Lok Sabha Model Code of Conduct | नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम!

Categories
Breaking News देश/विदेश महाराष्ट्र
Spread the love

Lok Sabha Model Code of Conduct | नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम!

 

 

Lok Sabha Model Code of Conduct – (The Karbhari News Service) – सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ (Lok Sabha Election 2024) अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

आचार संहिता कालावधीत एखाद्या अत्यंत तातडीच्या प्रकरणी आचार संहितेतून सूट देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशी प्रकरणे निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी या कार्यालयाच्या दि.२८.२.२०२४ च्या परिपत्रकान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव या कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आचार संहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत अशा एकूण ५९ प्रस्तावांवर भारत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. तरी आचार संहिता कालावधीत आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले जाईल, याची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी.

भारत निवडणूक आयोगाने दि.१६.३.२०२४ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचार संहिता लागू केलेली आहे. आदर्श आचार संहितेच्या कालावधीमध्ये “काय करावे” व “काय करु नये” याबाबतच्या तसेच इतर विविध विषयाबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२.१.२०२४ च्या एकूण आठ पत्रान्वये स्वतंत्ररित्या देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या दि.५.३.२०२४ व ७.३.२०२४ च्या पत्रांद्वारे सर्व संबंधित यंत्रणास सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नाशिक व कोकण विभागात विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता

नाशिक व कोकण विभागातील महाराष्ट्र विधानपरिषदेवरील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सदर रिक्त होणाऱ्या पदांसाठी भारत निवडणूक आयोगाने दि.२४.५.२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत पालन करावयाच्या आदर्श आचार संहितेबाबतच्या सविस्तर सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२६.१२.२०१६ च्या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करण्यात येईल, याची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी,असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.