Road Development Works | पुणे शहरासह जिल्ह्यात 53 हजार कोटी रुपयांची कामे सुरु : नितीन गडकरी

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

पुणे शहरासह जिल्ह्यात 53 हजार कोटी रुपयांची कामे सुरु : नितीन गडकरी

पुणे शहरासह जिल्ह्यात रस्ते विकासाची सुमारे 53 हजार कोटी रुपयांची कामे सुरू असून त्यात पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि शहरातील वर्तुळाकार मार्गाचा समावेश असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गांची हवाई पाहणी केली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून केले जाणारे काम त्यांनी तपासले. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी आज बोलले.

कामाचा आढावा घेतल्यानंतर येत्या मे महिन्यापर्यंत या दोन्ही मार्गांचे मिळून सुमारे 60 ते 70 टक्के काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वर्षाअखेर हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी वारी आणि पर्यायाने पालखी हा खूप महत्वाचा, अस्थेचा विषय आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

   

देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्वपूर्ण क्षेत्र आहेत. हा भक्ती मार्ग साधारण नसावा,  इथे आम्ही विशेषत्व जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. 

या मार्गांवरील दुपदरी रस्ते चौपदरी करत आहोत आणि वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेणार आहोत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

यासह पुण्यातील चांदणी चौकातील मार्गाचे अपूर्ण काम येत्या एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

दौंड-बारामती मार्गे नवी मुंबई मधील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत नवीन रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आपण रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला असल्याचे गडकरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

राज्यातील महामार्गाच्या कामासाठी लागणारे सिमेंट आणि पोलाद यावरील वस्तू सेवा कर राज्य शासनाने माफ करावा, त्याचबरोबर धरणांमधील वाळू काढून त्याचा वापर रस्ते बांधकामासाठी केला जावा, अशी विनंती करणार असल्याचे देखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.