ST workers : Ajit pawar : आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना सांगायचो… अजित पवार म्हणाले…

Categories
Breaking News Political महाराष्ट्र
Spread the love

आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना सांगायचो… अजित पवार म्हणाले…

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केलं. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी तर १०९ आंदोलक कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगू लागला असतानाच एसटी कर्मचाऱ्यांना आधीपासूनच सतर्क केलं होतं, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर केलेल्या आंदोलनामागे इतर काही शक्ती असल्याचा दावा अजित पवारांनी शनिवारी बोलताना केला होता. तसेच, जिथे माध्यमांना असं काही होणार असल्याची माहिती मिळते, तिथे पोलिसांना का मिळत नाही? असा सवाल करून हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे, असं देखील अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आज अजित पवारांनी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांविषयी भूमिका मांडल

“चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका सांगितलं होतं”

“एसटीच्या संदर्भात आम्ही सगळेच सांगायचो की बाबांनो, तुम्ही सगळे ड्रायव्हर, कंडक्टर आपले आहात. तुम्ही कारण नसताना कुणाच्यातरी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका. त्यांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका. हे तुम्हाला अडचणीत आणतील. पण काही जण जाणीवपूर्वक समाजात नीट कारभार चाललेला असताना त्यात खोडा कसा घालता येईल? नवीन समस्या कशा निर्माण करता येतील? लोकांमध्ये गैरसमज कसा निर्माण करता येईल? लोकांच्या भावना कशा भडकवता येतील? असे प्रकार करत आहेत”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

“खूप काही कानावर आलंय…”

दरम्यान, कालच्या घटनेबाबत खूप काही माझ्या कानावर आलंय, असा दावा अजित पवार यांनी शनिवारी बोलताना केला आहे. “कालच्या घटनेबाबत खूप काही कानावर आलं आहे. पण त्याबाबत वास्तव परिस्थिती समोर आल्याशिवाय आम्ही बोलणं योग्य ठरणार नाही. जे कुणी आले होते, ते सगळे सुस्थितीत होते, अशातला भाग नाही. काही वेगळ्या गोष्टी देखील तिथे घडत होत्या”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Leave a Reply