Spread the love

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे रविवारी पुण्यात उद्घाटन

: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार उद्घाटन

माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण – धनंजय मुंडे

पुणे  : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटन रविवार ३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर येरवडा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसह राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद तसेच विधानसभा सदस्य, विविध ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी व स्वतः ऊसतोड कामगार बांधव उपस्थित राहणार आहेत.

आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत असून हा आपल्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक असून, मी निवडून आलो, मंत्री झालो, त्याहीपेक्षा हा मोठा दिवस असल्याची भावनिक प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे व या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

अगदी लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष, त्यांची पिढ्यानपिढ्या होत असलेली हेळसांड पाहत असताना, मनाला वेदना होत असत. समाजकारणात सक्रिय झाल्यापासून या प्रवर्गासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहितरी विधायक करण्याचा माझा मानस राहिलेला आहे. यादृष्टीने शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply