Mohan Bhagwat | सेवा हा माणुसकीचा धर्म | डॉ. मोहन भागवत

Categories
Breaking News social पुणे
Spread the love

सेवा हा माणुसकीचा धर्म |  डॉ. मोहन भागवत

| सेवा भवन उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालकांचे प्रतिपादन

 

स्वार्थ हा सेवेची प्रेरणा कधीही होऊ शकत नाही. सेवा धर्म गहन आहे परंतु तो माणुसकीचा धर्म आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले.
जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थांनी मिळून ‘सेवा भवन’ या सेवा प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते.

संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नाना जाधव, ‘जनकल्याण समिती’चे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, ‘जनकल्याण सेवा फाऊंडेशन’चे संचालक महेश लेले आणि ‘डॉक्टर हेडगेवार स्मारक सेवा निधी संस्थे’चे कोषाध्यक्ष माधव (अभय) माटे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. जनकल्याण समितीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘अहर्निशं सेवामहे’ याग्रंथाचे प्रकाशन या प्रसंगी सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हरीओम काका मालशे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी सरसंघचालक म्हणाले, “जनकल्याण समितीने ५० वर्षे सेवेचे हे कार्य चालविले त्याचा हा उत्सव आहे. संकटकाळात कोणी तरी उभे राहण्याची गरज असते आणि समाज संकटात असला की त्यासाठी काही ना काही करणाऱ्या व्यक्ती समाजात असतातच. देशात सर्वत्र सेवाकार्य चालू आहेत. जनकल्याण समितीचे कार्य हा त्यातील एक भाग आहे.”
ते पुढे म्हणाले, समरसता हे सेवेचे तत्त्व आहे आणि सद्भावना हा सेवेचा व्यवहार आहे. मात्र सेवेचा परिणाम सेवा हाच आहे. सेवा करताना हे आम्ही केलं हा अहंकार नसावा. समाज भरभरून देतो मात्र समाजाला हे कळावं लागतं की ही माणसं विश्वासार्ह आहेत. सेवा शब्दा हा भारतीय आहे आणि सर्व्हिस या शब्दात मोबदल्याची अपेक्षा आहे.
ते म्हणाले,”सेवा ही मजबूरी नाही किंवा ती भीतीने होऊ शकत नाही. सेवा ही आपली सहज प्रवृत्ती आहे. माणूस म्हटले की संवेदना असतेच. हे अस्तित्वाच्या एकतेचे रहस्य आहे.हे आध्यात्मिक असले तरी वास्तविक सत्य आहे. सर्वांमध्ये असलेल्या चैतन्यामुळे करूणा हा गुण येतो.”
प्रास्ताविक करताना डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले, “जनकल्याण समिती गेली ५९ वर्षे कार्यरत आहे. सध्या विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात समितीचे १८८० प्रकल्प सुरू आहेत.”

तुकाराम नाईक यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. जनकल्याण समितीचे प्रांत सहमंत्री विनायक डंबीर यांनी ग्रंथाची माहिती दिली. अभय माटे यांनी आभार प्रदर्शन केले.