Dr Kumar Saptarshi | मोदी – शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला | डॉ. कुमार सप्तर्षी

Categories
Breaking News Political पुणे

Dr Kumar Saptarshi | मोदी – शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला | डॉ. कुमार सप्तर्षी 

 

 

Dr Kumar Saptarshi – (The Karbhari News Service) – नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजकारणाचा व्यापार मांडला असून भाजपमधील ३० टक्के नेते इतर पक्षातून आयात केलेले आहेत. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. लोकसभेच्या १०२ जागांसाठी झालेल्या मतदानावरून मोदी यांची लाट ओसर्याचे लक्षात येते. त्यामुळे या निवडणुकीत भाजप महायुतीला दोनशे ते सव्वा दोनशे जागा मिळतील,आणि त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात येईल, असे भाकीत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सप्तर्षी बोलत होते. डॉ. सप्तर्षी म्हणाले, कोणताही पक्ष ४०० पार म्हणतो, तेव्हा थडकी भरते. ऐवढी काय भाजपची‌ किमया आहे, की लोकांनी त्यांना चारशे पार जागा निवडून द्याव्यात. आरएसएसला हिंदु राष्ट्र आणायचे आहे. त्यामुळे त्यांच्या‌ जिवावर भाजप ४०० पारचा नारा देत आहे. या निवडणुकीत मोदी शहांचा पाडाव होणे गरजेचे आहे. तरच देशातील लोकशाही आणि संविधान सुरक्षात राहिल. मोदी शहांचा पराभव झाला‌तरच भाजपही जिवंत राहणार आहे. पैसे खाल्लेल्या लोकांना धमकावून, जेलची भिती दाखवून भाजपसोबत घेतले जात आहे. अजित पवार व त्यांचे नऊ मंत्री हे भाजपसोबत जाणे, हे‌ त्याचेच उदाहरण आहे. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. मोदी-शहा ही व्यापारी जोडगोळी आहे. त्यांनी धाडी टाकून देणग्या घेतल्या. जनतेचा पैसा व्यापाऱ्यांनी वाटून घेतला. भाजपचे ३० टक्के लोक आयात केल्याने आयात आणि भाजपमधील हयात यांच्यात संघर्ष होणार आहे.

 

मोदींनी निवडणुकीतले एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. बेकारी व महागाईचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. मोदींना अर्थव्यवस्थेचे अकलन आहे, असे वाटत नाही. नोट बंदीमुळे कसलाही काळा पैसा बाहेर आला नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर तुरुंगातील सगळ्यांना बाहेर सोडले, आचारसंहितेचा आदर केला.

 

 

जरांगे पाटील‌ यांच्या मराठा आंदोलनामुळे भाजपची अडचण झाली आहे. मराठा मतदार नाराज झाल्याने राज्यात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे.  महाराष्ट्रात भाजपला अनुकुल वातावरण नाही.त्यामुळे यंदा‌ मागच्या वेळी पेक्षा कमी‌ जागा मिळणार आहेत. पुण्यात काँग्रेसचा मतदार आहे. पुण्याचा जो खासदार निवडून येतो,‌ तेव्हा वर त्या पक्षाची सत्ता येते. कलमाडी जेव्हा काँग्रेसपासून दूर गेले, तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला.

 

संविधान आहे तर आपण आहोत, अशी भावना दलित व मुस्लिमांची आहे, त्यामुळे ते आघाडीच्या मागे उभे राहतील. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वंचित व एमआयएमला मते मिळणार नाहीत. पुणे जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडीजिंकेल, असा विश्वासही डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केला. 

Mahatma Gandhi | गांधी हे भारतीयत्वाचा अर्क ~ डॉ.कुमार सप्तर्षी | गांधी विचार दर्शन शिबिराला प्रतिसाद

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

गांधी हे भारतीयत्वाचा अर्क ~ डॉ.कुमार सप्तर्षी | गांधी विचार दर्शन शिबिराला प्रतिसाद

| महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युवक क्रांती दल आयोजित एकदिवसीय कार्यशाळा

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात ‘ गांधी विचार दर्शन ‘ या एकदिवसीय कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.रविवार, दि. ९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात ही कार्यशाळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे झाली.

या कार्यशाळेत संजय आवटे (संपादक, लोकमत पुणे),डॉ.उल्हास बापट,(कायदे तज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक),डॉ. कुमार सप्तर्षी,(अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल) यांनी मार्गदर्शन केले.

माजी उपमहापौर श्रीकृष्ण बराटे,मच्छिंद्र बोरडे, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे,असलम बागवान, उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.सुदर्शन चखाले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेला राज्यभरातून मोठी उपस्थिती होती.

गांधी भवनच्या पुढाकाराने गांधी विचार दर्शन शिबीर दरमहा होणार असल्याची घोषणा डॉ.कुमार सप्तर्षी यांनी उद्घाटन सत्रात केली.

ते म्हणाले, ‘ गांधी विचार दर्शन ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे.गांधी हे स्वतःवर प्रयोग करणारे व्यक्ती होते. प्रत्येक गोष्ट त्यांनी घडवत घडवत आणली. त्यामुळे त्यांच्यात आश्वासकता आहे. त्याची मुळे भारतीय संस्कृतीत आहेत. सर्वसमावेशक राष्ट्रवाद त्यांनी आणला. आधुनिक भारत हे गांधीजींचे स्वप्न होते.गांधीजीची ११ व्रते अनुकरणीय आहेत. गांधी हे भारतीयत्वाचा अर्क आहे.विषमता, शोषणामुळे, सामाजिक उतरंडीमुळे भारतात गरीबी आली, हे गांधींजींच्या ध्यानी आले.

गांधीजींची थोरवी जगाने मान्य केली. पण, पुण्याने आणि पुण्यातील एका समुदायाने मान्य केली नाही, असेही डॉ. सप्तर्षी यांनी सांगीतले.

पाहिजे तसा इतिहास पुस्तकात बदलून प्रत्यक्ष इतिहास बदलत नाही. हे खोट्या जमातीला सांगण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

| गांधीजींचे संवादाचे मॉडेल विसरू नका : संजय आवटे

संजय आवटे म्हणाले, ‘ पुण्यात पेशवाई संपल्यावर इंग्रजांचे राज्य आले. इंग्रजांचे राज्य घालवून पुन्हा पेशवाई येईल असे वाटणारे लोकही होते. येणारा कालखंड त्या दृष्टीने आव्हानात्मक असणार आहे. खरा इतिहास पुसला जात असेल, आणि सोयीचा इतिहास सांगीतला जाणार असेल तर गांधी भवन ने खरा पर्यायी अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. आजचा कालखंड गांधी विचारांसाठी चांगला आहे. गांधींसमोरचा कालखंड आणखी भयंकर होता.

हिटलर, मुसोलिनी, गांधी एकाच काळात उदयास आले. पण महात्मा होण्याचे सामर्थ्य गांधीनी मिळवले. गांधींचे संवादाचे मॉडेल त्यांच्या विरोधकाने हायजॅक केले. गांधी समर्थकांना गांधींचे संवादाचे मॉडेलच कळले नाही. गांधीजींच्या लढयातून ६० देशांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य मिळवले.

१९१६ पासून गांधीजींनी शेतमजूर, हरिजन यांचा पक्ष घेणे सुरू केले. आंबेडकरांइतकाच गांधींजींचा विद्रोह महत्वाचा आहे. मी सनातन हिंदू आहे, असे सांगत त्यांनी परिवर्तन घडवून आणले.

| गांधींजीनी भारताला ‘ भारतपण’ मिळवून दिले

संजय आवटे पुढे म्हणाले, ‘काँग्रेसवर ताबा घ्यायचा डॉ.मुंजे, हेडगेवार यांचा प्रयत्न १९२o च्या नागपूर अधिवेशनात फसला. म्हणून हिंदुत्ववाद्यांनी १९२५ साली स्वतंत्र संघटना काढली. टिळक युग जाऊन गांधी युग आलेले प्रस्थापितांना रुचले नाही. म्हणून गांधी मार्ग समजून घेता आला पाहिजे. गांधीजींच्या सोबत हमाल होतेच, पण टाटा, बिर्ला देखील होते.

गांधीजींनी परंपरेचा अवकाश पकडला होता.तुकाराम, ज्ञानेश्वर,परंपरांचा अवकाश पुरोगाम्यानी सोडल्याने तो इतरांनी व्यापला. गांधी, नेहरू, आंबेडकर म्हणूनच समजावून सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. ‘ आयडिया ऑफ इंडिया ‘ समजून घ्यायला हवी. काहींना भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा होता, पण गांधीनी भारताला भारतपण मिळवून दिले. भारताच्या वैविध्यालाच गांधीजींनी बलस्थान केले. नेहरूंनी या भारताला आधुनिक रूप दिले. आंबेडकरांनी त्याला घटनेची शिस्त दिली.

Dr Kumar Saptarshi | ‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान’ डॉ.कुमार सप्तर्षी यांना प्रदान

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

 

‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान’
डॉ.कुमार सप्तर्षी यांना प्रदान

| इतरांवर मत न लादणं हे डॉ. सप्तर्षी यांचं वैशिष्टय : डॉ.मोहन आगाशे

| लोकांनी सत्यातील रस सोडू नये | डॉ.कुमार सप्तर्षी

पुणे : नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान ‘ विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दलाचे अध्यक्ष ,ज्येष्ठ लेखक डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रदान करण्यात आला . मराठी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकाकरीता असलेल्या ‘प्रसाद बन वाङ्मय पुरस्कारा’साठी पोपट श्रीराम काळे यांना ‘काजवा’ या आत्मकथनासाठी प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रुपये ११ हजार रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ . मोहन आगाशे यांच्या हस्ते शनिवार ,दि. १ एप्रिल रोजी ,सायंकाळी साडे पाच वाजता कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात डॉ. कुमार सप्तर्षी आणि पोपट काळे यांना हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान(नांदेड)च्या वाङ्मय पुरस्कारांचे हे २२ वे वर्ष असून यंदा पहिल्यांदाच पुण्यात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. खा. सुप्रिया सुळे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाआधी डॉ. सप्तर्षी यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, वाङ्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत आणि अभंग पुस्तकालय चे संजीव कुळकर्णी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन,संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, काँटिनेंटल प्रकाशनच्या अमृता कुलकर्णी, लिज्जतचे मार्गदर्शक सुरेश कोते आदी मान्यवर उपस्थित होते.हा सोहळा गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात झाला.

डॉ.मोहन आगाशे म्हणाले, ‘सप्तर्षी यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते कुणावरही आपले मत लादत नाहीत, तर एखाद्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या सर्व बाजू अभ्यासपूर्ण आणि विश्लेषण करून मांडतात, समजावून सांगतात, त्यामुळेच त्यांचे मुद्दे ऐकणाऱ्याला पटतात, त्यामुळेच त्यांचे कडे अनेक अनुयायी आकर्षित होतात.दर्जेदार साहित्य हाच शिक्षणाचा मुलभूत पाया असतो. पाठ्यपुस्तकापेक्षाही आपल्याला ही जीवनानुभव देणारी पुस्तके अधिक समुद्र, आणि संस्कारक्षम बनवतात.त्यामुळे मला असे वाटते की लेखक आणि कवींच्या संगतीत राहिल्याने आपले जीवन नक्कीच अधिक समृद्ध आणि सृजनशील होवू शकते, अशी संधी ज्याने त्याने शोधली पाहिजे!

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘लोकशाहीत लोकांना स्वतःच शहाणं व्हावे लागते, हे खरं असलं तरी काही वेळा लोकांना थापा ऐकण्याची इतकी सवय झालेली असते की, अदानी बद्दल केजरीवाल यांनी कितीही प्रश्न विचारले तरी पंतप्रधान मोदी उत्तरच देत नाहीत, उलट वेगवेगळ्या थापाच मारतात! आणि लोकांना त्या ऐकण्यात मजा वाटते. लोकांना सत्य ऐकण्यात रस नाही.मोदी यांना पुन्हा निवडून दिल्यास सत्य बोलणारे तुरुंगात दिसतील आणि खोटं बोलणारे बाहेर किंवा सत्तेत असतील.सत्ता हे भ्रष्टाचाराचं स्थान आहे असं आपल्याला खोटं सांगितलं जातं, खरंतर ज्या आमदारांच्या मनात भ्रष्टाचार करायची भावना असते तेच भ्रष्टाचार करतात, ज्याला इमानदारीने राहायचे तो सत्तेतही इमानदार राहू शकतो.पूर्वी फक्त काही मोजके लोक लेखन करीत असत, आता सोशल मीडिया मुळे ही संधी सर्व सामान्य लोकांना मिळू लागली आहे, ही अमूल्य संधी मानून, सर्वांनी आपल्या मनातील भावना, जीवनानुभव लिहिण्याची आवश्यकता आहे. युरोपीय देशांत अगदी पूर्वीपासून अगदी छोट्या छोट्या अनुभवांवर प्रचंड लेखन होते, आणि त्याची पुस्तकेही प्रकाशित होतात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुरेश सावंत यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.अच्युत बन यांनी केले. संजीव कुलकर्णी यांनी सप्तर्षी कारकिर्दीचा यावेळी आढावा घेतला.