Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदान दिनानिमित्त पुण्यात दोन दिवस स्मृतिजागर, निर्भय मॉर्निंग वॉक, विवेक निर्धार मेळावा

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र
Spread the love

 डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदान दिनानिमित्त पुण्यात दोन दिवस स्मृतिजागर, निर्भय मॉर्निंग वॉक, विवेक निर्धार मेळावा

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला (दि.२०) नऊ वर्षे होत आहेत. मात्र अद्याप मारेकऱ्यांवर ठोस कारवाई होऊ शकलेली नाही. त्यामुळे दाभोलकरांना अभिवादन करत असतानाच सरकार आणि तपास यंत्रणेपर्यन्त कार्यकर्त्यांचा संघटित आवाज पोचवण्यासाठी पुण्यात शुक्रवार (दि. १९) व शनिवार (दि.20) स्मृतिजागर, निर्भय मॉर्निंग वॉक, विवेक निर्धार मेळावा होत आहे.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने पुण्यात कार्यक्रम होत आहे. सनातनी धर्मांध प्रवृत्तीनी दाभोलकरांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे मॉर्निंग वॉकच्या वेळी खून केला. याच पुलावर दाभोलकरांच्या बलिदान दिनाच्या पूर्वसंध्येला आज (दि.१९) संध्याकाळी ५-३० वाजता स्मृतीजागर करण्यात येणार आहे. मेणबत्त्या पेटवून विवेक जागर, गाणी सादर केली जाणार आहेत. दाभोलकरांच्या बलिदान दिनी उद्या (दि.२०) सकाळी 7 वाजता विठ्ठल रामजी पुलापासून नवी पेठ येथील एस एम जोशी सभागृहापर्यन्त निर्भय मॉर्निंग वॉक होणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ वाजता एस एम जोशी सभागृह येथे विवेक निर्धार मेळावा होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार असून पुण्यातील समविचारी पक्ष, संस्था संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले बोलणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील असणार आहेत. महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, प्राचार्य शशिकांत पट्टन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यातून आलेले कार्यकर्ते प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करणार आहेत.

 राज्यभर शाखा करणार अभिवादन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तीनशेहून अधिक शाखांच्या माध्यमातून काम चालते. या सर्व शाखा स्थानिक पातळीवर दाभोलकरांना अभिवादन कार्यक्रम करणार आहेत. तसेच मॉर्निंग वॉक, तपासातील दिरंगाईबद्दल तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहे.

 राष्ट्रीय वैज्ञानिक दिनानिमित्त महिनाभर कार्यक्रम

ऑल इंडिया पिपल्स सायन्स नेटवर्कच्या पुढाकाराने २०१९ पासून दाभोलकरांचा बलिदान दिन हा राष्ट्रीय वैज्ञानिक दिन म्हणून पाळला जातो. त्यामुळे 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या महिनाभरात राज्यसह परराज्यातही विविध कार्यक्रम होणार आहे. मानवी जीवनाच्या सर्वक्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार हा विषय घेऊन कार्यक्रम होणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक, समविचारी कार्यकर्ते, शिक्षण संस्था, प्रशासन यांच्यासोबत कार्यक्रम होणार आहेत.