Loksabha Election 2024 | देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे | मूळ संकल्पना पुण्याची

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election 2024 | देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे | मूळ संकल्पना पुण्याची

| पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल २०२४ अशी आहे. बारामती मतदार संघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल आहे. पुणे, शिरुर आणि मावळ मतदार संघांची अधिसूचना प्रसिद्धी १८ एप्रिल रोजी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२४ अशी आहे.

आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४३ लाख २८ हजार ९५४ पुरूष, ३९ लाख ६३ हजार २६९ स्त्री तर ७२८ तृतीयपंथी अशा एकूण ८२ लाख ९२ हजार ९५१ मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. ६, आणि स्थलांतरणासाठी अर्ज क्र. ८ सादर करण्याची अद्यापही संधी असून बारामती मतदार संघात ९ एप्रिलपर्यंत तर अन्य तीन मतदार संघात १५ एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांवर निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. अंतिम मतदारसंख्या त्यावेळी निश्चित होईल.

सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आदी ठळक सुविधांसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी शहरी भागात प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्राची प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा आदी विभागांनी सुरक्षतेच्यादृष्टिने संयुक्त पाहणी केली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

Categories
Breaking News social पुणे

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

 

Pune Lok Sabha Election 2024 : (The Karbhari News Service) –  जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८ हजार ३८२ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकिया करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ११ हजार ८९८ बॅलेट युनिट, ११ हजार ८९८ कंट्रोल युनिट आणि १२ हजार ७४९ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.

सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १४१ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची यंत्रे भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघात देखील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे डॉ.दिवसे यांनी सांगितले.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे योगेश बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे गणेश नलावडे, भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ शेडगे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अशोक कांबळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश सकट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित गव्हाणे, शिवसेनेचे राजू गवळी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Use of Social Media | निवडणूक प्रचारासाठी समाजमाध्यमांच्या वापरावर निवडणूक प्रशासनाचे लक्ष | निवडणूक कालावधीत समाजमाध्यमांचा वापर डोळसपणे करावा– जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Use of Social Media | निवडणूक प्रचारासाठी समाजमाध्यमांच्या वापरावर निवडणूक प्रशासनाचे लक्ष

| निवडणूक कालावधीत समाजमाध्यमांचा वापर डोळसपणे करावा– जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

 

Use of Social Media – (The Karbhari News Service) –  जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून समाजमाध्यमांचा वापर होत असताना निवडणूक विषयक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले. (Dr Suhas Diwase IAS)

जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या निवडणूक प्रचारावर निवडणुकीसाठी कार्यान्वित जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण कक्षाचे बारकाईने लक्ष असून नियमांचा भंग आढळून आल्यास कारवाई केली जाईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

डॉ. दिवसे म्हणाले, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, युट्युब आदी समाज माध्यमांचा निवडणूक प्रचारासाठी अवलंब केला जातो. असे करताना आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल अशा प्रकारची कोणतीही पोस्ट नागरिकांनी समाज माध्यमांवरुन करु नये. आचारसंहितेच्या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आदी समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्ट, तथ्यहीन माहिती पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करण्याच्या गैरप्रकारांवरही माध्यम संनियंत्रण कक्षाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

पूर्वप्रमाणीकरणाशिवाय जाहिराती प्रसारीत केल्यास कारवाई
उमेदवार, राजकीय पक्षांना तसेच त्रयस्थ व्यक्तींना प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या असल्यास या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा आणि राज्य स्तरावर जाहिरात प्रमाणीकरणासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रमाणीकरण करुन न घेता जाहिरात प्रसारीत किंवा पोस्ट केल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

समाजमाध्यमाद्वारे राजकीय मजकूर, संदेश, छायाचित्र किंवा व्हिडीओ पोस्ट करण्यास पूर्व प्रमाणिकरणाची आवश्यकता नाही. तथापि समाजमाध्यमांवर राजकीय जाहिराती पोस्ट केल्यास त्यासाठी पूर्वप्रमाणीकरण आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवसपूर्वीचा कालावधी वगळता वृत्तपत्रातील राजकीय जाहिरातींसाठी इतरवेळी प्रमाणीकरणाची आवश्यकता नाही. तथापि ती जाहिरात ई-वृत्तपत्रात प्रकाशित होणार असल्यास त्यास पूर्व प्रमाणीकरण आवश्यक राहणार आहे.

उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीशी (एमसीएमसी) जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून सर्वोपचार रुग्णालयासमोर, पुणे ४११००१ दूरध्वनी क्र. ०२०-२६१२१३०७, ई-मेल diopune@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा, असे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Voter List | Dr Suhas Diwase | मतदार यादीत कोणताही दोष नाही; तांत्रिक त्रुटींची तात्काळ दुरुस्ती – डॉ सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Voter List | Dr Suhas Diwase | मतदार यादीत कोणताही दोष नाही; तांत्रिक त्रुटींची तात्काळ दुरुस्ती

| जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे स्पष्टीकरण

Voter List – (The Karbhari News Service) – मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक प्रशासनाने (District Election Administration) मतदार यादी (Voter List) शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न केले असल्याने मतदार यादीत कोणतेही दोष नसून काही ठिकाणी आढळलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी दिले आहे. नागरिकांनी मतदार यादीबाबत काही शंका असल्यास नागरिकात संभ्रम होईल अशी माहिती इतरत्र न देता प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भोर विधानसभा मतदारसंघातील काही नावे गुजरातीत असल्याबाबत आलेल्या तक्रारीनंतर काही माध्यमांनी ‘मतदार यादीत घोळ’, ‘मतदार यादीत अनेक नावे बोगस लावली’ अशा आशयाचे वृत्त दिले आहे. म्हाळुंगे येथील संतोष मोहोळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे. श्री.मोहोळ यांनी आपल्या तक्रारीत म्हाळुंगे येथील मतदार यादी क्रमांक १०४ ते १०९ मधील अनेक मतदारांची नावे गुजराती भाषेत आहेत. तसेच एका मतदाराचे नाव म्हणुन मंदिराचे नाव यादीत आहे. याबाबत बोगस मतदार असण्याची शक्यता व्यक्त करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. प्रशासनाने त्याच दिवशी अर्थात २७ मार्च रोजी पत्राची तात्काळ दखल घेवून श्री.मोहोळ यांना प्रशासनाने यापूर्वीच केलेल्या कार्यवाहीविषयी पत्राद्वारे माहिती दिली होती.

निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये एका ठिकाणी मतदार यादीत असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी नमुना अर्ज क्र. ८ (स्थलांतर/पत्त्यात बदल) भरता येतो. राज्यातील विविध भागातून तसेच वेगवेगळ्या राज्यातून मुळशी तालुक्यातील हिंजवडी, सूस, म्हाळुंगे, बावधन बु., माण, मारूंजी या भागात रोजगार, नोकरी व्यवसाय निमित्त स्थलांतर होत असल्याने तेथील नागरीक या भागात रहिवासास आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने नमुना अर्ज क्र. ८ (स्थलांतर/पत्त्यात बदल) भरत असतात.

प्रस्तुत प्रकरणात ३ मतदार हे सद्यस्थितीत सदर यादी भागाचे सर्वसाधारण रहिवाशी असून ते या यादी भागात रहिवासास येण्यापुर्वी गुजरात राज्यात रहिवासासाठी होते. त्यांनी मतदार यादीच्या संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने नमुना अर्ज क्र. ८ सादर केल्यांनतर त्यासोबत जोडलेले रहिवासाचे कागदपत्रे तपासून सदर अर्ज स्विकृत करण्यात आला. त्यानंतर मतदाराचा पूर्वीच्या मतदार यादीतील ठिकाणचा इंग्रजी भाषेतील तसेच तेथील स्थानिक भाषेतील नावाचा तपशील इकडील कार्यलयास प्राप्त होतो. त्यामुळे सदर मतदार हे या यादी भागात समाविष्ठ झाल्यानंतर संगणकीय प्रणालीवरील सुविधेच्या आधारे त्यांची नावे स्थानिक भाषेत रूपांतरीत करण्यात येत असतात. आतापर्यंत बाहेरच्या राज्यातून अशा प्रकारे स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या नावाचे स्थानिक भाषेत रूपांतरण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची आहे.

वृत्तात यादी भागात एका महिला मतदाराच्या नावाबाबत उल्लेख करण्यात आला आहे. हे नाव यादी भागात पुर्वीपासून होते. सदर महिला मतदाराच्या नावाच्या तपशीलामध्ये नावाऐवजी सर्वसाधारण रहिवास पत्त्याच्या जवळचा परिसर म्हणून तेथील स्थानिक मंदिराचे नाव अर्जदार यांचेकडून अर्जात भरले गेल्याने ते नाव मुद्रीत झाले होते. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदारांच्या स्थानिक रहिवासाची पडताळणी सुरू असताना सदर मतदार स्थलांतरीत झाले असल्याबाबत निदर्शनास आले आहेत. त्यांचे नाव कमी करणेसाठी अर्ज क्र. ७ भरून घेण्यात आला आहे. या यादी भागातील जे मतदार त्यांच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी येत नसतील त्यांची निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वतंत्र एसडी (अनुपस्थित/स्थलांतरीत/मृत) अशी यादी तयार करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

निवडणुका नि:ष्पक्ष आणि पारदर्शक वातारणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असून मतदार यादी पूर्णत: शुद्ध आणि त्रुटी विरहीत राहील यासाठी प्रशासनातर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
००००

Pune Loksabha Election | मतदानासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर भर | येत्या १ एप्रिलपासून ४७ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | मतदानासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर भर

| येत्या १ एप्रिलपासून ४७ हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

Pune Loksabha Election – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाने आतापासूनच आवश्यक तयारी सुरू केली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात येत आहे. आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४७ हजारापेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदानासाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी सविस्तर प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांना ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकासह नियमांची माहिती प्रशिक्षणाद्वारे देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेची नियमावली, घ्यावयाची खबरदारी, ईव्हीएम हाताळण्याची पद्धत याविषयी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मतदानासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी एकूण ४७ हजार ३५९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण ८ हजार ३८२ मतदान केंद्रावर प्रत्येकी ४ याप्रमाणे ३३ हजार ५२८ मतदान कर्मचारी असतील. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील जिल्ह्यात येणाऱ्या ३ विधानसभा मतदारसंघात १ हजार ३३९ मतदान केंद्रांसाठी ५ हजार ३५६, पुणे २ हजार १८ मतदान केंद्रासाठी ८ हजार ७२, बारामती २ हजार ५१६ मतदान केंद्रासाठी १० हजार ६४ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील २ हजार ५०९ मतदान केंद्रासाठी १० हजार ३६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मावळसाठी १ हजार ६०७, पुणे २ हजार ४२२, बारामती ३ हजार १९ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी ३ हजार ११ याप्रमाणे प्रत्येकी ३० टक्के अतिरिक्त मनुष्यबळाचेही प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्याशिवाय चारही मतदारसंघ मिळून ३ हजार ७७३ कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. मतदानाच्यावेळी आवश्यकतेनुसार या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे.

एकूण मनुष्यबळापैकी सुमारे ४० टक्के महिला कर्मचारी असून त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे लोकसभा मतदारसंघ स्तरावर यादृच्छीकीकरण करून त्यांना मतदान केंद्रावर नेमण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेची नीट माहिती करून द्यावी आणि निवडणूक नियमांचे कटाक्षाने पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
0000

Pune Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

 

Pune Lok Sabha Election – (The Karbhari News Service) –  भारत निवडणूक आयोगाने (Election commission of India)  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून ६ जूनपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत.

या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Loksabha Election Model code of Conduct |  निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा |जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Model code of Conduct |  निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा |जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

 

Loksabha Election Model code of Conduct  – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा (Loksabha General Election) कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) जाहीर केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी दिले.

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ६ जूनपर्यंत ती लागू राहणार आहे. जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय-निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तीपत्रक, झेंडे, कटआऊट्स, संदेश काढून त्याचा अहवाल २४ तासात सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात.

शासकीय मैदाने, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, खाजगी मालमत्तेवर परवानगी न घेता लावलेले भित्तीपत्रक किंवा संदेशही ४८ तासात काढण्यात यावेत. परवानगी न घेता खाजगी मालमत्तेवर जाहिरात केली असल्यास गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वांनी काटेकोरपणे निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. ‘सी-व्हिजील’ ॲपवर आलेल्या तक्रारींसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलकावर राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी व त्याबाबतचा करार झालेला असावा, त्याची खर्चात नोंद होणे आवश्यक आहे. निश्चित केलेली सभा ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याची समान संधी देण्याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्यात यावी. पक्षांनी परवानगी घेतलेल्या खाजगी वाहनाशिवाय इतर वाहनांवर जाहिरात करता येणार नाही. अशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सांगितले.

निवडणूक यंत्रणेने गेल्या तीन महिन्यात मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी चांगले परिश्रम घेतले आहेत. यापुढेही चांगली कामगिरी करून निवडणुका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आदर्श आचारसंहिता समन्वयक अधिकारी उपस्थित होते.