Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन | महोत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

Categories
Breaking News cultural Political पुणे
Spread the love

Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन | महोत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

| साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

 

Pune Book Festival | पुणे – जागतिक स्तरावरील पुस्तक महोत्सवाची मेजवानी पुणेकरांना मिळाली आहे. सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांनी नटलेला हा पुणे पुस्तक महोत्सव (Pune Pustak Mahotsav) आजपासून सुरू होत आहे. या महोत्सव पुणेकरांनी एकत्र येत यशस्वी करावा, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. (Pune Book Festival)

 

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने फर्ग्युसन मैदानावर आयोजित केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे महापलिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक विशाल चोरडिया, जय काकडे, सुशील जाधव, कृष्णकुमार गोयल, शहीद भगतसिंग यांचे पणतू यागवेंद्र सिंग संधू, प्रकाशक राजीव बर्वे, डीईएसचे डॉ. शरद कुंटे आदी उपस्थित होते. मोहन शेटे लिखित हिंदवी स्वराज्य स्थापना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

 

पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स पुस्तक एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापना हे पुस्तक सुद्धा एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या पुस्तक महोत्सवात कोथरूड मतदार संघातील पुस्तक घेणाऱ्या नागरिकांना सवलत देण्यात येईल. त्यासाठी त्यांनी कोथरूड आणि बाणेर येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे आणि शिक्षणाचे माहेरघर आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुणे शहरात सांस्कृतिक दृष्ट्या मोलाची भर पडली आहे. असेच महोत्सव राज्यातील इतर शहरांमध्ये सुरू व्हावेत. दिल्ली, जयपूर येथील विविध फेस्टीव्हल पाहिले आहेत. हे फेस्टीव्हल ठराविक लोकांपुरता मर्यादित असतो. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला जनतेचा सोहळा करून, सामान्य जनतेला, माध्यम वर्गीय कुटुंबातील लोकांना वाचन संस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. अशा पद्धतीने सामान्य लोकांसाठी परिश्रम केले आहे. त्याबाबत अभिनंदन केले पाहिजे. मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी सर्वांना ज्ञानासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.सोशल मीडियामुळे वाचन संस्कृतीचा फटका बसला आहे. पायरसीमुळे पुस्तकांना फटका बसला आहे. पुस्तक विक्री कमी होते, अशी खंत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. त्याचबरोबर खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद पुढील आठ दिवस देत, महोत्सवातील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मराठे यांनी केले.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी पुस्तक महोत्सव पाहिले मात्र, विश्वविक्रमानी सजलेला पुस्तक महोत्सव पहिल्यांदाच पाहतोय. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. आता, यापुढे आपल्या पुण्याला देशातील पुस्तकांची राजधानी करायचे आहे. त्यासाठी पुणेकरांनी पुढे येऊन, महोत्सवाला पाठिंबा द्यायचा आहे. या पुस्तक महोत्सवाला देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध करायचे आहे, असे मलिक यांनी सांगितले.

पुणे पुस्तक महोत्सवात पुढील आठ दिवस सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने शहीद भगतसिंगांनी जेलमध्ये लिहिलेली डायरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली संविधानाची मूळ प्रत, छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित एतिहासिक कागदपत्रे पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाच्या कालावधीत एकूण १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यातील ३२ पुस्तकांचे प्रकाशन एकाचवेळी होईल. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन पांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.बागेश्री मंठाळकर यांनी आभार मानले.

….
भगतसिंगांनी रचलेल्या मेरा रंग दे बसंती चोला या गाण्यापासून म्हणजे १९३१ पासून महाराष्ट्र आणि भगतसिंग यांचे ऋणानुबंध आहे. भगत सिंग यांनी जेलमध्ये १०० पेक्षा अधिक पुस्तके वाचली. आपण सुद्धा अशाच प्रकारे पुस्तके वाचायची आहे. आगामी काळात आपल्याला देशात अधिकाधिक भगत सिंग घडवायचे आहेत, असे यागवेंद्र सिंग यांनी आवाहन केले.

—-

सलग तिसरा विश्वविक्रम

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या उपक्रमांत सलग तिसऱ्या दिवशी गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी एकत्र येत १८ हजार ७६० पुस्तकांच्या माध्यमातून जयतु भारत हे वाक्य तयार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा वापर करून, बनविण्याचा हा रेकॉर्ड आहे. यापूर्वीचा, रेकॉर्ड हा सौदी अरेबियाच्या नावावर होता. तेथे ११ हजार १११ पुस्तकांच्या माध्यमातून वाक्य तयार करण्यात आले होते. गिनेस बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी विश्वविक्रमाची घोषणा केली. विश्वविक्रम झाल्यानंतर मैदानावर देशभक्तीपर गाण्यांवर जल्लोष साजरा करण्यात आला; तसेच मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.