Pune : School Closed : Ajit Pawar : पुणे शहर आणि जिल्ह्यात १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद! : नववी आणि दहावीचे वर्ग सुरु राहतील 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र

पुणे शहर आणि जिल्ह्यात १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद!

: नववी आणि दहावीचे वर्ग सुरु राहतील

: पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे जिल्ह्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आता मास्क नसेल तर पाचशे रुपयांचा दंड होणार आहे. तसेच पालकमंत्र्यांनी शाळांसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, सध्या पुणे जिल्ह्यात 74 टक्के सेंकड डोस घेतलेला आहे. माझी पुणेकरांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलायला लावू नका. आज काही निर्णय घेतोय. उर्वरित लोकांनी डोस घेतलाच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुढे त्यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर करत म्हटलंय की, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आणि कोर्पोरेशनबाबत पहिली ते आठवी पर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून नववी-दहावीचे वर्ग चालू राहिल. मात्र, पहिली ते आठवीचे यांचं ऑनलाईन शाळा कामकाज सुरु राहिल. नववी-दहावीचे विद्यार्थी आले पाहिजेत कारण त्यांना लस द्यायची आहे. डी जी भार्गव यांनी देखील सांगितलं की, ही जर परिस्थिती 10 टक्के पॉझिटीव्हीटीची तर तुम्ही निर्णय घ्या. पुणे शहरामध्ये पॉझिटीव्हीटीचा दर 18 टक्क्यापर्यंत गेला आहे. या परिस्थितीतच काळजी करण्याचं कारण बनतं. म्हणूनच काळजीपोटी हे निर्णय घेण्यात येत आहे. पुढील तीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सध्या 105 देशांत आणि भारतातील 23 राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात 11 ठिकाणी सापडले आहेत.

अजित पवार यांनी पुणेकरांना इशारा देत म्हटलंय की, पुणेकरांनी लशीचा दुसरा डोस न घेतल्यास इथून पुढेही कठोर निर्णय घेऊ. इतर देशात एकदम पॉझिटीव्हीटीचा दर वाढलेला दिसून आला आहे. म्हणून आपण 30 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. चार टक्के लसीकरण काल पूर्ण केलंय मुलांचं. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुण्यात आज 1 हजार 104 कोरोनाचे रुग्ण आहेत. सर्व नागरिकांनी थ्री फ्लायर डबल असा चांगला मास्क वापरावा.

पुण्यात असे असतील निर्बंध

  • मास्क नसेल तर 500 रुपये दंड
  • मास्क नसताना थुंकला तर 1000 रुपये दंड
  • लसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. हॉटेल असो वा शासकीय कार्यालय असो, कुठेही प्रवेश मिळणार नाही.

Omicron Varient: Ajit Pawar : अजित पवार म्हणाले; येत्या दोन महिने खूप काळजी घ्यावी लागणार

Categories
Breaking News आरोग्य पुणे महाराष्ट्र

आगामी दोन महिन्यात खूप काळजी घ्यावी लागणार’

: उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे -राज्यात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, लोकांना याचे गांभीर्य नाही. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारी महिन्यात खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आम्हालाही निर्बंध लावायला चांगले वाटत नाही. त्यामुळे सर्वांनीच नियमांचे पालन करावे, असे आवाहन पवार यांनी केले.

पवार यांनी सांगितले की, वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना बूस्टर डोस दिला पाहीजे, असाही निर्णय झाला आहे. 18 वर्षांपासून सर्वांनी दोन्ही डोस घेतले पाहिजे. जिल्ह्यात 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस झाला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्यासाठी लोक पुढे येत नाहीत.

 

यात राजकारण न आणता काम केले पाहिजे. हे सर्व जनतेच्या सहभागाशिवाय होणार नाही. यावेळी पवार म्हणाले की, मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही.

नवीन वर्षाचं स्वागत घरातच करा…


नवीन वर्षाचे स्वागत बाहेर न करता घरातच करा. आम्हालाही बंधन घालायला बर वाटत नाही. आत्ता कुठे परिस्थिती सुधारत होती. पण, परत नवी समस्या निर्माण झाली. काही राज्यांनी रात्रीचं लॉकडाऊन लावले आहे. काहींनी तर निवडणूक पुढे ढकल्या असल्याचे पवार यांनी सांगितले.

Omicron : Vaccination : ब्रिटनमध्ये १२ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला मान्यता

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश

ब्रिटनमध्ये १२ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला मान्यता

लंडन : कोरोना व्हायरसचा नवीन आणि अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट (Omicron Variant cases in Britain) ओमिक्रॉनने ब्रिटनमधील परिस्थिती अधिक बिकट केली आहे. दरम्यान, ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ होत असताना, आता ब्रिटीश नियामकाने 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरची (Pfizer) लस वापरण्यास मान्यता दिली आहे. ब्रिटन लसीच्या बूस्टर डोससाठी मोहीम तीव्र करण्याची तयारी करत आहे.

सध्या ब्रिटनमध्ये (Omicron cases high in britain) दररोज नवीन प्रकरणांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहे. ब्रिटनच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) ने सांगितले की, फाइझर-बायोएनटेकची लस 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी “सुरक्षित आणि प्रभावी” असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर त्याचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी, ब्रिटन लसीच्या बूस्टर डोससाठी मोहीम तीव्र करण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सेल्फ आयसोलेशचा कालावधी केला कमी

ब्रिटनने कोरोनाची लागण झालेल्या लोकांसाठी सेल्फ आयसोलेशनचा कालावधी 10 दिवसांवरून सात दिवसांवर आणला आहे. नियमांमधील बदल यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (UKHSA) यांच्याशी सल्लामसलत करून करण्यात आला असल्याचे ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सांगितले.

लसीकरण व मास्क हाच ओमिक्रॉनवर प्रभावी उपाय 

ओमिक्रॉन (Omicron)या कोरोनाच्या(corona) नव्या प्रकारापासून स्वतःला वाचवायचे असेल तर, लसीकरण(vaccination) व सतत मास्क वापरणे हाच उपयुक्त व परिणामकारक उपाय आहे, असे निरीक्षण दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नोंदवले आहे. या प्रकाराच्या घातक क्षमतेबाबतचा अंदाज आला की सध्याच्या लसींमध्ये काही बदल करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

Omicron varient: सावधान..! ओमिक्रॉन चा धोका वाढतो आहे!

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश

सावधान..! ओमिक्रॉन चा धोका वाढतो आहे! 

नवी दिल्ली : देशातील  ओमिक्रॉन या व्हेरिएंटच्या (Omicron variant)संसर्गाचा धोका बळावत असल्याने यंत्रणा सावध झाली असून देशातील एकूण बाधितांची संख्या २१३ वर पोचली आहे, महाराष्ट्र आणि दिल्लीत संसर्गाचा धोका वाढला आहे. राजधानी दिल्लीत ख्रिसमस आणि नववर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून अन्य राज्ये देखील तोच कित्ता गिरविण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज देशभरातील  परिस्थितीचा आढावा घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. उत्तरप्रदेशात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव आणि मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले असून अखिलेश यांनीही स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. डिम्पल आणि त्यांच्या मुलीवर सध्या घरीच उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजस्थानमध्ये देखील आज ओमिक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन सावध झाले आहे. दुसरीकडे वाढता संसर्ग रोखण्यासाठी बूस्टर डोसबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली असून सरकारने मात्र सखोल संशोधनानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. याआधीही अशीच मागणी करण्यात आली होती.

ऑक्सिजन व्यवस्थापनावर भर

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून धडा घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑक्सिजनच्या प्रभावी आणि योग्य वापरावर भर दिला आहे. आता आरोग्य कर्मचाऱ्यांना  ऑक्सिजनच्या वापराचे धडे दिले जाणार असून उपलब्ध साठ्याचा योग्य वापर करण्याबरोबरच थोडाही ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे निर्देश या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. राष्ट्रीय ऑक्सिजन परिचारक कार्यक्रमाला आज ‘एम्स’मधून सुरूवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार उपस्थित होत्या. कोरोना आणीबाणीच्या काळामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती त्यामुळे त्याचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाल्या.

देशातील मोठी लोकसंख्या कोरोना लशीपासून अद्याप वंचित असून डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ४२ टक्के लोकांचेच लसीकरण होऊ शकेल. आपल्याला संसर्गाची तिसरी लाट रोखायची असेल तर साठ टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार बूस्टर डोसचा कधी विचार करणार आहे.

        – राहुल गांधी, नेते काँग्रेस

Omicron Varient: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास भारत सज्ज : केंद्रीय आरोग्यमंत्री मंडविया

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास भारत सज्ज

: केंद्रीय आरोग्यमंत्री मंडविया

नवी दिल्ली : ‘‘कोरोनाच्या ओमिक्रोन (omicron) या नव्या व्हेरियंटशी लढण्यास भारत(india) सज्ज आहे.’’ अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया(central minister mansukh mandviya) यांनी आज राज्यसभेत(rajyasabha) दिली. ओमिक्रॉनवरील चर्चेला उत्तर देताना मंडविया म्हणाले की, ‘‘ दुसऱ्या लाटेपासून केंद्रीय व राज्यांच्या यंत्रणांनी धडा घेऊन ऑक्सिजन प्रकल्पासह  विविध उपाययोजनांत भरीव वाढ केली आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट आलीच तरी तिला तोंड देण्यास सरकार सज्ज असेल.’’

ओमिक्रोनच्या  रुग्णसंख्येत वाढ होत असून महाराष्ट्र व दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने केंद्राने राज्याच्या यंत्रणेबरोबर २४ तास संपर्क यंत्रणा सावध ठेवली आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांची अधिकृत संख्या १६१ झाली त्यातील ४२ रुग्ण बरे झाले असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या विषाणूमुळे देशात अद्याप कोणताही कोरोना रुग्ण गंभीर आजारी झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. ॲमिक्रॉनची रुग्णसंख्या पाहता केंद्राने बूस्टर लसीकरणास त्वरित सुरवात करावी अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. दिल्ली सरकारने सर्वच कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडाविया यांचे उत्तर सुरू असताना विरोधी पक्षांचे सदस्य गदारोळ करत होते त्यांना आरोग्यमंत्र्यांनी, कोरोनासारख्या विषयांवर तरी देश एक आहे असे जगासमोर जाऊ द्या, अशी विनंती केली.

राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद

मंडाविया म्हणाले की, ‘‘ दक्षिण आफ्रिकेसह ज्या देशांत ओमिक्रॉनचा विस्फोट झाला आहे, अशा देशांना केंद्राने ‘धोका’ असणारे देश या गटात टाकले असून त्या देशांतून येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे असेल. मी स्वतः राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा कली असून सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी तीनदा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांकडे आजही किमान १७ टक्के लशी शिल्लक आहेत. ’’

Omicron Variant : मोठी बातमी : महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश महाराष्ट्र

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

मुंबई : ४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.

आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आता पर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

Omicron in India : भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव : कर्नाटकमध्ये सापडले २ रुग्ण!

Categories
Breaking News आरोग्य देश/विदेश

भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव

: कर्नाटकमध्ये सापडले २ रुग्ण!

दिल्ली : जगभरात करोनाबाबत नव्याने धास्ती निर्माण करणारा ओमायक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे. कारण भारतात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना लव अग्रवाल यांनी कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचं सांगितलं असून आत्तापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे ओमायक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

 दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं

दरम्यान, कर्नाटकमध्ये सापडलेले ओमायक्रॉनचे दोन्ही रुग्ण हे परदेशी नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या दोघांचं वय ६६ वर्षे आणि ४६ वर्षे असं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी करून त्यांची चाचणी करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ओमायक्रॉनचा संसर्ग आढळून आलेल्या दोघांमध्ये करोनाची अत्यंत सौम्य लक्षणं असून कोणतीही गंभीर लक्षणं दिसत नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

घाबरून जाण्याची गरज नाही

ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचं सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे. “घाबरून जाण्याची आवश्यकता नसली, तरी सतर्क राहाणं आवश्यक आहे. कोविडचे नियम पाळणं आणि गर्दी टाळणं हे महत्त्वाचं आहे”, असं लव अग्रवाल म्हणाले.