Shree Siddheshwar Yatra : Gormale : आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा 

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र
Spread the love

आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा 

 :श्री सिद्धेश्वराच्या तीन दिवसीय यात्रेतून मिळवला जातो वर्षभराचा उत्साह 

 
 
संस्कृती, परंपरा टिकवून ठेवतात ती खेडीच. ही उक्ती सार्थ करण्याचे काम सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील गोरमाळे गाव करताना दिसून येते. चैत्र महिन्यात गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची तीन दिवसीय यात्रा असते. या यात्रेच्या माध्यमातून गेल्या शेकडो वर्षांपासून गावाने ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा जपलीय. आधुनिक आणि डीजे च्या जमान्यातही अशा परंपरा जपत असल्यामुळे गाव पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच भक्तिभाव जपत मनोरंजन होतेच शिवाय ग्रामस्थांना वर्षभराचा उत्साह आणि प्रेरणा देखील या माध्यमातून मिळते.
सोंग या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे नाटकांत घेतलेली भूमिका, वेष, पार्ट. तसेच ढोंग, मिष, बनावट वेष, नक्कल, आवि- र्भाव असा ही अर्थ घेतला जातो. सोंग म्हणजे नाट्याविष्कार मानला जातो. हे नाट्यविषकर अर्थात सोंग हे गोरमाळ्याच्या यात्रेत वठवली जातात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे छबिना ची पालखी निघताना ही सोंगे केली जातात. ज्या माध्यमातून पौराणिक देखावे सादर केले जातात. महाभारत, रामायणातील निवडक पात्रे निवडून या भूमिका वठवल्या जातात. ज्यासाठी बैलगाड्याचा उपयोग केला जातो. चालत्या बैलगाड्यामध्ये एकमेकासमोर उभे ठाकत अभिनय केला जातो. या माध्यमातून पौराणिक पात्रे जिवंत असल्याचा अनुभव यात्रा बघायला आलेल्या भाविकांना मिळतो. विशेष म्हणजे बायकांची पात्रे देखील पुरुषच वठवतात. गावातील ही सर्व मंडळी आपल्या अंगातील कला किंवा सुप्त गुण अशा पद्धतीने दर्शवतात. त्यामुळे साहजिकच मनोरंजन तर होतेच शिवाय परंपरा टिकण्यास देखील मदत होते.
सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील यात्रेत छबिना असतोच. मात्र सगळीकडे सोंगे असत नाहीत. मात्र गोरमाळे गावाने ही पद्धत टिकवून ठेवलीय. डीजे च्या तालावर नाचणाऱ्या युवकांना देखील याच सोंगाचे अप्रूप आहे. त्यामुळे त्यांचा सहभाग वाढलेला दिसून येतो. त्यामुळे गावाच्या या उपक्रमाबाबत गावाचे कौतुक होते. 
 
 
गावाची यात्रा आणि उत्सवाबाबत माहिती देताना मंदिराचे पुजारी हनुमंत माळी यांनी सांगितले कि, चैत्र कृष्ण प्रतिपदेपासून पासून उत्सवाची सुरुवात होते. पहिल्या सप्ताहात नवनाथ कथा ठेवली जाते. ज्या माध्यमातून दर दिवशी कीर्तन ठेवले जाते. मुख्य उत्सव अष्टमीला सुरु होतो. 
अष्टमी ला रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत दंडवत असतात. वेशी पासून ते सिद्धेश्वराच्या मंदिरापर्यंत दंडवत घेतला जातो. या काळात साधारणतः 1500-2000 लोक दंडवत घेतात. गावचे शिवाय बाहेर गावचे लोक देखील यात सहभाग घेतात. माळी पुढे म्हणाले, याच दिवशी देवाला आंबील चा नैवेद्य दिला जातो. तर दुसरा दिवस हा छबिन्याचा असतो. रात्री पालखीची मिरवणूक निघते. त्याआधी महाप्रसाद दिला जातो. देवाचे वाहन हत्ती म्हणून त्याला सजवले जाते. त्यावर राजा आणि दोन राण्यांना अंबारीत बसवून मंदिरापासून गावात मिरवणूक आणली जाते. त्याच्या मागोमाग सोंगाच्या गाड्या लावल्या जातात. पहाटे पर्यंत हा कार्यक्रम चालतो. तिसरा दिवस हा कुस्त्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला असतो. माळी पुढे म्हणाले, 500 वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. तेव्हापासून या परंपरा चालत आल्या आहेत. ज्या आधुनिक युगातही टिकून आहेत. शिवाय गाव आणि मंदिराबाबत वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जाताना गोरमाळे गावाहून जात असत. याबाबत वेगवेगळे प्रवाद असू शकतात. मात्र अशी आख्यायिका सांगितली जाते.
 

: एकीचे दर्शन आणि व्यवस्थापनाचे धडे 

 
सर्वसामान्यपणे शहर, राज्य आणि देशात आज काल राजकारणाचा मोठा बोलबाला आहे. सर्व थरात ते पसरले आहे. गोरमाळे गाव तरी त्यापासून दूर कसे असू शकेल. मात्र या  दिवसांत राजकारण बाजूला ठेवून सर्व एक झालेले दिसून येतात. शिवाय कुणाला हे काम कर म्हणून सांगण्याची गरज पडत नाही. कसलाही भांडण तंटा होत नाही. हे एकीचे दर्शन म्हणजे एक आदर्शच झाला आहे. 
 
शिवाय प्रत्येक कामासाठी कमिट्या देखील बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सप्ताह कमिटी, यात्रा कमिटी, अन्नदान कमिटी चा समावेश आहे. यातला प्रत्येकजण आपले काम चोखपणे बजावत असतो. ज्यामुळे यात्रा निर्विघ्नपणे पार पडते. आधुनिक व्यवस्थापन सुद्धा जिथे थिटे पडेल, असे काम ग्रामस्थ करताना दिसतात. 
https://youtube.com/shorts/V84vmAj4xWM?feature=share
 

: गुणवंतांचा सत्कार आणि होतकरूंना प्रेरणा 

 
गावात आता युवक वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करताना दिसून येत आहेत. स्पर्धा परीक्षा मध्ये देखील तरुणांनी आघाडी घेतली आहे. यावर्षी नुकतीच दयानंद शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक अर्थात PSI पदी निवड झाली. तसेच राजकुमार दळवी यांची पोलीस या पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे यात्रेत त्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे होतकरू तरुणांना प्रेरणा मिळवी, या हेतूने हे सन्मान करण्यात आले. या अगोदर देखील बऱ्याच युवकांनी स्पर्धा परीक्षांत बाजी मारली आहे. 
 
कोरोनामुळे गेली दोन वर्ष यात्रा होऊ शकली नव्हती. यंदाची यात्रा मात्र ग्रामस्थांना निखळ आनंद देऊन गेली. 

One reply on “Shree Siddheshwar Yatra : Gormale : आधुनिक जमान्यातही गोरमाळे गावाने जपलीय ‘छबिना’ आणि ‘सोंगा’ ची परंपरा ”

Leave a Reply