PMC : कॉंग्रेस चे नगरसेवक पिशव्या, बकेट, बाकडी खरेदी नाही करणार 

Categories
Breaking News PMC Political पुणे

कॉंग्रेस चे नगरसेवक पिशव्या, बकेट, बाकडी खरेदी नाही करणार 

: नगरसेवकांना सूचना करणार : रमेश बागवे

पुणे : महापालिकेच्या खर्चातून कचऱ्यासाठीच्या पिशव्या, बकेट, बाकडी, ढकलगाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, हा निर्णय म्हणजे नगरसेवकांच्या निवडणूक प्रचारासाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याने या वस्तूंची खरेदी आयुक्तांनी थांबवावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र किराड व संजय बालगुडे यांनी दिला आहे. तसेच आमच्या नगरसेवकांना देखील ही खरेदी न करण्याची सूचना केली जाईल. असे अध्यक्ष बागवे यांनी सांगितले.

     महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन त्यात बकेट, पिशव्या आणि ढकलगाडी यांचा वापर नगरसेवक प्रचारासाठी करतील असे नमुद करण्यात आले आहे. याकरिता, या वस्तूंची खरेदी तूर्त थांबवावी. निवडणुकीनंतर महापालिकेच्या अंदाजपत्रकात रितसर तरतूद करुन या वस्तूंची खरेदी केली जावी आणि मार्च महिन्यात त्यांचे वाटप करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

     वस्तू खरेदी करुन त्यावर नगरसेवक आपापली नावे लिहून त्या वस्तूंचे वाटप करतात हा प्रचाराचाच एक भाग होईल. अवघ्या चार महिन्यांत निवडणुका होणार असल्याने नागरिकांकडून कररुपाने मिळालेल्या पैशातून सुमारे १६ कोटी रुपयांची उधळपट्टी होईल हे गैर आहे. आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अनागोंदी आळा घालावा. शिवाय, बदललेल्या प्रभाग रचना लक्षात घेऊन वस्तुंचे वाटप होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातूनही गोंधळ उडेल, नगरसेवकांसाठी असलेल्या निधीतून ढकलगाडी खरेदी करण्यास सक्त विरोध राहील. ढकला गाड्यांवरही नगरसेवकांची नावे लिहून प्रचार साधला जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.

     आयुक्तांनी विशेष अधिकार वापरुन ही खरेदी थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.


पिशव्या, बकेट, बाकडी, ढकलगाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, हा निर्णय म्हणजे नगरसेवकांच्या निवडणूक प्रचारासाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याने या वस्तूंची खरेदी आयुक्तांनी थांबवावी. आम्ही आमच्या नगरसेवकांना देखील ही खरेदी न करण्याच्या सूचना करणार आहोत.

        रमेश बागवे, अध्यक्ष, शहर कॉंग्रेस

Policy : PMC : नगरसेवकांना दिलासा : नगरसेवक खरेदी करू शकणार बकेट, कापडी पिशव्या आणि बेंचेस 

Categories
Breaking News PMC पुणे

नगरसेवक खरेदी करू शकणार बकेट, कापडी पिशव्या आणि बेंचेस

: महापालिका मुख्य सभेने दिली मंजुरी

: नगरसेवकांना दिलासा

 पुणे.  कचऱ्याच्या बादल्या, कापडी पिशव्या, बेंच आणि कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या खरेदीत दिसणाऱ्या गडबडीला सर्वपक्षीय नेत्यांनी ब्रेक लावला होता. त्याबाबत एक धोरण ठरवण्यात आले होते. त्यानुसार  एखाद्या नगरसेवकाला या चार वस्तू खरेदी कराव्या लागणार असतील तर त्या खरेदीसाठी नगरसेवकांना केवळ 10 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.  यापेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार नाही.  सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हे धोरण ठरविण्यात आले होती. या धोरणावर स्थायी समिती आणि महासभेची शिक्कामोर्तब आवश्यक होते. स्थायीने त्यास मान्यता दिली होती. आता याबाबतचा अंतिम निर्णय आजच्या सर्वसाधारण सभेत होणार होता. त्यानुसार सभेने मंजुरी दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांना हा दिलासा मानला जात आहे.

– नागरिकांकडून तक्रारी येत होत्या

 घरोघरी जाऊन कचरा वाटपासाठी नगरसेवकांकडून नागरिकांना प्लास्टिकच्या बादल्या दिल्या जात असतात.  यासोबतच वाहतूक करण्यासाठी वाहनेही उपलब्ध करून दिली आहेत.  या शिवाय नागरिकांसाठी बेंच आणि कापडी पिशव्याही खरेदी केल्या जातात.  या चार वस्तूंच्या खरेदीबाबत वारंवार तक्रारी येत होत्या.  कारण यामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत होती.  याबाबत महासभेतही टीकेची झोड उठली होती.  त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन याबाबत धोरण ठरविण्यात आले.

 – सर्वपक्षीय नेते आणि स्थायीनेही मान्यता दिली

  आता सर्वपक्षीय नेत्यांनी अशा खरेदीला ब्रेक लावला आहे.  आगामी काळात एखाद्या नगरसेवकाला या चार वस्तू खरेदी कराव्या लागणार असतील तर त्या खरेदीसाठी नगरसेवकांना केवळ 10 लाखांचा निधी दिला जाणार आहे.  यापेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार नाही.  म्हणजेच 5 लाखांपर्यंत बादल्यांची खरेदी असेल, तर उर्वरित 5 लाखांच्या बाक, पिशव्या नगरसेवक खरेदी करू शकतात.  सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हे धोरण ठरविण्यात आले.  या धोरणावर स्थायी समिती आणि महासभेची शिक्कामोर्तब आवश्यक आहे.   स्थायीने त्यास मान्यता दिली आहे.  आता याबाबतचा अंतिम निर्णय आजच्या सर्वसाधारण सभेत होणार होता.