PMC : Ward Formation : राजकीय लोकांचा प्रभाग रचनेत हस्तक्षेप : प्रशांत जगताप : व्हायरल संभाव्य प्रभाग रचनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

व्हायरल संभाव्य प्रभाग रचनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार

: राजकीय लोकांचा प्रभाग रचनेत हस्तक्षेप : प्रशांत जगताप

पुणे : सायंकाळपासून समाज माध्यमांमध्ये पुणे शहराची संभाव्य प्रभाग रचना म्हणून एक आराखडा व्हायरल होत आहे. प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आम्हाला माध्यमांमधून व पुणे महापालिकेच्या वर्तुळातून समजते, असे असताना काही राजकीय मंडळी जाणीवपूर्वक सदर प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतात. असा आरोप राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. या संदर्भामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे पुणे सायबर पोलिसांकडे जगताप यांनी आज सायंकाळी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत प्रशांत जगताप म्हणाले,   महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आम्हाला माध्यमांमधून व पुणे महापालिकेच्या वर्तुळातून समजते, असे असताना काही राजकीय मंडळी जाणीवपूर्वक सदर प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतात. किंबहुना त्यामध्ये अफवा पसरविण्याच्या प्रयत्न करत असतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात पुणे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. असे असताना सायंकाळपासून समाज माध्यमांमध्ये पुणे शहराची संभाव्य प्रभाग रचना म्हणून एक आराखडा व्हायरल होत आहे. अशा प्रकारच्या व्हायरल प्रभाग यादी रचनेचा आराखडा विविध ग्रुप व्हाट्सअप ग्रुप वर आम्हाला सुध्दा पाहायला मिळाला. ही घटना महानगरपालिकेच्या अंतर्गत कामकाजाच्या गोपनीयतेचा भंग आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणूनच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यामागे कुठली व्यक्ती अथवा संघटना आहे हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून या संदर्भामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे पुणे सायबर पोलिसांकडे आम्ही आज सायंकाळी तक्रार दाखल केली असून हा नकाशा कुणाच्या माध्यमातून तयार करण्यात आला, तसेच हा नकाशा कोणी समाज माध्यमांवर व्हायरल केला यासंबंधी व्यक्ती व संघटना यांचा कसून शोध घ्यावा अशी मागणी आम्ही पुणे सायबर पोलिसांकडे केली आहे. पुणे सायबर पोलिस या गोष्टीचा सखोल तपास करतील व संबंधित आरोपीस वर कारवाई करतील,असा आम्हाला विश्वास आहे. असे ही जगताप म्हणाले.

Ward Formation : PMC : प्रभाग रचनेत आयोगाच्या 24 सूचना  : महापालिकेने केले सादरीकरण 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

प्रभाग रचनेत आयोगाच्या 24 सूचना

: महापालिकेने केले सादरीकरण

पुणे : महापालिका प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करताना ऐनवेळी झालेल्या बदलांची चर्चा रंगलेली असताना आज (ता. १३) निवडणूक आयोगापुढे झालेल्या सादरीकरणात २४ बदल सुचविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार हे बदल करावे लागणार आहेत.

पुणे महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यात होणे अपेक्षीत आहे. प्रभाग रचना जाहीर करण्यास उशीर झाल्यास किंवा इतर राजकीय पेच निर्माण झाल्यास ही निवडणूक काही आठवडे पुढे ढकलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ही निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. त्यामध्ये त्यानुसार महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. ३० नोव्हेंबर ही रचना पूर्ण होऊ शकली नसल्याने ६ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

आयोगाला अहवाल सादर करण्याच्या शेवटच्या दिवसात मोठे बदल करण्यात आले. त्यातच भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्या सोईनुसार प्रभाग रचना करावी यासाठी दबाव आणल्याची चर्चा आहे. तसेच सर्वच पक्षातील मातब्बर नगरसेवकांसाठी प्रभाग रचना अनुकूल झाल्याचीही चर्चा आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर झाल्यानंतर आयोगाने आज याचे सादरीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सादरीकरण केले.

शहरातील सर्व ५८ प्रभागांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रभागांची सीमा, लोकसंख्या यासह इतर तांत्रिक माहिती देण्यात आली. हे सादरीकरण झाल्यानंतर प्रारूप रचनेत काही ठिकाणी बदल करणे आवश्‍यक आहे असे निरीक्षण आयोगाने नोंदविले. त्यानुसार २४ बदल करण्यास सांगितले आहे. दरम्यान, ही कार्यवाही झाल्यानंतर आयोगाकडून प्रारूप आराखडा हरकती सूचनासाठी खुला करण्याची प्रक्रिया केली जाईल.

Hemant Rasne : PMC : प्रभाग विकासाचे मॉडेल राबविणार : स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Categories
PMC Political पुणे

प्रभाग विकासाचे मॉडेल राबविणार

: स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

पुणे : पुणेकरांना सर्वप्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रभाग विकासाचे मॉडेल विकसित करण्यात आले असून प्रायोगिक तत्त्वावर उद्यापासून त्याची अंमबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, एक प्रभाग एक एकक मानून प्रभागाचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी प्रभाग क्रमांक 15 मधील विकासकामांची पाहाणी करणार आहेत. नागरिकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यानुसार विकासकामांचे मॉडेल तयार केले जाणार आहे. या मॉडेलची नियोजनबध्द अंमलबावणी केली जाणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या 42 प्रभागांमध्ये हे मॉडेल राबविण्यात येईल.
रासने पुढे म्हणाले, समान पाणी पुरवठा, रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन या पुणेकरांच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पुरविण्यासाठी विविध खात्यांतर्गत समन्वयाची गरज असते. परंतु बहुतेकदा हा समन्वय नसल्याने एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा काम करावे लागते. त्यामुळे निधीचा अपव्यय तर होतोच पण सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते.  प्रभाग विकासाच्या मॉडेल मध्ये या सर्व बाबींचा एकत्रित समावेश केला जाईल. त्यामुळे पुणेकरांना गुणवत्तापूर्ण मूलभूत सुविधा मिळू शकतील.
रासने पुढे म्हणाले, सर्वच प्रभागांमध्ये प्राधान्याने हेच मूलभूत प्रश्न आहेत. त्या सोडविण्यासाठी पुन्हा पुन्हा लोकप्रतिनिधी, प्रशासन, अधिकारी यांना वारंवार प्रकल्प भेटी कराव्या लागणार नाहीत. त्यामुळे वेळेची बचत होऊन गतीने विकासकामे मार्गी लागतील.
उद्या सकाळी साडेसात वाजता आयुक्त विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले मंडई येथून हा उपक्रम सुरू होईल.