Pune Metro | जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक | पुणे मेट्रोची माहिती

Categories
Breaking News social पुणे

Pune Metro | जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक | पुणे मेट्रोची माहिती

Pune Metro | पुणे मेट्रोच्या PCMC ते स्वारगेट (१७ किमी) आणि वनाझ ते रामवाडी (१६ किमी) अश्या दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक (Civil Court Underground Metro Station) येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकामधे PCMC ते स्वारगेट मार्गिकेवरील भूमिगत स्थानक आणि वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना एस्किलेटर आणि लिफ्ट यांनी जोडले आहे.  सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली ३३.१ मीटर (१०८.५९ फूट) असून हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे. या भूमिगत स्थानकाचे आजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत ९५ फूट उंच असून तेथे थेट सूर्यप्रकाश वा नैसर्गिक प्रकाश पडेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. असे वौशिष्ठ असणारे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक आहे. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro)
या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो  स्थानकाला डेंगळे पूल, कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा न्यायालय या बाजूंनी प्रवाश्याना येण्या-जाण्यासाठी पादचारी वा वाहतुकीचे प्रावधान करण्यात आले आहे. सिव्हिल कोर्ट ते हिंजेवाडी हि पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक हे मेट्रो झाल्याचे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल. त्यामुळे या स्थानकात ८ लिफ्ट आणि १८ एस्किलेटर प्रवाश्यांसाठी बसविण्यात येत आहेत. (Pune Metro News)
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर ११.१७ एकर असून या स्थानकाला येण्या-जाण्यासाठी एकूण ७ दरवाजे लावण्यात येणार आहेत. या स्थानकात मोठ्याप्रमाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ‘ड्रॉप अँड गो’ साठी एक स्पेशल लेन असणार आहे. मल्टी मोडल इंटिग्रेशन साठी PMPML चा थांबा असणार आहे. या संपूर्ण परिसराचे लँडस्केप अत्यंत आकर्षक असे करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कारंजी, विविध झाडे, हरित पट्टे, आकर्षक झाडी मोठ्याप्रमाणावर लावण्यात येणार आहे.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी मेट्रो भवनचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे मेट्रोचे प्रशासन या मेट्रो भवन येथील कार्यालयांतून होईल. मेट्रो भवनची इमारत IGBC प्लॅटिनम मानांकनानुसार बांधण्यात येणार असून मेट्रो भवनाच्या फसाटवर मोठ्याप्रमाणात झाडे लावण्यात येणार आहेत.  येत्या दोन महिन्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि PCMC ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच या दोन्ही मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग प्रवाश्यांसाठी खुले झाल्यावर पुणे व पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे मेट्रोसारख्या ‘मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थे’ ने जोडली जाणार आहेत. त्यामुळे येथील प्रवाश्यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. PCMC ते वनाझ या २२ किमीचा प्रवास केवळ ३१ मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. यामुले चाकरमानी, महिला, विध्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. मेट्रोने पर्यावरण पूरक, जलद, सुरक्षित, ऑल वेदर असा पर्याय पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना दिला आहे. असे पुणे मेट्रोच्या वतीने सांगण्यात आले. (Pune News)
News Title | Pune Metro | Civil Court Underground Metro Station is coming up 108 feet below the ground Information about Pune Metro

Pune Metro | छत्रपती संभाजी उद्यान आणि डेक्कन स्थानके त्यांच्या विशिष्ठ रचनेमुळे विलोभनीय ठरणार

Categories
Breaking News social पुणे

छत्रपती संभाजी उद्यान आणि डेक्कन स्थानके त्यांच्या विशिष्ठ रचनेमुळे विलोभनीय ठरणार

पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गीकेमध्ये वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गीका प्रवाशांसाठी मागील वर्षी खुली करण्यात आली. गरवारे कॉलेज स्थानक ते रामवाडी स्थानक मार्गीकेवरील कामे अत्यंत वेगाने सुरू असून एप्रिल २०२३ अखेर गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गिकेचे काम पूर्ण करून सी. एम. आर. एस. इन्स्पेक्शन करण्यात येणार आहे. तदनंतर ही मार्गीका प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.

या मार्गिकेवर डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक आणि रुबी हॉल क्लिनिक ही महत्त्वाची स्थानके आहेत. ही मार्गिका खुली करण्यात आल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफसी रोड), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, पुणे मनपा, दिवाणी न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी आणि जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज इत्यादी महत्त्वाची ठिकाणे मेट्रो द्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होणार आहे. या मेट्रो स्थानकांपैकी डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक यांचे काम अत्यंत आव्हानात्मक होते आणि त्या आव्हानांवर मात करत ती स्थानके पूर्णत्वाकडे आली आहेत.


डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान या स्थानकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना असल्यामुळे ही स्थानके पुण्याची शान असणार आहेत. या स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या पगडीच्या आकाराप्रमाणे करण्यात आली आहे. सुमारे १४० मीटर लांब, २६ मी उंच आणि २८ मीटर रुंद अशा भव्य स्थानकांची रचना मावळा पगडी प्रमाणे करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. स्थानकांच्या छताची रचना त्रिमितीय असल्यामुळे स्थानकाच्या लांबीच्या दिशेने छताच्या रुंदी आणि उंचीमध्ये फरक पडतो. त्यामुळे छतावर असलेल्या प्रत्येक लोखंडी खांब, मेंबर्स आणि रूफ शीट या प्रत्येकाची लांबी, उंची व रुंदी भिन्न आहे. अशा प्रकारचे तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट बांधकाम वेळ खाऊ आणि तांत्रिकदृष्ट्या खूपच अवघड असते, कारण प्रत्येक लोखंडी खांब, मेंबर्स आणि रूफ शीट यांचे आरेखन स्थानानुसार बदलते त्यामुळे अत्यंत्य सावधानी पूर्वक स्थानकाचे बांधकाम करावे लागते.

प्रत्येक रूफ शीटचा बाक आणि लांबी वेगळी असल्याने त्याला बाक देण्यासाठी स्थानकाच्या जागेजवळ ‘प्रोग्रेसिव रोलिंग मिल’ बसवण्यात आले आहे. जेणेकरून गरजेनुसार रूफ शीटची बेंडिंग आणि क्रिपिंग जागेवरच करता येईल. रूफ शिटचे पीईबी स्ट्रक्चरला फिटिंग करताना वैशिष्ट्यपूर्ण फिटिंग फिक्चर चा वापर करण्यात येतो. जेणेकरून रूफ शीट स्टील स्ट्रक्चरला घट्ट बसेल आणि हवा, पाऊस, ऊन इत्यादी गोष्टींनी त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. विशिष्ट प्रकारचे फिक्सर्स लावल्याने छताला छिद्र पाडून नटबोल्ट लावण्याची गरज पडली नाही, त्यामुळे पाणी लीक होणार नाही.

डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान ही स्थानके नदीपत्रात असून स्थानकांची उंची जमिनीपासून ६० ते ७० फूट आहे. या दोन्ही स्थानकांचे छताची पगडी आणि नॉन पगडी असे काम करण्यासाठी विभागणी करण्यात आले होती. दोन्ही विभागाचे काम त्यांच्या त्रिमितीय रचनेमुळे आव्हानात्मक होते. दोन्हीही भागांसाठी वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे ही स्थानके अत्यंत विलोभनीय दिसणार आहेत. इतक्या उंच काम करणे आणि तेही तिन्ही मितीमध्ये निमुळत्या असणाऱ्या छतावर हे अत्यंत जोखमीचे आणि आव्हानात्मक होते. अशा उंचीवर विविध उपकरणे घेऊन रूफ शीट आणि पीईबी मेंबर लावण्यासाठी अत्यंत कुशल अशा कामगारांच्या आवश्यकता भासते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता या छतांची कामे आता पूर्णत्वाकडे आली आहेत.

डेक्कन आणि संभाजी उद्यान स्थानक यांची विशिष्ट रचनेमुळे कामे आव्हानात्मक होती. त्याचप्रमाणे ही स्थानके नदीपात्रात असल्याने तेथे सामान घेऊन जाण्यासाठी खूप अवघडीचे होते. नदीपात्रात थेट असा रस्ता नसल्याने अवजड वाहने, क्रेन, काँक्रीट, ग्रॅनाईट, सिमेंट ब्लॉक, छतासाठी लागणारे मोठे लोखंडी खांब, रूफ शीट इत्यादी सामान ने- आण करण्यासाठी अडचणीचे होते. तेथे एका बाजूला नदीपात्र तर दुसऱ्या बाजूला झेड ब्रिज व छत्रपती संभाजी उद्यान यामुळे रूफ शीट चे क्रेनद्वारे काम करणे खूपच अडचणीचे ठरत होते. परंतु या सर्व आव्हानांवर मात करत या दोन्ही स्थानकांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.

डेक्कन आणि छत्रपती संभाजी स्थानक ही स्थानके लवकरच प्रवाश्यांसाठी खुली होणार आहेत. यामुळे जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन जिमखाना, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना मेट्रोद्वारे जाणे सहज शक्य होणार आहे. या स्थानकांवर जाण्यासाठी पादचारी पुलाद्वारे जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथून जाणे शक्य होणार आहे. या दोन्ही स्थानकांना पेठ भागाशी जोडण्यासाठी पादचारी केबल सस्पेंडेड पुलाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे नारायण पेठ ते डेक्कन स्थानक व छत्रपती संभाजी स्थानक ते शनिवार पेठ ही दोन्ही ठिकाणे पादचारी पुलाद्वारे जोडली जाणार आहेत. यामुळे शनिवार पेठ, नारायण पेठ आणि त्या लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मेट्रोद्वारे शहराच्या विविध भागात जाणे शक्य होणार आहे.
डेक्कन स्थानक आणि छत्रपती संभाजी स्थानक या दोन्ही स्थानकांदरम्यान मेट्रो व्हायडक्ट खाली एक पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. त्यामुळे हि दोन्ही स्थानके पादचारी पुलामुळे जोडले जातील. या विहंगम परिसराच्या शोभेमध्ये अधिकच भर पडणार आहे

याप्रसंगी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, “डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ही दोन्ही स्थानके अत्यंत देखणी अशा स्वरूपाची होत आहेत. या दोन्ही स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा पगडी पासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या स्थानकांसाठी काम करणाऱ्या कामगारांचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मला कौतुक करावे वाटते, इतक्या आव्हानात्मक परिस्थिती त्यांनी ही कामे पूर्णत्वाकडे आणली आहेत.”

Pune Metro | पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या उन्नत मार्गिकेवरील शेवटच्या सेगमेंटची उभारणी

Categories
Breaking News social पुणे

पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या उन्नत मार्गिकेवरील शेवटच्या सेगमेंटची उभारणी

पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक हा १२ किमीचा मार्ग उन्नत असून उर्वरित मार्ग भूमिगत आहे. या १२ किमी उन्नत मार्गाच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी आज पूर्ण करण्यात आली. त्यामुळे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर लवकरच मेट्रो धावण्याची चाचणी घेणे शक्य होणार आहे. चाचणीनंतर फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक हा मार्ग प्रवाश्यांसाठी खुला करण्यात
येईल.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या १२.०६४ किमी उन्नत मार्गासाठी एकूण ३९३४ सेगमेंट बनविण्यात आले होते. या सेगमेंटद्वारे ४५१ स्पॅन उभारण्यात आले व १२.०६४ किमीचा उन्नत मार्ग बनविण्यात आला. या मार्गावर पहिला मेट्रोचा खांब दिनांक ७/१०/२०१७ रोजी बांधण्यात आला. नाशिक फाटा येथे भव्य कास्टिंग यार्डची उभारणी करण्यात आली. ज्यात ३९३४ सेगमेंट बनविण्यात आले. या मार्गिकेसाठी लागणारा पहिला सेगमेंट दिनांक २९/८/२०१७ रोजी बनविण्यात आला व शेवटचा सेगमेंट १९/१०/२०२२ रोजी बनविण्यात आला. तसेच या मार्गावर पहिला सेगमेंट १४/१२/२०१७ रोजी पिअर नं. ३४८-३४९ यामधील स्पॅनसाठी उभारण्यात आला. या सुरुवातीचा आज शेवटच्या टप्प्यात पिअर नं. १४९-१५० मधील स्पॅनसाठी शेवटचा (३९३४ वा) सेगमेंट उभारण्यात आला. अश्याप्रकारे संपूर्ण १२.०६४ किमी उन्नत मार्गाचे व्हायाडक्तचे काम आज पूर्ण झाले.

या १२.०६४ किमीच्या उन्नत मार्ग पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करण्यात आली. सर्वात मोठी अडचण सैन्यदलाकडून हॅरिस पूल ते खडकी येथील जागा मिळवणे हि होती. त्यासाठी सैन्यदलाकडे निरंतर पाठपुरावा करून जुलै २०२२ मध्ये मेट्रो उभारणीस जागा देण्यात आली. सैन्यदलाकडून या मार्गास जमीन मिळण्यास विलंब झाला तरी देखील मेट्रोने काम न थांबवता रेंजहील स्थानक ते खडकी आणि फुगेवाडी स्थानक ते हॅरिस पूल या टप्प्याची कामे चालू ठेवली आणि वेळेत पूर्णत्वास नेली. आजच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी केल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते हॅरिस पूल आणि रेंजहील स्थानक ते खडकी यामधील गॅप भरण्यात येऊन व्हायाडक्तचे काम पूर्णत्वास येत आहे. कोरोना काळात सर्वच मोठे प्रकल्प ठप्प पडले आणि त्याचा फटका महामेट्रोलाही बसला. या भागामध्ये वाहतूक नियमन हि अत्यंत्य गुंतागुंतीचे होते. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून खडकी येथील वाहतूक नियमन करण्यात आले
व आपल्या नियोजित वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले.

फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक व गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावरील कामे ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन मेट्रोने केले आहे. त्याला अनुसरूनच आजच्या शेवटच्या सेगमेंटची उभारणी होत आहे. सैन्यदलाकडील जमीन, कोरोना आणि वाहतूक नियमन इत्यादी अडचणींवर मात करून नियोजित वेळेत या १२.०६४ किमी उन्नत मार्गाचे काम पूर्ण होत
आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२२ अखेर हे काम पूर्णत्वास घेऊन जाणे शक्य होईल.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे की, " आजचा दिवस पुणे मेट्रोच्या कामाचा महत्वाचा टप्पा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या १२.०६४ किमी उन्नत मार्गाच्या व्हायाडक्तचे काम नियोजित वेळात पूर्ण होत आहे. लवकरच फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक व गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हील कोर्ट स्थानक या
मार्गावर मेट्रोच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.