Chandrkant Patil | BJP | सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागा! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपा कार्यकर्त्यांना सूचना

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागा!

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजपा कार्यकर्त्यांना सूचना

| खासदार गिरीश बापट आणि भाजपाचे हेमंत रासने यांची भेट

कसबा विधानसभा पोटनिवडणुक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा खासदार गिरीश बापट आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली. यावेळी हेमंत रासने यांच्या भेटीत कार्यकर्त्यांना संवाद साधून पुन्हा जोमाने कामाला लागण्याची सूचना केली.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा अनपेक्षित पराभव झाला. या पराभवानंतर काही कार्यकर्ते निराश झाले होते. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी रासने यांच्या घरी कसबा मंडलाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीत पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोट निवडणुकीत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. संघर्ष हा भाजपाचा स्थायीभाव आहे. संघर्षाच्या बळावरच आपण अनेक आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना करुन परतवून लावली. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे,” असा विश्वास दिला. यानंतर सर्वांनी आता जिंकेपर्यंत लढायचं, असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबियांशी ही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संवाद साधला. त्यांनाही कामाला लागण्याची सूचना केली. त्यावर हेमंत रासने यांच्या पत्नी सौ. मृणाली रासने यांनी ‘निवडणुकीच्या काळात सर्वांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. यातून सर्वांचे रासने कुटुंबासोबत अतूट नाते निर्माण झाले आहे. हे नाते जपण्यासोबतच अजून पुढे वाढविणार’ असल्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, रासने यांच्या भेटीपूर्वी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी खा. गिरीश बापट यांचीही सदिच्छा भेट घेतली‌. यावेळी श्री. पाटील यांनी खा. बापट तब्येची विचारपूस केली. ‘बापट साहेब आपण काळजी घ्या, आणि लवकर बरे व्हा!’ अशी सदिच्छा व्यक्त केली.