Davat-a-iftar | द्वेषाची आग थांबवून बंधुभाव वाढवा | सर्वपक्षीय नेत्यांचा सूर

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

द्वेषाची आग थांबवून बंधुभाव वाढवा | सर्वपक्षीय नेत्यांचा सूर

| नाना पेठेतील ‘दावत-ए-इफ्तार’ मध्ये सर्वधर्मीयांची, सर्व पक्षीयांची उपस्थिती

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहर उपप्रमुख डॉ अमोल देवळेकर यांच्या वतीने होप मेडिकल फाउंडेशन च्या सहकार्याने रमजान महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘दावत-ई-इफ्तार’ कार्यक्रमाला सर्वधर्मीय बांधवांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.द्वेषाची आग थांबवून बंधुभाव वाढवावा ,असा सूर यानिमित्ताने उमटला .

रविवार दि ९ एप्रिल सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला.रमजान ,ईस्टर संडे,संकष्टी चतुर्थी… असे सगळे औचित्य साधत उत्साहात हा उपक्रम रविवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरीनंतरही पार पडला !

मुस्लीम बांधवांसाठी रमझानचा उपवास(रोझा ) सोडण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.नाना पेठेतील ए.डी.कॅम्प चौक येथे हा कार्यक्रम झाला. सामाजिक सलोखा,बंधुभाव वृद्धिंगत व्हावा,या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,असे शहर उपप्रमुख डॉ अमोल देवळेकर यांनी सांगितले.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर ,रघुनाथ कुचिक, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, बाळासाहेब मालुसरे, गणेश पेठ गुरुद्वाराचे प्रमुख भोला सिंह अरोरा,अफगाणिस्तानचे वली रहमान यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. संयोजक डॉ. अमोल देवळेकर, डॉ. दीपा देवळेकर, डॉ. प्रज्ञावंत देवळेकर यांनी संयोजन केले.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या,’रमजान च्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने आपण बंधुभावाची शपथ घेतली पाहिजे.श्रद्धा,संयम ,प्रामाणिकपणा वाढवला पाहिजे. ज्यांच्या मनात द्वेष आहे,त्यांनी हे उपक्रम पहिले पाहिजेत. त्यांनी मनातील द्वेष काढून टाकला पाहिजे.जीवनप्रवासात कोणाला आपण दुखवता कामा नये,असा संकल्प केला पाहिजे. त्यातून सर्वांच्या घरात शांतता आणि समृद्धी यावी. ‘

 

रवींद्र माळवदकर म्हणाले,’पूर्वी नाना पेठ,भवानी पेठ दंगलींचे उगमस्थान असायचे ,आता सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश देणारा हा परिसर सर्वधर्मीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून पुढे आला आहे . त्यासाठी सर्व कार्यकर्ते अभिनंदनास पात्र आहेत .

रघुनाथ कुचिक म्हणाले,’कोणताही धर्म चुकीची शिकवण देत नाही.हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराज सर्व समाजाला बरोबर घेऊन चालले होते.धर्माच्या नावावर पेटवली जाणारी आग थांबवून बंधुभाव वाढवला पाहिजे. हीच भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुढे चालली आहे.शांततेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ‘

गणेश पेठ गुरुद्वाराचे प्रमुख भोलासिंग अरोरा म्हणाले,’ रमजान च्या पवित्र महिन्यात आपण सर्वांच्या मनातील किल्मिष निघून जावे,महाराष्ट्र प्रगतीपथावर जावा अशी प्रार्थना केली पाहिजे.

अफगाणिस्थान चे वली रहमान यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले .ते म्हणाले,’ भारताचे वैशिष्ट्य हे विविधतेतील एकता हे आहे. इथे सर्व धर्म सामंजस्याने नांदतात. सर्व धर्मीय कार्यक्रम उत्साहाने साजरे होतात. हे वैशिष्ट्य मानवतेचे आहे,ते जपले पाहिजे. ‘

चित्रपट निर्माते निलेश नवलखा,भाजपचे मनीष साळूंखे उपस्थित होते .

जावेद शेख यांनी सूत्रसंचालन केले. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण केले.