PM Modi Pune Tour | पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध | जिल्हाधिकारी यांचे आदेश

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

PM Modi Pune Tour | पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध | जिल्हाधिकारी यांचे आदेश

PM Modi Pune Tour – (The Karbhari News Service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २९ आणि ३० एप्रिल रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. (Dr Suhas Diwase IAS)

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Loksabha Election Voting | अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Voting | अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

 

Loksabha Election Voting – (The Karbhari News Service) –  भारत निवडणूक आयोगाच्या (Election commission of India) – सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळेस अधिसूचित अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून विहीत मुदतीत नमुना १२ डी सादर केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. (Dr Suhas Diwase IAS)

टपाली मतदानाचा नमुना १२ डी चा अर्ज सादर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्र (पीव्हीसी) स्थापन करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी जाऊन संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे.

टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत राहतील. ३५ बारामती लोकसभा मतदार संघात १ ते ३ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायं. ५ वाजेपर्यंत, ३३ मावळ लोकसभा मतदार संघ, ३४ पुणे लोकसभा मतदार संघ व ३६ शिरूर लोकसभा मतदार संघात ७ ते ९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायं. ५ वाजेपर्यंत टपाली मतदान केंद्रे कार्यरत राहतील, असेही जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Pune Loksabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

 

Pune Loksabha Election 2024 – (The karbhari News Service) –  जिल्ह्यातील ३४- पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून प्रसाद लोलयेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३०९३५४९२४ आणि इमेल आयडी loksabhaelectionpune@gmail.com असा आहे.

निवडणूक निरीक्षक, पुणे लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे मंगळवार व गुरुवार रोजी १०.३० वाजेपासून सायं १२.३० वाजेपर्यंत भेटता येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही पुणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

VVPAT Machine | व्हीव्हीपॅटमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठी बाबत सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या संदेशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Categories
Breaking News social पुणे

VVPAT Machine | व्हीव्हीपॅटमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठी बाबत सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या संदेशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

 

VVPAT Machine – (The karbhari News Service) –  मतदानांनतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठीबाबत व्हॉट्सॲप वरुन एक चित्रफीत व त्यासोबत संदेश प्रसारीत होत असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी चाचणी मतदानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Dr Suhas Diwase Pune Collector)

प्रसारीत होत असलेला संदेश हा मतदानाच्या दिवशी, मतदान करताना मतदाराने ज्या पक्षाला मतदान केले आहे त्या पक्षाची चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये खाली पडताना न दिसल्यास हरकत घेण्याबाबतच्या आशयाचा आहे.

त्या अनुषंगाने एखाद्या मतदाराने त्याने केलेले मतदान हे इतर उमेदवारास दर्शवित असल्याबाबत अभिकथन केले असल्यास सदर मतदारास निवडणूक संचालन नियम १९६१ च्या नियम ४९ एमए अन्वये चाचणी मतदान करणेसाठी प्रतिज्ञापत्र सादर करावयाची तरतुद आहे. तसेच सदर प्रतिज्ञापत्रकात मतदाराने केलेले अभिकथन चुकीचे आढळल्यास भारतीय दंड सहिता कलम १७७ अन्वये दंडात्मक तरतूद असल्याबाबतचेदेखील नमूद आहे, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
0000

Pune Election 2024| निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Pune Election 2024| निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

 

Pune Election 2024 – (The Karbhari News Service) –  जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून प्रभावी संवाद आणि समन्वय राखत निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात होण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी सांगितले. माध्यमांनी निवडणूक प्रक्रियेचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करुन मतदारांपर्यंत मतदान प्रक्रियेची माहिती पोहोचविण्यात सहकार्य करावे, असेही आवाहनही त्यांनी केले. (Pune Loksabha Election)

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी निवडणूक प्रशिक्षण व्यवस्थापन समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्षाचे समन्वयक अधिकारी डॉ. पुरूषोत्तम पाटोदकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, निवडणूक सुरळितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्यात आले असून पहिले प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवा, महावितरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, बँक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा व भारतीय विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ तसेच ज्या ठिकाणी परीक्षा सूरू आहेत त्या महाविद्यालयातील कर्मचारी इत्यादींना अत्यावश्यक सेवा म्हणून निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येणार आहे.

डॉ. दिवसे यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना निवडणुकीतील विविध घटकांची, प्रक्रियेची सांगोपांग माहिती दिली. त्यांनी मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट तसेच व्हीव्हीपॅट बाबत माहिती देऊन ईव्हीएम एकदम निर्दोष असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले असल्याचे सांगितले. ईव्हीएमची तपासणी, पहिली सरमिसळ, मशीनचे स्कॅनिंग, दुसरी सरमिसळ करणे या बाबीमुळे कोणते यंत्र कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची आधी कल्पना नसते, असेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमवर ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका छापल्यामुळे अंध व्यक्तींची सोय झाल्याचे ते म्हणाले.

ईव्हीएम वापरासाठी तयार करणे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अभिरुप मतदानाची पद्धती, मतदान यंत्राबाबत करावयाची कार्यवाही याची माहिती दिली. तसेच मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच सरमिसळ किती स्तरावर होते, मतदान केंद्र पथक कधी निश्चित होते हे सांगून या सर्व बाबी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि मतदानाच्या दिवशी पक्षांचे मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व त्यांची स्वाक्षरी घेऊन होत असतात, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणारी वर्किंग मतदार यादी, मतदान कार्यावरील कर्मचाऱ्यांचे मतदान (ईडीसी) व पोस्टल बॅलट आदी माहिती दिली.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण झाले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यात केंद्र शासनाच्या सेवेतील ४०० अधिकारी कर्मचाऱ्यांची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचेही डॉ. दिवसे यांनी सांगितले. निवडणूक निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षक, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी आदींची भूमिका याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.

दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी आवश्यक तेथे वाहन व्यवस्था इत्यादी सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पर्दानशीन महिलांसाठी मतदार केंद्रात सुविधा देखील करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयातील नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत लक्ष ठेवण्यात येत आहे, तसेच नागरिकांच्या तक्रारीवरदेखील तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे, असे डॉ.दिवसे यांनी सांगितले.

Loksabha Election 2024 | राजकीय जाहिरातींच्या बल्क एसएमएसचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election 2024 | राजकीय जाहिरातींच्या बल्क एसएमएसचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

| खासगी एफ.एम. वाहिन्यांनीही जाहिरात प्रसारणापूर्वी प्रमाणीकरण झाल्याची खात्री करावी

Loksabha Election 2024 – (Tge Karbhari News Service) – निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हाईस मेसेजेस यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच रेडिओ आणि खासगी एफएम वाहिन्यांसाठीही या तरतुदी लागू असून जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबींचा खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्याचे प्रतिनिधी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्सच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, जिल्हा दळणवळण आराखड्याच्या समन्वय अधिकारी शमा पवार आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. निवडणूक प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रचाराचं संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे सर्व माध्यमातून होत असलेल्या निवडणूक प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पूर्वप्रमाणिकरण न करता बल्क एसएमएस पाठविले जात असल्याचे किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जाहिरात प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल अशा प्रकारची कोणतीही पोस्ट नागरिकांनी समाजमाध्यमांवरुन करू नये. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीशी (एमसीएमसी) जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून सर्वोपचार रुग्णालयासमोर, पुणे ४११००१ दूरध्वनी क्र. ०२०-२६१२१३०७, ई-मेल diopune@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0000

Don’t let citizens boycott voting because of water | Collector Dr. Suhas Diwase’s order to Pune Municipal Commissioner

Categories
Breaking News PMC social पुणे

Don’t let citizens boycott voting because of water | Collector Dr. Suhas Diwase’s order to Pune Municipal Commissioner

No Water No Vote – (The Karbhari News Service) – Citizens are experiencing severe water shortage in some parts of Pune city. Tired of this problem, citizens are taking the stand of ‘No Water No Vote’. Collector Dr Suhas Diwase (IAS) has given serious attention to this and has ordered Pune Municipal Corporation Commissioner to look into this. (PMC Water Supply Department)

Citizens of Khairewadi area in the central part of Pune city have put up banners to boycott the polls due to water scarcity. The District Collector has paid attention to this. (Loksabha Election Voting)

The Election Department of the Collector’s Office is creating public awareness for maximum voter turnout in the Lok Sabha elections and for people to come forward. But on the other hand people are talking about boycotting the polls due to lack of fundamental issues. Therefore, the collector’s office has been alerted. Collector Dr Diwase has given orders to the Municipal Commissioner to give water to the people to discourage them from boycotting.

No Water No Vote – पाण्यामुळे नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ देऊ नका | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे पुणे महापालिका आयुक्तांना आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

No Water No Vote – पाण्यामुळे नागरिकांना मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ देऊ नका

| जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे पुणे महापालिका आयुक्तांना आदेश

No Water No Vote – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या काही भागांत नागरिकांना भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या त्रासाला कंटाळून नागरिक ‘नो वॉटर नो वोट’ अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी  गंभीरपणे लक्ष देत पुणे महापालिका आयुक्तांना (Pune Municipal Corporation Commissioner) यात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. (PMC Water Supply Department)
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील खैरेवाडी परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या त्रासाला कंटाळून मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत बॅनर लावले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. (Loksabha Election Voting)
जिल्हाधिकारी कार्यालयाचा निवडणूक विभाग लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि लोकांनी पुढे यावे म्हणून जनजागृती करत आहे. मात्र दुसरीकडे लोक मूलभूत समस्यांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सतर्क झाले आहे. लोकांना बहिष्कार टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी लोकांना पाणी द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ दिवसे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत.

Dr Suhas Diwase IAS | निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी | डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Dr Suhas Diwase IAS | निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी | डॉ. सुहास दिवसे

 

Dr Suhas Diwase IAS – (The karbhari news service) –  लोकसभा निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करीत असून यापुढेही नियुक्त केलेल्या सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. (Loksabha Election 2024)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वयक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदार संघात स्वीप अंतर्गत कार्यक्रम घेऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांची शहरी भागातील मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यात यावी. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे. आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे.

सी-व्व्हिजील नियंत्रण कक्ष आणि एमसीएमसी समितीने त्यांचा दैनंदिन अहवाल प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावा. फेक न्यूज, वृत्तपत्रातील आक्षेपार्ह बातमी याचीही माहिती देण्यात यावी. आरोग्य विभागाने मतदारसंघनिहाय दिव्यांग मतदारांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी अगोदरच व्हीलचेअरचे नियोजन करावे.

अल्पसंख्याक समाजात पडदा वापरणाऱ्या महिलांची ओळख पटविण्यासाठी व शाई लावण्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात यावी. ‘तुमचे मतदान केंद्र ओळखा’ हे अभियान राबवून मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती देण्यात यावी. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्यावेळी आवश्यकता भासल्यास ईव्हीएममधील बिघाड दुरूस्‍त करण्यासाठी नियंत्रण कक्षात २ तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करावी.

लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असून सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मनुष्यबळ, प्रशिक्षण, वाहन, संगणक, स्वीप, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, ईव्हीएम, पोस्टल बॅलेट, मतदार यादी, मतदार मदत केंद्र, एक खिडकी योजना व दिव्यांग कक्ष व्यवस्थापन समन्व्यक अधिकाऱ्यांकडून निवडणूक माहिती घेतली.

Loksabha Election Nomination | उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Nomination | उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

 

Loksabha Election Nomination – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे व योग्यरितीने नामनिर्देशनपत्र दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी केले आहे.

नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्र हे नमुना २अ मध्ये दाखल करावे, त्यासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र सादर करावे. नामनिर्देशनपत्राचा नमुना २अ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक आहे.

एका उमेदवारास अधिकाधिक ४ नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १७३ (अ) अन्वये उमेदवाराने स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष छाननीपूर्वी शपथ घ्यावी लागेल. दोनपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा कमी नसावे.

उमेदवार निवडणूक लढवीत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघाव्यतिरीक्त, इतर लोकसभा मतदारसंघातील मतदार असल्यास, ज्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारयादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणे बंधनकारक राहील. उमेदवार स्वतः किंवा त्यांचे कमीत कमी एका प्रस्तावकाने स्वतः उपस्थित राहून नामनिर्देशनपत्र दाखल करावे.

नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदावारासहीत एकूण ५ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. (त्यामध्ये उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल.) नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराच्या केवळ ३ वाहनांना कार्यालयाच्या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. वाहने वाहनतळावरच उभी करण्याची अनुमती राहील.

उमेदवार हा ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे त्याच लोकसभा मतदारसंघातील मतदार हे प्रस्तावक असणे बंधनकारक राहील. मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारास १ मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक राहील. अपक्ष उमेदवार आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार यांना मतदारसंघातील १० मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक राहील.

प्रस्तावक अशिक्षीत असल्यास, त्यांनी त्यांचा अंगठा (ठसा) हा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा विनिर्दिष्ट सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्यासमोर जाऊन त्यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहील.

प्रपत्र-२६ मधील शपथपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग किंवा नोटरी पब्लिक किंवा उच्च न्यायालयाने शपथपत्र करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या शपथ आयुक्त यांचेसमोर केलेले असणे बंधनकारक राहील. शपथपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर उमेदवाराची (अभिसाक्षीची) स्वाक्षरी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त शपथपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर नोटरी किंवा शपथ आयुक्त किंवा दंडाधिकारी ज्यांच्या समक्ष शपथपत्र सत्यापित केले गेले असल्यास त्यांचा शिक्का असणे आवश्यक राहील.

नामनिर्देशनपत्रासोबत विहित नमुन्यातील शपथपत्र हे १०० रुपयांच्या मुद्रांक कागदावर देणे बंधनकारक राहील. शपथपत्रातील सर्व माहिती किंवा रकाने पूर्णपणे भरलेले असावे. शपथपत्रातील माहिती टिक, डॅश केलेली ग्राह्य धरली जाणार नसून त्यामध्ये निरंक (निल) किंवा लागू नाही (नॉट ॲप्लिकेबल) अशी स्पष्ट माहिती नमूद करणे बंधनकारक राहील.

उमेदवारांनी मागील १० वर्षाच्या कालावधीत शासनाने वाटप केलेल्या निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास, शासकीय निवासस्थानाचे भाडे, विद्युत, पाणीपट्टी, दूरध्वनी आकारणी केल्याबाबत संबंधित यंत्रणेचे ‘ना देय प्रमाणपत्र’ सादर करणे बंधनकारक राहील.

राजकीय पक्षाच्या उमेदवाराने प्रपत्र ‘ए’ आणि ‘बी’ यांची मूळ शाईची स्वाक्षरीत प्रत पक्षाचे मोहोरेसह नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करणे बंधनकारक राहील.

सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम २५ हजार रुपये व उमेदवार अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील असल्यास १२ हजार ५०० रुपये भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात, जमात प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सादर करावी. अनामत रक्कम रोख स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारली जाईल.

उमेदवारांनी निवडणूकीसाठी नव्याने स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक राहील. इतर कोणतेही बँक खाते ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त इतर कोणतेही व्यवहार असू नयेत. सदरील बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कमीत कमी एक दिवस अगोदर उघडलेले असावे. नामनिर्देशनपत्रासोबत बँकेच्या पासबुकची किंवा बँक खात्याच्या व्यवहाराचा तपशील छायांकित प्रत सादर करावी.

उमेदवाराचे छायाचित्र पांढऱ्या किंवा फिकट पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील पूर्ण चेहरेपट्टी असलेले स्टॅम्प साईज २ से.मी. X २.५ से.मी. आकाराचे अलीकडच्या काळातील असावे. (मागील लगतच्या तीन महिन्यातील छायाचित्र असावे). निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषाप्रमाणे नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील नमूद जागी छायाचित्र चिटकवावे. उमेदवारांनी ५ छायाचित्र स्वतंत्र दाखल करावेत. छायाचित्रावर, पाठीमागे नाव नमूद करुन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील. छायाचित्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील घोषणापत्र दाखल करावे.

नामनिर्देशनपत्र दाखल करता वेळी येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात बंधनकारक राहील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयीन परिसरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची उमेदवारांनी किंवा त्यांचे प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी.

ह्या सर्वसाधारण स्वरुपाच्या असून नामनिर्देशनपत्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व तरतूदीनुसार परिपूर्ण नामनिर्देशनपत्र भरण्याची व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची अंतिम जबाबदारी ही उमेदवाराची राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिली आहे.