Use of Social Media | निवडणूक प्रचारासाठी समाजमाध्यमांच्या वापरावर निवडणूक प्रशासनाचे लक्ष | निवडणूक कालावधीत समाजमाध्यमांचा वापर डोळसपणे करावा– जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Use of Social Media | निवडणूक प्रचारासाठी समाजमाध्यमांच्या वापरावर निवडणूक प्रशासनाचे लक्ष

| निवडणूक कालावधीत समाजमाध्यमांचा वापर डोळसपणे करावा– जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

 

Use of Social Media – (The Karbhari News Service) –  जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून समाजमाध्यमांचा वापर होत असताना निवडणूक विषयक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले. (Dr Suhas Diwase IAS)

जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या निवडणूक प्रचारावर निवडणुकीसाठी कार्यान्वित जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण कक्षाचे बारकाईने लक्ष असून नियमांचा भंग आढळून आल्यास कारवाई केली जाईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

डॉ. दिवसे म्हणाले, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, युट्युब आदी समाज माध्यमांचा निवडणूक प्रचारासाठी अवलंब केला जातो. असे करताना आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल अशा प्रकारची कोणतीही पोस्ट नागरिकांनी समाज माध्यमांवरुन करु नये. आचारसंहितेच्या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आदी समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्ट, तथ्यहीन माहिती पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करण्याच्या गैरप्रकारांवरही माध्यम संनियंत्रण कक्षाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

पूर्वप्रमाणीकरणाशिवाय जाहिराती प्रसारीत केल्यास कारवाई
उमेदवार, राजकीय पक्षांना तसेच त्रयस्थ व्यक्तींना प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या असल्यास या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा आणि राज्य स्तरावर जाहिरात प्रमाणीकरणासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रमाणीकरण करुन न घेता जाहिरात प्रसारीत किंवा पोस्ट केल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

समाजमाध्यमाद्वारे राजकीय मजकूर, संदेश, छायाचित्र किंवा व्हिडीओ पोस्ट करण्यास पूर्व प्रमाणिकरणाची आवश्यकता नाही. तथापि समाजमाध्यमांवर राजकीय जाहिराती पोस्ट केल्यास त्यासाठी पूर्वप्रमाणीकरण आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवसपूर्वीचा कालावधी वगळता वृत्तपत्रातील राजकीय जाहिरातींसाठी इतरवेळी प्रमाणीकरणाची आवश्यकता नाही. तथापि ती जाहिरात ई-वृत्तपत्रात प्रकाशित होणार असल्यास त्यास पूर्व प्रमाणीकरण आवश्यक राहणार आहे.

उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीशी (एमसीएमसी) जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून सर्वोपचार रुग्णालयासमोर, पुणे ४११००१ दूरध्वनी क्र. ०२०-२६१२१३०७, ई-मेल diopune@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा, असे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Code of conduct | By-election | विधानसभा पोटनिवडणूक | चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

विधानसभा पोटनिवडणूक | चिंचवड मतदारसंघासाठी ५१० तर कसबा पेठ मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे

पुणे | जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात ३ लाख १ हजार ६४८ पुरुष, २ लाख ६४ हजार ७३२ स्त्री आणि ३५ तृतीयपंथी याप्रमाणे एकूण ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत ४८ हजार १०६ ची वाढ झाली आहे.

२१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार ८७३ पुरुष, १ लाख ३८ हजार ५५० स्त्री आणि ५ तृतीयपंथी याप्रमाणे २ लाख ७५ हजार ४२८ याप्रमाणे मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत १५ हजार २५५ ची घट झाली आहे.

अंतिम मतदार यादीतील मतदारसंख्येच्या आधारे २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे तर २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.

विधानसभा पोटनिवडणूक |  आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन

 

पुणे | जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून या दोन्ही मदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उमेदवार, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेण्यात यावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी. मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा. ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येऊन त्यासाठी पोलीस प्राधिकाऱ्यांकडून आगाऊ परवानगी घेण्यात यावी.

मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करून घेत त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंधांचेही अनुपालन करण्यात यावे. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या उमेदवार व त्यांच्या निवडणूक मतदार प्रतिनिधींना मतदान कक्षात प्रवेश करता येईल, इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी तिला असा प्रवेश करता येणार नाही.

सत्ताधारी पक्ष/ शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात प्रकाशित अथवा प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. शासकीय कामाची निवडणूक मोहीम/ निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदाराच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये. देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भितीपत्रके, यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही.

मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे. आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे.

स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय (जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता), ध्वजदंड उभारण्यासाठी निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. एका जागी लावलेल्या किंवा चालल्या वाहनावर बसविलेल्या ध्वनिवर्धकांचा वापर सकाळी ६ पुर्वी व रात्री १० नंतर करता येणार नाही.

संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्या मध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/ मिरवणुका रात्री १० नंतर चालू ठेऊ नये. त्याशिवाय ध्वनिवर्धकाचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदीचा मोसम इत्यादीसारख्या परिस्थितीच्या अधीन असेल.