MP Supriya Sule | मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या

| पुरंदर, भोर, वेल्ह्यात बीएसएनएल टॉवरसाठी खा. सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

दिल्ली : मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी बीएसएनएलचे टॉवर उभारण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

केंद्रीय दळणवळण तथा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी याविषयी सविस्तर चर्चा करत त्यांना लेखी पत्रही दिले. बारामती लोकसभा मतदार संघातील भिगवण हे मोठी बाजारपेठ असलेलं शहर आहे. शिवाय सोलापूर पुणे महामार्गावरील एक महत्वाचे शहर असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे, ही बाब त्यांनी वैष्णव यांच्या लक्षात आणून दिली.

रोज प्रवास करणारे हजारो कामगार, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतकरी आणि अन्य सर्वसामान्य नागरिकांसाठी भिगवण रेल्वेस्थानकावर गाडी थांबणे अत्यावश्यक आहे. कुरकुंभ, इंदापूर, भांडगाव, जेजुरी आणि बारामती याठिकाणच्या औद्योगिक वासहतींमध्ये काम करणारे हजारो कामगार या स्थानकाचा वापर करतात. याशिवाय पुणे आणि सोलापूर शहरात दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही प्रचंड मोठी आहे. इतकेच नाही, तर वैद्यकीय उपचारांसाठी पुणे-मुंबईला जाणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा मोठी आहे. अशा रुग्णांना सध्या खासगी गाड्यांचा वापर करावा लागत असून तो अत्यंत खर्चिक आहे, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले

पुणे ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या एकूण सहा रेल्वेगाड्यांचा भिगवण स्थानकावरील थांबा कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊन लागले त्यावेळी बंद करण्यात आला. तो अद्याप पूर्ववत सुरू करण्यात आलेला नाही. लॉकडाऊन जाऊन आता दोन वर्षे होत आली तरी अद्याप त्या सहा गाड्या याठिकाणी थांबत नाहीत. मुंबई-पंढरपूर आणि मुंबई-विजापूर या गाड्यांना भिगवण स्थानकावर थांबा देण्यात यावा. याबरोबरच दौंड, जेजुरी आणि नीरा स्थानकावरून ज्या रेल्वेगाड्या जातात त्या सर्वच गाड्यांना त्या त्या स्थानकांवर थांबा देण्यात यावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी याठिकाणी रेल्वेगाड्यांना थांबा असणे अत्यावश्यक आहे. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीची मोठी अडचण आहे. या गावांमध्ये बीएसएनएलचे टॉवर उभरावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या मागणीबाबत आपण नक्कीच सकारात्मक विचार कराल, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

| कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आभार मानून उदघाटनाचे निमंत्रण

दौंड शहरातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कुरकुंभ मोरीचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले. या कामास आवश्यक परवानग्या देऊन लवकरात लवकर काम पूर्ण होण्यास सहकार्य केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. याचबरोबर या मोरीचे औपचारिक उदघाटन करण्यासाठी अवश्य यावे, असे निमंत्रणही त्यांनी यावेळी दिले.

Supriya Sule | प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

| बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय

पुणे|बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली.

रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बारामती परिसरात उद्योग व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने दररोज हजारो कामगार, विद्यार्थी व नागरिक येत असतात. बारामती एमआयडीसीतही अनेक कामगार काम करत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे बारामतीहून मुंबईला आणि मुंबईहून बारामतीला नियमित प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे. या प्रवासाठी केवळ एस टी बसची सेवा खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बारामती ते मुंबई थेट रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रगती आणि डेक्कन एक्सप्रेस सध्या पुण्यातून सुटतात. या गाड्या सुटण्याची वेळ पहाटे आणि सकाळी एकदमच लवकर आहे. परिणामी बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्या बहुतांश वेळा सापडतच नाहीत. बारामतीहून एसटी किंवा अन्य वाहनाने पुण्यात येणे आणि इथून त्या गाड्या पकडणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी एका दिवसात होणाऱ्या कामासाठी अनेकांना किमान दोन दिवस द्यावे लागतात, किंवा थेट एसटी ने जाऊन खर्चिक प्रवास करावा लागतो.

ही बाब लक्षात घेता प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस पुण्याऐवजी बारामतीहून पहाटे पाच वाजता सोडली, तर ती गाडी पुण्यात तिच्या नियोजित वेळी येईल, आणि बारामती परिसरातील प्रवाशांचाही वेळ आणि खर्चही वाचेल, असा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रेणू दुबे यांच्यासमोर रेल्वे खात्याला दिला. त्या म्हणाल्या, ‘बारामतीहून पहाटे पाचच्या दरम्यान दोन पैकी एक गाडी सोडल्यास ती पुण्यात सकाळी सात वाजता पोहोचेल व तेथून मुंबईकडे रवाना होईल तसेच मुंबईहून परतताना तीच गाडी बारामतीकडे मुक्कामी आल्यास अनेकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वेळ देखील वाचणार असल्याने ही सेवा लाभदायक ठरेल’

MP Supriya sule | नगर मध्ये बारा तास अडकलेली निजामुद्दीन एक्स्प्रेस खा. सुळेंच्या प्रयत्नामुळे सकाळी पुण्यात| प्रवाशांनी मानले सुप्रियाताईंचे आभार

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

नगर मध्ये बारा तास अडकलेली निजामुद्दीन एक्स्प्रेस खा. सुळेंच्या प्रयत्नामुळे सकाळी पुण्यात|
प्रवाशांनी मानले सुप्रियाताईंचे आभार

दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर परवा तब्बल बारा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतरही थेट पुण्याकडे न सोडता सोलापूर मार्गे सोडण्याची घोषणा करण्यात आली. ही बाब कळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून रेल्वे थेट पुण्याकडे रवाना करण्यास सांगितले. त्यानंतर काल सकाळी साडेअकराच्या सुमारास ती पुण्यात सुखरूप पोहोचली असून दौंड आणि पुण्यातील अनेक प्रवाशांनी खासदार सुळे यांचे आभार मानले आहेत.

दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस परवा नगर स्टेशनमध्ये पोहोचली. त्यावेळी काही तांत्रिक अडचणी सांगत तब्बल १२ तास ती तेथेच थांबविण्यात आली. त्यानंतरही नेहमीच्या मार्गाने न सोडता ती सोलापूर मार्गे जाईल असे अचानकच प्रवाशांना कळविण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तसे झाल्यास पुणे आणि दौंड येथे उतरणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती.

ही बाब प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. तथापि काहीही फायदा झाला नाही. त्यावेळी काही प्रवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील पदाधिकारी लोचन शिवले आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे यांच्या मार्फत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली. त्यानुसार खासदार सुळे यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्याशी तत्काळ संपर्क साधून प्रवाशांच्या अडचणी सांगितल्या. त्यांना प्रवाशांची अडचण लक्षात आणून देत त्यांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यास सुचविले.

त्यानंतर अखेर रेल्वे विभागाने निजामुद्दीन एक्स्प्रेस सोलापूरकडे न वळवता नेहमीच्या मार्गाने दाैंडमार्गे पुण्याला आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गाडी काल सकाळी साडेकरच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्रीतूनच तातडीच्या सर्व प्रक्रिया पार पाडत सर्व प्रवाशांना सुखरूप दौंड आणि पुण्यात पोहोचण्यासाठी मदत केली याबद्दल सर्व प्रवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.