Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बैठक

 

Phule Smarak Pune |  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले (Mahatma Jyotiba Phule)आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा(Phule Wada)  तसेच फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा (Bhide Wada) येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.

देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून शैक्षणिक, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात क्रांतीकारी कार्य करणाऱ्या फुले दांपत्यासारख्या महामानवांचे स्मारक त्याच्या कार्याला न्याय देणारे असले पाहिजे. त्यासाठी हेरिटेज दर्जा आणि आधुनिक वास्तूकलेचा सुरेख मिलाप साधून हे प्रेरणादायी स्मारक तयार करण्यात यावे. स्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला. (Pune Local News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीला अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा तर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व्हीसीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशात स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासाने वावरताना दिसतात त्याचे श्रेय सर्वस्वी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना जाते. त्यामुळे सावित्रीबाईंचे कार्य, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, केलेला त्याग याची माहिती शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. त्यातून युवा पिढीला मार्गदर्शन, प्रेरणा मिळाली पाहिजे. यासाठी प्रस्तावित स्मारकांमध्ये फुले दांपत्याच्या जीवनकार्याबद्दलची माहिती देणारे थिएटर, युपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्रासारख्या सुविधा असल्या पाहिजेत. नवे स्मारक पुण्याच्या हेरीटेज वास्तुसौंदर्यात भर घालणारे असले पाहिजे, त्यासाठी आराखड्यावर अधिक काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.