाखाच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सादरीकरण केले.

SC, ST’s reservation : महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी चे आरक्षण जाहीर

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी चे आरक्षण जाहीर

पुणे : महापालिका प्रशासनाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी 58 प्रभागातील एससी आणि एसटीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण 173 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 23, तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव आहेत. त्यासाठीची लोकसंख्यानिहाय याद्या आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे 25 प्रभाग राखीव असणार आहेत.

पालिका निवडणुकीसाठी आयोगाने पुणे शहराची 2011ची 35 लाख 56 हजार 824 इतकी लोकसंख्या गृहीत धरली असून, त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 4 लाख 80 हजार 17 आहे. तर अनुसूचित जमाती लोकसंख्या 41 हजार 561 आहे. त्यानुसार लोकसंख्या गृहीत धरून हे आरक्षित प्रभाग निश्‍चित करण्यात आले आहेत.

 

दरम्यान, 25 पैकी 13 जागा या महिलांसाठी राखीव असणार असून त्यात 12 जागा अनुसूचित जाती महिला, तर 1 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी असणार आहे. तर महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत स्वतंत्रपणे काढली जाणार आहे.

 

https://www.pmc.gov.in/sites/default/files/Annexure_5.pdf