Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवाला ४.५ लाख नागरिकांची भेट अन् ८.५० लाख पुस्तकांची विक्री

Categories
Breaking News cultural Education PMC social पुणे महाराष्ट्र

Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवाला ४.५ लाख नागरिकांची भेट अन् ८.५० लाख पुस्तकांची विक्री

| ११ कोटींची उलाढाल ; पुढील वर्षीही पुणे पुस्तक महोत्सव जल्लोषात होणार

 

Pune Book Festival | पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला (Pune Pustak Mahotsav) पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, या पुस्तक महोत्सवातून ८.५० लाख पुस्तकांची विक्री झाली आहे.तब्बल ४.५ लाख नागरिकांनी महोत्सवाला भेट देत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. या महोत्सवात पुस्तक विक्रीतून साधारण ११ कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे पुढील वर्षीही हा महोत्सव अशाच पद्धतीने धुमधडाक्यात आयोजित केला जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे (Rajesh Pande) यांनी सांगितले. (Pune Book Festival)

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाची नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात रविवारी सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे उपस्थित होते. समारोपच्या प्रसंगी आकाशात फुगे सोडण्यात आले. या महोत्सवाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी खडकी शिक्षण संस्था, कृष्णकुमार गोयल, सूर्यकांत काकडे ग्रुप, पंचशील गृप, डी.वाय . पाटील समूह, लोकमान्य ग्रुप, पुनित बालन ग्रुप, कोहिनूर गृप, सुहाना ग्रुप, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आदींचे विशेष सहकार्य लाभले.

या महोत्सवाला भेट देणाऱ्या आणि पुस्तकांची खरेदी करणाऱ्यांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या ही सर्वाधिक होती. या महोत्सवात चार विश्वविक्रम नोंदविण्यात आले आहेत. या पुस्तक महोत्सवात नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाच्या ८७ हजार प्रति, तर शिवराज्याभिषेक पुस्तकाच्या ६९ हजार प्रती वितरीत करण्यात आल्या , असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. या महोत्सवाच्या संयोजन सामितीत प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, ॲड मंदार जोशी, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, राहुल पाखरे , शैलेश जोशी, संजय मयेकर, मिलिंद कुलकर्णी आदींनी

….
नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव होणार आहे. या महोत्सवात पुणे पुस्तक महोत्सवाचे एक दालन राहणार आहे. या दालनातून पुणे पुस्तक महोत्सवाविषयी माहिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सवाच्या प्रसार – प्रचारासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे राजेश पांडे आणि एनबीटी अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी सांगितले.
——

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर उपक्रम, कार्यशाळा आणि सेमिनार घेण्यात येतील. पुणे हे जगाची पुस्तकांची राजधानी होण्यासाठी महापालिकेसोबत प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी नॅशनल बुक ट्रस्टचे एक केंद्र हे पुण्यात स्थापन करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. हा महोत्सव पुणेकरांचा होता. पुणेकरांनी या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहे. या महोत्सवाच्या आयोजनाबाबत काही सूचना असतील, तर त्या आवर्जून द्या. पुढील वर्षी यापेक्षाही भव्य पुणे पुस्तक महोत्सव करून, पुणे पुस्तक महोत्सवाला पुण्याची ओळख करुयात.

राजेश पांडे, संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
—-

पुणे पुस्तक महोत्सवात चार विश्वविक्रम झाले. त्याची नोंद गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली

– बालक – पालक वाचन उपक्रम ( सुमारे ३ हजार पालकांनी एकच वेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या,)
– भारत शब्द ७५०० हजार पुस्तकांमधून लिहिण्यात आला.
– जयतु भारत हे वाक्य १५ हजार पुस्तकांमधून लिहिण्यात आले.
– एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद ११ हजार २०० जणांकडून सलग ३० मिनिटे वाचण्यात आला.
—-
पुणे पुस्तक महोत्सवात वीस भाषांतील पुस्तकांचे दोनशेहून अधिक स्टॉल होते. त्याशिवाय डॉ. कुमार विश्वास, लेखक विक्रम संपत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मुलाखती, तुकाराम दर्शन, श्रीमंत योगी, लोकरंग, फैजल काश्मिरी बँड असे उत्तमोत्तम कार्यक्रम या महोत्सवात झाले. या महोत्सवात पुणेकरांना शहीद भगतसिंह यांची डायरी, देशाच्या घटनेची मूळ प्रत पाहण्यासाठी उपलब्ध होती.
—-

पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा लाभलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. हा संपूर्ण महोत्सव अविस्मरणीय झाला. या महोत्सवात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पुस्तके खरेदी करतांना पाहिले. त्यामुळे मुले वाचत नाही, हे मला अजिबात पटलेच नाही. पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करणाऱ्या सर्व पुणेकरांचे अभिनंदन करतो. या महोत्सवाच्या आयोजनासाठी राजेश पांडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो.

चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
—-

पुणे पुस्तक महोत्सवात विविध प्रकारची पुस्तके होती. ही पुस्तके नेहमीपेक्षा वेगळी होती, हे या पुस्तक महोत्सवाचे वैशिष्ट्ये ठरले. एकाचवेळी वेदांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तके पहिली. वैदिक गणित ते आधुनिक शास्त्राची अनेक पुस्तके पाहायला मिळाली. इथे होणारी गर्दी अविस्मरणीय असून, या महोत्सवातून काही लाख शब्द हे नागरिकांना कळणार आहे. राजेश पांडे यांना विश्वविक्रमाची नवलाई नाही. त्यांनी १९९२ मध्ये विद्यार्थ्यांचा जगातील सर्वात मोठा मोर्चा काढला होता.

प्रवीण तरडे, अभिनेता

———

आमच्या कुटुंबात पुस्तकांना एक वेगळे स्थान आहे माझ्या आयुष्यात आई – वडील, शिक्षक यांच्यानंतर गुरू म्हणून सर्वात महत्त्वाचे स्थान हे पुस्तकांचे आहे. ज्ञान मिळवण्यासाठी ही पुस्तके फार महत्त्वाची भूमिका बजावतात. आपली मायबोली मराठी भाषा टिकवण्यासाठी पुस्तकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर पुस्तकांचे वाचन केल्याशिवाय पर्याय नाही. समाजकारण, राजकारण, उद्योग, सेवा अशा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल, तर पुढे जाण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय नाही. पुणे पुस्तक महोत्सवात मराठीसह विविध प्रादेशिक भाषांमधील पुस्तके आहेत. ही पुस्तके घेण्यासाठी सर्वाधिक गर्दी ही युवा पिढीची होत आहे, ही सर्वात दिलासा देणारी बाब आहे.

सुप्रिया सुळे, खासदार

National Book Trust | ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’च्या तब्बल ३३ पुस्तकांचे पुणे पुस्तक महोत्सवात एकाचवेळी प्रकाशन

Categories
Breaking News cultural Education social पुणे

National Book Trust | ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’च्या तब्बल ३३ पुस्तकांचे पुणे पुस्तक महोत्सवात एकाचवेळी प्रकाशन

National Book Trust | पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (National Book Trust) पुण्यात अनुवाद कार्यशाळा झाली होती. या कार्यशाळेतून तयार झालेल्या ३३ पुस्तकांचे प्रकाशन मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवात झाले. (Pune Book Festival)

प्रकाशन कार्यक्रमाला साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, आनंद काटीकर या वेळी उपस्थित होते. हिंदी, इंग्रजी या भाषांतील पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. (Pune Pustak Mahotsav)

अनुवाद कार्यशाळा या पुणे पुस्तक महोत्सवाचे बीज होती. भाषा आणि संस्कृतीला वेगळे करता येत नाही. मानव संवाद करू शकतो म्हणून माणूस श्रेष्ठ आहे. संस्कृतीचे वाहक म्हणून वाचकांनी करायचे आहे. बालसाहित्य समाजाची संरचना करते. त्यामुळे सकस बालसाहित्याची निर्मिती अत्यावश्यक आहे, असे युवराज मलिक यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाप्रमाणेच अतिशय नेटका पुस्तकांचा महोत्सव पुण्यात झाला आहे. अनुवाद व्यापक संकल्पना आहे. अनुवादाची फार प्राचीन परंपरा आहे. ललित पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद ७०च्या दशकात सुरू झाला. गेल्या पन्नास वर्षांत अनुवादक म्हणून पॅपिलॉनसह अनेक पुस्तकांचा अनुवाद करता आला. सुरुवातीला अनुवादित साहित्य गौण समजले जायचे, पण आता अनुवादित साहित्याला प्रतिष्ठा मिळाली. अनुवाद ही स्वतंत्र कला आहे हे अधोरेखित झाले, असे रवींद्र गुर्जर म्हणाले.

लहान मुलांसाठी एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तके प्रकाशित होणे दुर्मीळ आहे. मुलांसाठी सोपे, सुटसुटीत लिहावे लागते, पुस्तके आकर्षक असावी लागतात. मुलांच्या पुस्तकांसाठी खूप विचारकरावालागतो. मुलांनी वाचण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास ते काम करत आहे हे महत्त्वाचे आहे, असे मनोगत डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केले.

Dr Kumar Vishwas | Pune Book Festival | पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग | प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांचे मत

Categories
Breaking News cultural Education social पुणे महाराष्ट्र

Dr Kumar Vishwas | Pune Book Festival | पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग | प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांचे मत

 

Dr Kumar Vishwas | Pune Book Festival | पुस्तकांमुळे (Books) वाचकाच्या कल्पनाशक्तीला (Imagination) वाव मिळतो. मात्र वेब सीरिज (Web Series), चित्रपटांतून (Movies) प्रेक्षकांच्या कल्पना दृश्यांतून बंदिस्त केल्या जातात. पुस्तकांचे वाचन (Book Reading) हा स्वसंवादाचा (Self Communication) उत्तम मार्ग आहे. त्यामुळे पिझ्झा, कपडे अशा गोष्टींवरील खर्च कमी करा, पण पुस्तके विकत घेऊन वाचा, असे आवाहन प्रसिद्ध हिंदी कवि डॉ. कुमार विश्वास (Dr Kumar Vishwas) यांनी केले. पुस्तकांमुळे आत्म्याची इम्युनिटी वाढते. वाचलेले मनात राहते आणि कधी ना कधी कामी येते, असे त्यांनी सांगितले. (Pune Book Festival)

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे (National Book Trust) आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात (Pune Pustak Mahotsav) कवि की कल्पना से या विषयावर डॉ. कुमार विश्वास यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक कृष्णकुमार गोयल, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसेनजित फडणवीस या वेळी उपस्थित होते.

गेली ३५ वर्षे, ४४ देशांत रंगमंचावरून कविता सादर करत असल्याचे सांगून डॉ. कुमार विश्वास यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, की चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणे हे कवीचे काम आहे. सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यामुळे कवींनी निर्भयपणे बोलले पाहिजे. चौथीत असताना मला लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य पारितोषिक म्हणून मिळाले होते. विनोबा भावे, ओशो अशा अनेकांनी गीतेवर उत्तम लेखन केले आहे. मात्र कर्मयोगाच्या संदर्भात टिळकांचे गीतारहस्य सर्वोत्तम आहे. चांगले असणे आणि यशस्वी असणे यात फरक आहे. त्यामुळे चांगले होण्यासाठी वाचणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस चांगला होतो. प्रत्येक विषयाचे विविध आयाम समजून घेण्यासाठी विविध प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत.

आज स्वतंत्र भारताच्या ७५व्या वर्षी भारत जगातील आघाडीचे देश आहे. मात्र १००व्या वर्षी भारत आध्यात्मिक आणि आर्थिक महासत्ता होईल. व्हॉट्सअॅप, आर्ठिफिशियल इंटेलिजन्स ही माया आहे. व्हॉट्सअॅपर संदेशांचा कचरा येऊन पडत राहतो, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मानवी संवेदनांवर हल्ला होणार आहे. मात्र मानवी संवेदनाच यंत्राच्या संवेदनेपेक्षा श्रेष्ठ आहेत, असे डॉ. विश्वास यांनी सांगितले.

व्याख्यानानंतर विश्वास यांनी कोई दिवाना कहता है ही त्यांची प्रसिद्ध रचना सादर केली. त्यांचे व्याख्यान आणि सादरीकरणाला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

तावडे म्हणाले, की कुमार विश्वास हे महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी कवींचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्यामुळे अनेक नव्या कवींना ओळख मिळाली. महाराष्ट्रात पुस्तके विकत घेऊन वाचली जातात हे साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या खपांच्या आकड्यांतून कळते. त्यामुळे हा पुणे पुस्तक महोत्सव वाचकांसाठी पर्वणी आहे.

गेल्या तीन दिवसांत तीन पुस्तकांशी, वाचनाशी संबंधित तीन विश्वविक्रम पुणे पुस्तक महोत्सवात नोंदवले गेले आहेत. पुस्तकांची दोनशेपेक्षा जास्त दालने या महोत्सवात असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले.

Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन | महोत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

Categories
Breaking News cultural Political पुणे

Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन | महोत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

| साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

 

Pune Book Festival | पुणे – जागतिक स्तरावरील पुस्तक महोत्सवाची मेजवानी पुणेकरांना मिळाली आहे. सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांनी नटलेला हा पुणे पुस्तक महोत्सव (Pune Pustak Mahotsav) आजपासून सुरू होत आहे. या महोत्सव पुणेकरांनी एकत्र येत यशस्वी करावा, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. (Pune Book Festival)

 

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने फर्ग्युसन मैदानावर आयोजित केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन डॉ. गोऱ्हे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे महापलिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक विशाल चोरडिया, जय काकडे, सुशील जाधव, कृष्णकुमार गोयल, शहीद भगतसिंग यांचे पणतू यागवेंद्र सिंग संधू, प्रकाशक राजीव बर्वे, डीईएसचे डॉ. शरद कुंटे आदी उपस्थित होते. मोहन शेटे लिखित हिंदवी स्वराज्य स्थापना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

 

पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स पुस्तक एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापना हे पुस्तक सुद्धा एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या पुस्तक महोत्सवात कोथरूड मतदार संघातील पुस्तक घेणाऱ्या नागरिकांना सवलत देण्यात येईल. त्यासाठी त्यांनी कोथरूड आणि बाणेर येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे आणि शिक्षणाचे माहेरघर आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुणे शहरात सांस्कृतिक दृष्ट्या मोलाची भर पडली आहे. असेच महोत्सव राज्यातील इतर शहरांमध्ये सुरू व्हावेत. दिल्ली, जयपूर येथील विविध फेस्टीव्हल पाहिले आहेत. हे फेस्टीव्हल ठराविक लोकांपुरता मर्यादित असतो. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला जनतेचा सोहळा करून, सामान्य जनतेला, माध्यम वर्गीय कुटुंबातील लोकांना वाचन संस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. अशा पद्धतीने सामान्य लोकांसाठी परिश्रम केले आहे. त्याबाबत अभिनंदन केले पाहिजे. मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी सर्वांना ज्ञानासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.सोशल मीडियामुळे वाचन संस्कृतीचा फटका बसला आहे. पायरसीमुळे पुस्तकांना फटका बसला आहे. पुस्तक विक्री कमी होते, अशी खंत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांना सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. त्याचबरोबर खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. असाच प्रतिसाद पुढील आठ दिवस देत, महोत्सवातील कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मराठे यांनी केले.

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी पुस्तक महोत्सव पाहिले मात्र, विश्वविक्रमानी सजलेला पुस्तक महोत्सव पहिल्यांदाच पाहतोय. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. आता, यापुढे आपल्या पुण्याला देशातील पुस्तकांची राजधानी करायचे आहे. त्यासाठी पुणेकरांनी पुढे येऊन, महोत्सवाला पाठिंबा द्यायचा आहे. या पुस्तक महोत्सवाला देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध करायचे आहे, असे मलिक यांनी सांगितले.

पुणे पुस्तक महोत्सवात पुढील आठ दिवस सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने शहीद भगतसिंगांनी जेलमध्ये लिहिलेली डायरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली संविधानाची मूळ प्रत, छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित एतिहासिक कागदपत्रे पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाच्या कालावधीत एकूण १०० पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. त्यातील ३२ पुस्तकांचे प्रकाशन एकाचवेळी होईल. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन पांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.बागेश्री मंठाळकर यांनी आभार मानले.

….
भगतसिंगांनी रचलेल्या मेरा रंग दे बसंती चोला या गाण्यापासून म्हणजे १९३१ पासून महाराष्ट्र आणि भगतसिंग यांचे ऋणानुबंध आहे. भगत सिंग यांनी जेलमध्ये १०० पेक्षा अधिक पुस्तके वाचली. आपण सुद्धा अशाच प्रकारे पुस्तके वाचायची आहे. आगामी काळात आपल्याला देशात अधिकाधिक भगत सिंग घडवायचे आहेत, असे यागवेंद्र सिंग यांनी आवाहन केले.

—-

सलग तिसरा विश्वविक्रम

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित होणाऱ्या उपक्रमांत सलग तिसऱ्या दिवशी गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी एकत्र येत १८ हजार ७६० पुस्तकांच्या माध्यमातून जयतु भारत हे वाक्य तयार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा वापर करून, बनविण्याचा हा रेकॉर्ड आहे. यापूर्वीचा, रेकॉर्ड हा सौदी अरेबियाच्या नावावर होता. तेथे ११ हजार १११ पुस्तकांच्या माध्यमातून वाक्य तयार करण्यात आले होते. गिनेस बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी विश्वविक्रमाची घोषणा केली. विश्वविक्रम झाल्यानंतर मैदानावर देशभक्तीपर गाण्यांवर जल्लोष साजरा करण्यात आला; तसेच मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Baburaoji Gholap College | “शांतता, पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमास बाबुरावजी घोलप महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद 

Categories
Breaking News Education social पुणे

Baburaoji Gholap College | “शांतता, पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमास बाबुरावजी घोलप महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद

 

Baburaoji Gholap College | बाबुरावजी घोलप महाविद्यालयात (Baburaoji Gholap College) ग्रंथालय विभागाच्या वतीने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शासनाच्या या अभिनव उपक्रमामध्ये वाचन संस्कृती वृद्धिगत होण्यासाठी तसेच उत्तम आणि जागृत नागरिक बनण्यासाठी मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,असंख्य महापुरुषांच्या आत्मचरित्राचे तसेच युवकांना उद्योग जगतातील नाविन्यपूर्ण क्षेत्रांमध्ये असलेल्या संधी या संदर्भात नव वाचनाचे व्यासपीठ या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमात प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता. त्यांनी आपल्या आवडीचे पुस्तके ग्रंथालयातून घेऊन वाचन केले. ग्रंथालयातील कर्मचारी वर्गाने त्यांच्या आवडीचे पुस्तके पुरविली व वाचन करण्यास प्रोत्साहित केले. (Pune Book Festival)

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी विद्यार्थी व प्राध्यापक वर्गास मार्गदर्शन करताना वाचन संस्कृती जपणे किती महत्त्वाचे आहे ? तसेच या थोर महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वातून विद्यार्थी अवस्थेत आपल्याला योग्य मार्ग मिळण्यास मदत होते. त्यातून आपले उर्वरित आयुष्य जडणघडणीमध्ये मदत होते. यासंदर्भात मार्गदर्शन करून स्वतः वाचनात सहभागी झाले. लेफ्टनंट तथा ग्रंथपाल डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांनी आपली वाचनाची आवड जोपासण्यासाठी स्वतः सहभागी व्हावे असे प्रेरित विद्यार्थ्यांना केले. सदर उपक्रमाचे प्रस्ताविक प्रा. संतोष सास्तुरकर यांनी केले व आभार प्रा. भास्कर घोडके यांनी मानले. या उपक्रमामध्ये प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, आयक्युएस्सी समन्वयक डॉ. संगीता जगताप, डॉ. विठ्ठल नाईकवाडी, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रा. भास्कर घोडके, श्री सुनील भोसले श्री .प्रणित पावले, श्रीमती मनीषा कुंभार, श्री किरण कळमकर, श्री योगेश मदने, श्री बाबाजी गायकवाड उपस्थित होते. या अभिनव उपक्रमाला युवा वाचक विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद होता

Pune Pustak Mahotsav Record | भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला

Categories
Breaking News cultural Education PMC social देश/विदेश पुणे

Pune Pustak Mahotsav Record | भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला

| पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावाने

 

Pune Pustak Mahotsav Record | पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (National Book Trust) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या शनिवारी १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव (Pune Book Festival) होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महापालिकेने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर (S P College Ground) गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘ पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या ‘ या उपक्रमात तीन हजार ६६ पालकांनी सहभागी होत, त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड (China Record) मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर गीतांवर आनंदोत्सव साजरा झाला. (Pune Book Festival Record)

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, भाग्यश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृतीचा चालना देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आले. साधारण दहाच्या सुमारास तीन हजार २०० पेक्षा अधिक पालक आणि त्यांच्या पाल्यानी सहभाग नोंदवला. या सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धड्याचे सलग तीन मिनिटे वाचन केले. यावेळी गिनेस बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. या विश्व विक्रमानंतर पालक आणि मुलांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पद्धतीने केले. या संपूर्ण उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करीत, त्यांना वाचन करण्याची प्रेरणा दिली. यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी मराठी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

अन चीनचा रेकॉर्ड मोडला

पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आज स. प. मैदानावर तीन हजार ६६ पालकांनी एकत्रित येत, आपल्या आपल्या पाल्यांना निसर्गाचा नाश करू नका हा धडा वाचला आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

Pune Book Festival | ‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांचा उपक्रमात सहभाग

Categories
Breaking News cultural Education PMC social पुणे महाराष्ट्र

‘शांतता….पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाला भरभरून प्रतिसाद

| मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मान्यवरांचा उपक्रमात सहभाग

 

Pune Book Festival | पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( National Book Trust) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव (Pune Pustak Mahotsav)  १६ ते २४ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी गुरुवारी शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणे शहरात विविध चौकात, रिक्षा थांब्यांवर सरकारी – खासगी कार्यालये, महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालये, शाळा- महाविद्यालयांमध्ये उस्फुर्तपणे राबविण्यात आला. त्याशिवाय नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून वेळ काढत विधानसभेचे सभापती अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले. अनेक जणांनी सोशल मीडियावर पुस्तक वाचतानाचे फोटो शेअर करीत, पाठिंबा जाहीर केला. (Pune Book Festival)

वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सामाजिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालये, महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालये, खासगी आस्थापनांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात पुणेकरांनी दुपारी १२ ते १ दरम्यान त्यांच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन केले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात साधारण ५०० जणांनी आवडीचे पुस्तक वाचत सहभाग नोंदवला.शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी, पत्रकार, राजकीय पक्षाचे नेते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे, सिम्बायोसिस कुलपती डॉ.एस. बी मुजुमदार, बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे, सरहदचे संजय नहार, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, अभिनेता प्रवीण तरडे, डॉ. मिलिंद जोशी, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी उपक्रमात सहभागी होत, वाचन संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले. अनेकांचा सहभाग होता. शांतता ..पुणेकर वाचत आहे या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद आनंददायी आहे. अशा उपक्रमांनीच नवी पिढी वाचनाकडे वळणार आहे. तसेच वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे, असे पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील कार्यक्रम १६ ते २४ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहेत. या उपक्रमाला पुणे महापालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यासह सुमारे २५० विविध संस्थांनी पाठिंबा दिला असून, तो वाढतच आहे.

Pune Pustak Mahotsav | PMC Pune | पुणे महापालिका विश्वविक्रम करणार

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Pune Pustak Mahotsav | PMC Pune | पुणे महापालिका विश्वविक्रम करणार

| पाच हजार पालक आपल्या पाल्यांना गोष्टी सांगणार ; वर्ल्ड बुक कॅपिटलचा श्री गणेशा होणार

Pune Pustak Mahotsav | PMC Pune | पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ( National Book Trust) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या (Pune Book Festival) निमित्ताने पाच हजार पालक आपल्या पाल्यांना आज गुरुवारी सकाळी आठ वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गोष्टी सांगणार आहेत. पुणे महापालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) आयोजित होणाऱ्या या उपक्रमाची नोंद गिनेस बुक रेकॉर्डस् मध्ये केली जाणार आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात ‘ वर्ल्ड बुक कॅपिटल ‘ (World Book Capital) होण्याची क्षमता आहे. या विश्वविक्रमाच्या निमित्ताने युनेस्कोचे  निकष पूर्ण करण्याचा महापालिकेकडून (PMC Pune) प्रयत्न होणार असून, पुण्याला वर्ल्ड बुक कॅपिटल बनवण्यासाठी श्री गणेशा होणार आहे. (Pune Municipal Corporation)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमधून लहान मुलांना कथा किंवा गोष्टी सांगण्याचे फायदे नमूद केले आहे. याद्वारे मुलांना आपल्या संस्कृती आणि इतिहासबद्दल माहिती मिळून ती लक्षात राहते. याचे शैक्षणिक फायदे सुद्धा आहे. याला अनुसरूनच पालकांकडून आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याचा उपक्रम पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी पुणे महापालिकेकडून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा आढावा महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे आदी उपस्थित होते. या विश्वविक्रमासाठी सुमारे दहा हजार खुर्च्या समोरासमोर मांडण्यात आल्या आहेत. या उपक्रमात पुणे महापालिकेच्या शाळा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसह अनेक शिक्षण संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी सुमारे पाच हजार पालक आपल्या पाल्यांना विविध गोष्टी, कथा सांगणार आहेत. यापूर्वीचा, पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी किंवा कथा सांगण्याचा विश्वविक्रम चीनच्या नावे असून, तो तोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणजे नक्की काय ?

वर्ल्ड बुक कॅपिटल हा युनेस्कोचा एक उपक्रम असून, तो २३ एप्रिलपासून सुरू होतो. शहरामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण पाया असतो. या अंतर्गत शहाराला एका वर्षासाठी पुस्तकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी वर्ल्ड बुक कॅपिटलचा दर्जा देण्यात देतो. युनेस्को वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून नियुक्त केलेली शहरे ही सर्व वयोगटातील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनेस्कोची मूल्ये सामायिक करण्याच्या उद्देशाने उपक्रम राबवतात.
——

शांतता..पुणेकर वाचत आहेत या उपक्रमातही पुणे महापालिका सहभागी होणार आहे. महापालिकेच्या शाळा, क्षेत्रिय कार्यालये, रुग्णालये आदी ठिकाणी उस्फुर्तपणे दुपारी १२ ते १ या वेळेत पुस्तकांचे वाचन करण्यात येणार आहे. सर्व पुणेकरांनी या उपक्रमात सहभागी होऊन, आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करावे.

विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका


Join Our  – Whattsapp Channel