Spread the love

भोंग्यावरून मनसेत दोन मतप्रवाह!

पुणे : मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून अजानला विरोध केला जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेच्या पुण्यातील एका मुस्लिम कार्यकर्त्याने पक्ष सोडला आहे. तर खुद्द शहर अध्यक्ष वसंत मोरे देखील नाराज आहेत. तर दुसरीकडे पदाधिकारी म्हंणतात कि राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा. यामुळे शहर मनसेत दोन मतप्रवाह झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर थांबवावा, अशी मागणी राज्य सरकारला केली. तसेच प्रतिकार म्हणून हनुमान चालिसा लावा, असा आदेशही कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र त्याला विरोध होताना दिसत आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) धार्मिकवादामुळे आपण राजीनामा दिल्याचे शाखा अध्यक्ष माजीद शेख यांनी सोमवारी सांगितले. शेख म्हणाले की, राज ठाकरे राज्याच्या विकासाच्या गप्पा मारायचे, पण आता ते राजकारणासाठी जाती-धर्माचा आधार घेत आहेत.

वास्तविक पाहता भाषणात राज ठाकरे यांनीच जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. मात्र त्याचवेळी आपण धर्माचं राजकारण करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांची जात आणि धर्मसंदर्भातील भूमिका एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्यासारखी असल्याचं अनेकांना वाटत आहे.

 

दरम्यान पुण्यातील मनसे नेते आणि शहर अध्यक्ष वसंत मोरे हे देखील राज ठाकरे यांच्या नव्या आदेशामुळे संभ्रमात असल्याचं दिसून येत आहे. ते म्हणाले की, माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल. तसेच मी माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार. कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही. मात्र मलाच कळेना झाले आहे, मी काय भूमिका घ्यावी, असा संभ्रम वसंत मोरे यांनी बोलून दाखवला.

तर साईनाथ बाबर यांनी आपण नाराज नसल्याचे म्हटले आहे. तर मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटले आहे कि, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश अंतीम, होय आम्ही हिदूच ! वैयक्तिक भूमिकेला पक्षात स्थान नाही. यामुळे मनसेत आता दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply