Mahatma Gandhi | गांधी हे भारतीयत्वाचा अर्क ~ डॉ.कुमार सप्तर्षी | गांधी विचार दर्शन शिबिराला प्रतिसाद

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र
Spread the love

गांधी हे भारतीयत्वाचा अर्क ~ डॉ.कुमार सप्तर्षी | गांधी विचार दर्शन शिबिराला प्रतिसाद

| महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युवक क्रांती दल आयोजित एकदिवसीय कार्यशाळा

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात ‘ गांधी विचार दर्शन ‘ या एकदिवसीय कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.रविवार, दि. ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात ही कार्यशाळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे झाली.

या कार्यशाळेत संजय आवटे (संपादक, लोकमत पुणे),डॉ.उल्हास बापट,(कायदे तज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक),डॉ. कुमार सप्तर्षी,(अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल) यांनी मार्गदर्शन केले.

माजी उपमहापौर श्रीकृष्ण बराटे,मच्छिंद्र बोरडे, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे,असलम बागवान, उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.सुदर्शन चखाले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेला राज्यभरातून मोठी उपस्थिती होती.

गांधी भवनच्या पुढाकाराने गांधी विचार दर्शन शिबीर दरमहा होणार असल्याची घोषणा डॉ.कुमार सप्तर्षी यांनी उद्घाटन सत्रात केली.

ते म्हणाले, ‘ गांधी विचार दर्शन ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे.गांधी हे स्वतःवर प्रयोग करणारे व्यक्ती होते. प्रत्येक गोष्ट त्यांनी घडवत घडवत आणली. त्यामुळे त्यांच्यात आश्वासकता आहे. त्याची मुळे भारतीय संस्कृतीत आहेत. सर्वसमावेशक राष्ट्रवाद त्यांनी आणला. आधुनिक भारत हे गांधीजींचे स्वप्न होते.गांधीजीची ११ व्रते अनुकरणीय आहेत. गांधी हे भारतीयत्वाचा अर्क आहे.विषमता, शोषणामुळे, सामाजिक उतरंडीमुळे भारतात गरीबी आली, हे गांधींजींच्या ध्यानी आले.

गांधीजींची थोरवी जगाने मान्य केली. पण, पुण्याने आणि पुण्यातील एका समुदायाने मान्य केली नाही, असेही डॉ. सप्तर्षी यांनी सांगीतले.

पाहिजे तसा इतिहास पुस्तकात बदलून प्रत्यक्ष इतिहास बदलत नाही. हे खोट्या जमातीला सांगण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

| गांधीजींचे संवादाचे मॉडेल विसरू नका : संजय आवटे

संजय आवटे म्हणाले, ‘ पुण्यात पेशवाई संपल्यावर इंग्रजांचे राज्य आले. इंग्रजांचे राज्य घालवून पुन्हा पेशवाई येईल असे वाटणारे लोकही होते. येणारा कालखंड त्या दृष्टीने आव्हानात्मक असणार आहे. खरा इतिहास पुसला जात असेल, आणि सोयीचा इतिहास सांगीतला जाणार असेल तर गांधी भवन ने खरा पर्यायी अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. आजचा कालखंड गांधी विचारांसाठी चांगला आहे. गांधींसमोरचा कालखंड आणखी भयंकर होता.

हिटलर, मुसोलिनी, गांधी एकाच काळात उदयास आले. पण महात्मा होण्याचे सामर्थ्य गांधीनी मिळवले. गांधींचे संवादाचे मॉडेल त्यांच्या विरोधकाने हायजॅक केले. गांधी समर्थकांना गांधींचे संवादाचे मॉडेलच कळले नाही. गांधीजींच्या लढयातून ६० देशांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य मिळवले.

१९१६ पासून गांधीजींनी शेतमजूर, हरिजन यांचा पक्ष घेणे सुरू केले. आंबेडकरांइतकाच गांधींजींचा विद्रोह महत्वाचा आहे. मी सनातन हिंदू आहे, असे सांगत त्यांनी परिवर्तन घडवून आणले.

| गांधींजीनी भारताला ‘ भारतपण’ मिळवून दिले

संजय आवटे पुढे म्हणाले, ‘काँग्रेसवर ताबा घ्यायचा डॉ.मुंजे, हेडगेवार यांचा प्रयत्न १९२o च्या नागपूर अधिवेशनात फसला. म्हणून हिंदुत्ववाद्यांनी १९२५ साली स्वतंत्र संघटना काढली. टिळक युग जाऊन गांधी युग आलेले प्रस्थापितांना रुचले नाही. म्हणून गांधी मार्ग समजून घेता आला पाहिजे. गांधीजींच्या सोबत हमाल होतेच, पण टाटा, बिर्ला देखील होते.

गांधीजींनी परंपरेचा अवकाश पकडला होता.तुकाराम, ज्ञानेश्वर,परंपरांचा अवकाश पुरोगाम्यानी सोडल्याने तो इतरांनी व्यापला. गांधी, नेहरू, आंबेडकर म्हणूनच समजावून सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. ‘ आयडिया ऑफ इंडिया ‘ समजून घ्यायला हवी. काहींना भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा होता, पण गांधीनी भारताला भारतपण मिळवून दिले. भारताच्या वैविध्यालाच गांधीजींनी बलस्थान केले. नेहरूंनी या भारताला आधुनिक रूप दिले. आंबेडकरांनी त्याला घटनेची शिस्त दिली.