Sainath Babar : MNS : Pune : पुणे मनसेचे नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर! : वसंत मोरे यांना पदावरून हटवले  : मोरे यांनी बाबर यांचे केले अभिनंदन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

पुणे मनसेचे नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर!

: वसंत मोरे यांना पदावरून हटवले

: मोरे यांनी बाबर यांचे केले अभिनंदन

पुणे : मनसे पुणेत नवा बदल करण्यात आला आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान मोरे यांनी ट्विटर वरून नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य तसेच देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही यास विरोध केला होता. पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत मला माझ्या प्रभागात शांतता हवी, असल्याचे म्हटले होते.

गेले दोन-चार दिवस या विषयावर पक्षात वाद सुरू होता. या पाश्‍र्वभूमीवर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी आज मुंबईत बोलावले होते. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे यांना पदावरून हटवत माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे आज दुपारी जाहीर करण्यात आले.

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ”सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही वसंत मोरे यांनी म्हटले होते.

दरम्यान वसंत मोरे यांनी spirit दाखवत नवे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे. मोरे यांनी बाबर यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे कि, “अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!

Leave a Reply