Public Health Department Maharashtra | सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र
Spread the love

Public Health Department Maharashtra | सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

| पंधरवड्यात १ लाख शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य

 

Public Health Department Maharashtra | राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Helath Minister Dr Tanaji Sawant) यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ दरम्यान राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार असून, या कालावधीत १ लाख रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.

शासकीय रुग्णालय, मान्यता प्राप्त स्वयंसेवी संख्या रुग्णालय येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

या मोहिमेंतर्गत १ लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून, २०२२ पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२२ ते २०२५ या तीन वर्षात २७ लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे.

सन २०२२-२३ मध्ये राज्यात मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे ११२.५१ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे व २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिसेंबर, २०२३ पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या ६७.३० टक्के मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ या कालावधीत जिल्हा स्तरावर ‘विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वंयसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याविषयी किंवा इतर आरोग्य विषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.