Mohan Bhagwat | सेवा हा माणुसकीचा धर्म | डॉ. मोहन भागवत

Categories
Breaking News social पुणे

सेवा हा माणुसकीचा धर्म |  डॉ. मोहन भागवत

| सेवा भवन उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालकांचे प्रतिपादन

 

स्वार्थ हा सेवेची प्रेरणा कधीही होऊ शकत नाही. सेवा धर्म गहन आहे परंतु तो माणुसकीचा धर्म आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले.
जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थांनी मिळून ‘सेवा भवन’ या सेवा प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते.

संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नाना जाधव, ‘जनकल्याण समिती’चे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, ‘जनकल्याण सेवा फाऊंडेशन’चे संचालक महेश लेले आणि ‘डॉक्टर हेडगेवार स्मारक सेवा निधी संस्थे’चे कोषाध्यक्ष माधव (अभय) माटे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. जनकल्याण समितीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘अहर्निशं सेवामहे’ याग्रंथाचे प्रकाशन या प्रसंगी सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हरीओम काका मालशे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी सरसंघचालक म्हणाले, “जनकल्याण समितीने ५० वर्षे सेवेचे हे कार्य चालविले त्याचा हा उत्सव आहे. संकटकाळात कोणी तरी उभे राहण्याची गरज असते आणि समाज संकटात असला की त्यासाठी काही ना काही करणाऱ्या व्यक्ती समाजात असतातच. देशात सर्वत्र सेवाकार्य चालू आहेत. जनकल्याण समितीचे कार्य हा त्यातील एक भाग आहे.”
ते पुढे म्हणाले, समरसता हे सेवेचे तत्त्व आहे आणि सद्भावना हा सेवेचा व्यवहार आहे. मात्र सेवेचा परिणाम सेवा हाच आहे. सेवा करताना हे आम्ही केलं हा अहंकार नसावा. समाज भरभरून देतो मात्र समाजाला हे कळावं लागतं की ही माणसं विश्वासार्ह आहेत. सेवा शब्दा हा भारतीय आहे आणि सर्व्हिस या शब्दात मोबदल्याची अपेक्षा आहे.
ते म्हणाले,”सेवा ही मजबूरी नाही किंवा ती भीतीने होऊ शकत नाही. सेवा ही आपली सहज प्रवृत्ती आहे. माणूस म्हटले की संवेदना असतेच. हे अस्तित्वाच्या एकतेचे रहस्य आहे.हे आध्यात्मिक असले तरी वास्तविक सत्य आहे. सर्वांमध्ये असलेल्या चैतन्यामुळे करूणा हा गुण येतो.”
प्रास्ताविक करताना डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले, “जनकल्याण समिती गेली ५९ वर्षे कार्यरत आहे. सध्या विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात समितीचे १८८० प्रकल्प सुरू आहेत.”

तुकाराम नाईक यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. जनकल्याण समितीचे प्रांत सहमंत्री विनायक डंबीर यांनी ग्रंथाची माहिती दिली. अभय माटे यांनी आभार प्रदर्शन केले.

Mohan Bhagwat | Pune | शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत पुण्यात काय बोलणार?

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Mohan Bhagwat | शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत पुण्यात काय बोलणार?

जनकल्याण समितीच्या ‘सेवा भवन’ प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते

पुणे- रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हाती घेण्यात आलेला ‘सेवा भवन’ हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी, ४ मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होईल. कोथरूड-पटवर्धनबाग परिसरात हा सेवा प्रकल्प साकारला आहे. दरम्यान नुकतीच झालेली पोटनिवडणूक आणि राज्याचे राजकारण यावर सरसंघचालक काय बोलणार, याबाबत सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे.

जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत ही माहिती दिली. ‘जनकल्याण सेवा फाउंडेशन’चे संचालक सीए महेश लेले, आणि ‘डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी’चे कोषाध्यक्ष सीए माधव (अभय) माटे हेही या वेळी उपस्थित होते. या तीन संस्थांनी मिळून ‘सेवा भवन’ची निर्मिती केली आहे. ‘सेवा भवन’ ही वास्तू सात मजली असून एकूण बांधकाम २७ हजार चौरसफुटांचे आहे.

‘सेवा भवन’ या प्रकल्पामध्ये एका मजल्यावर अल्प शुल्कातील डायलेसिस सेंटर चालवले जाणार आहे. अन्य तीन मजल्यांवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अल्प शुल्कातील उत्तम निवास व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था उपलब्ध असेल. एका मजल्यावर रुग्ण आणि नातेवाईकांसाठी मार्गदर्शन तसेच माहिती केंद्र चालवले जाणार आहे. इमारतीच्या तळमजल्यावर ‘जनकल्याण समिती’तर्फे कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण केंद्र चालवले जाणार आहे. ‘जनकल्याण समिती’च्या तसेच महाराष्ट्रातील अन्य सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी येथे अद्ययावत सभागृह तयार करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. साताळकर यांनी दिली.

‘सेवा भवन’चे उद्घाटन शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होईल. कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीजवळ असलेल्या गांधी लॉन येथे हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. मोहनजी भागवत यांचे यावेळी मुख्य भाषण होईल. पुणेकरांनी डॉ. भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. साताळकर यांनी केले. ‘जनकल्याण समिती’च्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणार्‍या ‘अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाचे प्रकाशनही डॉ. भागवत यांच्या हस्ते कार्यक्रमात केले जाणार आहे.

Seva Bhavan : Jankalyan Samiti : सुवर्णमहोत्सवी वर्षात जनकल्याण समितीतर्फे ‘सेवा भवन’ ची निर्मिती

Categories
cultural social पुणे

सुवर्णमहोत्सवी वर्षात जनकल्याण समितीतर्फे ‘सेवा भवन’ ची निर्मिती

 

पुणे : रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला रथसप्तमीच्या दिवशी (७ फेब्रुवारी २०२२ ) प्रारंभ होत असून या वर्षात अनेकविध नवे सेवा प्रकल्प समितीतर्फ़े सुरु केले जाणार आहेत. या वर्षात जनकल्याण समितीतर्फे पुण्यातील एरंडवणे परिसरात ‘सेवा भवन’ ही वास्तू साकारणार आहे. अत्यल्प दरातील डायलिसीस केंद्र तसेच रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास व भोजन व्यवस्था सेवा भवन मध्ये असेल.

जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . समितीचे कार्यवाह तुकाराम नाईक यावेळी उपस्थित होते.

पुण्यात एरंडवणे – पटवर्धन बाग परिसरात ‘सेवा भवन’ ही आठ मजली वास्तू उभी केली जात आहे. त्यातील एका मजल्यावर पंधरा बेड्चे डायलिसीस सेंटर असेल . तसेच तीन मजल्यावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी छत्तीस खोल्या बांधल्या जाणार आहेत. तेथील भोजन व निवास व्यवस्था अत्यल्प दरात असेल.

या वास्तूतील एका मजल्यावर जनकल्याण समितीचे निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची योजना आहे. वैद्यकीय समुपदेशन कक्षही चालवला जाणार आहे. ही आठ मजली इमारत एकोणतीस हजार चौरस फुटांची असेल .

सुवर्णमहोत्सवी वर्षात जनकल्याण समितीतर्फे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत असलेल्या व्यक्ती तसेच संस्थांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ ७ फेब्रुवारी २०२२ रोजी होईल.

जनकल्याण समितीतर्फे महाराष्ट्र प्रातांत सेवेचे सात मोठे प्रकल्प चालवले जात असून लहान मोठी १५८० सेवाकार्ये चालविली जात आहेत. यात प्रामुख्याने शिक्षण, संस्कार, आरोग्य, कृषी आणि पर्यावरण, अन्नपूर्णा प्रकल्प, पूर्वांचल छात्रावास, ग्राम आरोग्य रक्षक, निवासी विद्यालय, आपत्ती विमोचन आदी

अनेक कामांचा, क्षेत्रांचा समावेश आहे. सहा हजारांहून अधिक महिला पुरुष कार्यकर्त्यांचे या सेवा कार्यांमध्ये योगदान आहे.

फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रकल्प समितीतर्फे १६ जिल्ह्यात चालवला जातो. चालू वर्षात आणखी ९ जिल्ह्यात या प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे. तसेच २०० रुग्ण उपयोगी साहित्य केंद्रांचे ऑनलाईन अँप आणि पोर्टलची निर्मिती या वर्षात केली जाईल.