Voter List | Dr Suhas Diwase | मतदार यादीत कोणताही दोष नाही; तांत्रिक त्रुटींची तात्काळ दुरुस्ती – डॉ सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे
Spread the love

Voter List | Dr Suhas Diwase | मतदार यादीत कोणताही दोष नाही; तांत्रिक त्रुटींची तात्काळ दुरुस्ती

| जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे स्पष्टीकरण

Voter List – (The Karbhari News Service) – मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक प्रशासनाने (District Election Administration) मतदार यादी (Voter List) शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न केले असल्याने मतदार यादीत कोणतेही दोष नसून काही ठिकाणी आढळलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी दिले आहे. नागरिकांनी मतदार यादीबाबत काही शंका असल्यास नागरिकात संभ्रम होईल अशी माहिती इतरत्र न देता प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भोर विधानसभा मतदारसंघातील काही नावे गुजरातीत असल्याबाबत आलेल्या तक्रारीनंतर काही माध्यमांनी ‘मतदार यादीत घोळ’, ‘मतदार यादीत अनेक नावे बोगस लावली’ अशा आशयाचे वृत्त दिले आहे. म्हाळुंगे येथील संतोष मोहोळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे. श्री.मोहोळ यांनी आपल्या तक्रारीत म्हाळुंगे येथील मतदार यादी क्रमांक १०४ ते १०९ मधील अनेक मतदारांची नावे गुजराती भाषेत आहेत. तसेच एका मतदाराचे नाव म्हणुन मंदिराचे नाव यादीत आहे. याबाबत बोगस मतदार असण्याची शक्यता व्यक्त करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. प्रशासनाने त्याच दिवशी अर्थात २७ मार्च रोजी पत्राची तात्काळ दखल घेवून श्री.मोहोळ यांना प्रशासनाने यापूर्वीच केलेल्या कार्यवाहीविषयी पत्राद्वारे माहिती दिली होती.

निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये एका ठिकाणी मतदार यादीत असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी नमुना अर्ज क्र. ८ (स्थलांतर/पत्त्यात बदल) भरता येतो. राज्यातील विविध भागातून तसेच वेगवेगळ्या राज्यातून मुळशी तालुक्यातील हिंजवडी, सूस, म्हाळुंगे, बावधन बु., माण, मारूंजी या भागात रोजगार, नोकरी व्यवसाय निमित्त स्थलांतर होत असल्याने तेथील नागरीक या भागात रहिवासास आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने नमुना अर्ज क्र. ८ (स्थलांतर/पत्त्यात बदल) भरत असतात.

प्रस्तुत प्रकरणात ३ मतदार हे सद्यस्थितीत सदर यादी भागाचे सर्वसाधारण रहिवाशी असून ते या यादी भागात रहिवासास येण्यापुर्वी गुजरात राज्यात रहिवासासाठी होते. त्यांनी मतदार यादीच्या संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने नमुना अर्ज क्र. ८ सादर केल्यांनतर त्यासोबत जोडलेले रहिवासाचे कागदपत्रे तपासून सदर अर्ज स्विकृत करण्यात आला. त्यानंतर मतदाराचा पूर्वीच्या मतदार यादीतील ठिकाणचा इंग्रजी भाषेतील तसेच तेथील स्थानिक भाषेतील नावाचा तपशील इकडील कार्यलयास प्राप्त होतो. त्यामुळे सदर मतदार हे या यादी भागात समाविष्ठ झाल्यानंतर संगणकीय प्रणालीवरील सुविधेच्या आधारे त्यांची नावे स्थानिक भाषेत रूपांतरीत करण्यात येत असतात. आतापर्यंत बाहेरच्या राज्यातून अशा प्रकारे स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या नावाचे स्थानिक भाषेत रूपांतरण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची आहे.

वृत्तात यादी भागात एका महिला मतदाराच्या नावाबाबत उल्लेख करण्यात आला आहे. हे नाव यादी भागात पुर्वीपासून होते. सदर महिला मतदाराच्या नावाच्या तपशीलामध्ये नावाऐवजी सर्वसाधारण रहिवास पत्त्याच्या जवळचा परिसर म्हणून तेथील स्थानिक मंदिराचे नाव अर्जदार यांचेकडून अर्जात भरले गेल्याने ते नाव मुद्रीत झाले होते. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून मतदारांच्या स्थानिक रहिवासाची पडताळणी सुरू असताना सदर मतदार स्थलांतरीत झाले असल्याबाबत निदर्शनास आले आहेत. त्यांचे नाव कमी करणेसाठी अर्ज क्र. ७ भरून घेण्यात आला आहे. या यादी भागातील जे मतदार त्यांच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी येत नसतील त्यांची निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वतंत्र एसडी (अनुपस्थित/स्थलांतरीत/मृत) अशी यादी तयार करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

निवडणुका नि:ष्पक्ष आणि पारदर्शक वातारणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असून मतदार यादी पूर्णत: शुद्ध आणि त्रुटी विरहीत राहील यासाठी प्रशासनातर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
००००