Abhang English Medium School : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ  उत्साहात संपन्न

Categories
Education पुणे
Spread the love

अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ  उत्साहात संपन्न

: शाळेचा प्रथम वार्षिक अंक ‘सृजनदीप’ चे प्रकाशन

श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. तसेच शाळेच्या ‘सृजनदीप’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.

शाळेच्या नावाप्रमाणेच या शाळेचे विद्यार्थी आपल्या ज्ञानाने संस्थेचा नावलौकिक अभंग करतील असे मत श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष  बाळासाहेब काशिद यांनी याप्रसंगी व्यक्त केले. मुलांनो तुम्ही नेहमी खरे बोला… कोणाला फसवू नका. तसेच शिक्षकांनी नीतिमूल्यांचे संस्कार करून मुलांना घडवावे असे मनोगत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, विचारवंत श्री अनंत पद्मनाभन यांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या शुभहस्ते मागील दोन वर्षातील स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. कृतीयुक्त आनंददायी शिक्षण प्रणालीतून शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात… वर्षभर राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती पालकांना मिळावी, मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी व मुलांनी देखील लवकर लिहिते व्हावे या भावनेतून दरवर्षी सृजनदीपची निर्मिती केली जाईल असे मत संस्थेचे सचिव प्रा. विकास कंद व प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी मांडले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या वर्षी संपन्न होत असल्याने इ. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयाचा प्रवास या संकल्पनेवर आधारित स्वातंत्र्य लढ्यातील विविध प्रसंगाची चित्रफितींसह माहिती देत विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करीत विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम सादर केला. आपल्या या पिढीला स्वातंत्र्याचे मोल पून्हा एकदा समजावे, स्वातंत्र्यसंग्राम पून्हा एकदा माहीती व्हावा, म्हणूनच हा इतिहासजमा झालेला इतिहास अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिवंत करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य लढ्यातील काही ठळक घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला. १८५७ चा उठाव, राणी लक्ष्मीबाईंचा प्रतिकार, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय आदी समाजसुधारकांची सामाजिक चळवळ, बंगालची फाळणी, चंपारण्याचा सत्याग्रह, जालियनवाला बाग हत्याकांड, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आदी क्रांतिकारकांचे देशासाठी बलिदान, दांडी यात्रा, सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना आणि शेवटी झालेली स्वातंत्र्याची पहाट या घडामोडींवर आधारित साजेसा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. महात्मा गांधींची दांडी यात्रा ही या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणबिंदू ठरली. इ. दुसरीतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांमधून दांडी यात्रा आणीत सत्य, अहिंसा, प्रेम आणि स्वावलंबन या चतु:सूत्रीचा, रघुपती राघव राजाराम या बापूजींच्या लोकप्रिय प्रार्थनेतून प्रत्यय आणून देत रसिक पालकांची दाद मिळवली. इ. पहिलीतील विद्यार्थ्यांनी झाशीच्या राणीचा प्रतिकार, भारताची विविधता, कृषिप्रधान भारत आपल्या नृत्यातून साकारीत उपस्थितांची मने जिंकली. इ. तिसरीतील विद्यार्थ्यांनी आपल्या नेत्रदीपक सादरीकरणाने डोळ्यांचे पारणे फेडले. जात, धर्म, पंथ, देश हे वेगवेगळे न मानता ‘हे विश्वचि माझे घर’ या उक्तीनुसार भारतीय हीच आपली जात… आणि माणुसकी हाच आपला धर्म… हा संदेश देत, माणसाने माणसाशी माणसासम वागणे… ही सामुहिक प्रार्थना घेण्यात आली. या प्रार्थनेने सारे अभंग संकुल दुमदुमले.

यावेळी प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सृजन फाउंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षिका प्राची पोटावळे व  वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक यांनी आभार प्रदर्शन केले .

2 replies on “Abhang English Medium School : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ  उत्साहात संपन्न”

अतिशय सुंदर मांडणी, थोड्या मनःपूर्वक च दिवसात अतुलनीय यश संपादन करत आहात आपल्या ऑनलाइन वार्तापत्र या माध्यमातून…….

Leave a Reply