Supriya Sule | प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

| बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय

पुणे|बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली.

रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बारामती परिसरात उद्योग व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने दररोज हजारो कामगार, विद्यार्थी व नागरिक येत असतात. बारामती एमआयडीसीतही अनेक कामगार काम करत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे बारामतीहून मुंबईला आणि मुंबईहून बारामतीला नियमित प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे. या प्रवासाठी केवळ एस टी बसची सेवा खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बारामती ते मुंबई थेट रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रगती आणि डेक्कन एक्सप्रेस सध्या पुण्यातून सुटतात. या गाड्या सुटण्याची वेळ पहाटे आणि सकाळी एकदमच लवकर आहे. परिणामी बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्या बहुतांश वेळा सापडतच नाहीत. बारामतीहून एसटी किंवा अन्य वाहनाने पुण्यात येणे आणि इथून त्या गाड्या पकडणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी एका दिवसात होणाऱ्या कामासाठी अनेकांना किमान दोन दिवस द्यावे लागतात, किंवा थेट एसटी ने जाऊन खर्चिक प्रवास करावा लागतो.

ही बाब लक्षात घेता प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस पुण्याऐवजी बारामतीहून पहाटे पाच वाजता सोडली, तर ती गाडी पुण्यात तिच्या नियोजित वेळी येईल, आणि बारामती परिसरातील प्रवाशांचाही वेळ आणि खर्चही वाचेल, असा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रेणू दुबे यांच्यासमोर रेल्वे खात्याला दिला. त्या म्हणाल्या, ‘बारामतीहून पहाटे पाचच्या दरम्यान दोन पैकी एक गाडी सोडल्यास ती पुण्यात सकाळी सात वाजता पोहोचेल व तेथून मुंबईकडे रवाना होईल तसेच मुंबईहून परतताना तीच गाडी बारामतीकडे मुक्कामी आल्यास अनेकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वेळ देखील वाचणार असल्याने ही सेवा लाभदायक ठरेल’

MP Supriya Sule | दौंड, पुरंदर तालुक्यांतील रेल्वेशी संबंधीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी | खा. सुप्रिया सुळे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठकीत मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

दौंड, पुरंदर तालुक्यांतील रेल्वेशी संबंधीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी

| खा. सुप्रिया सुळे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठकीत मागणी

पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वे खात्याशी संबंधित विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज चर्चा केली. दौंड रेल्वे स्थानकाचा रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यक्षेत्रात समावेश करणे आणि अन्य मुद्द्यांचा यात समावेश आहे.

दौंड रेल्वेस्थानक हे सोलापूर पेक्षा पुणे शहराशी जवळचे स्थानक असून आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येथील प्रवाशांना पुणे विभागीय कार्यालय सोयीचे आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी यावेळी केली. या मुख्य मुद्द्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यातील रेल्वेशी संबंधीत समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील रेल्वे रुळांखालील कानगाव – पाटस रोड (एल.सी. नंबर १५),कडेठाण – वरवंड रोड (एल.सी. नंबर १४) आणि गिरिम वायरलेस फाटा ते नानवीज ट्रेनिंग सेंटर रस्ता (एल.सी. नंबर १७) येथील मोऱ्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचे पाणी मोऱ्यांमध्ये साचून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याशिवाय काम सुरु असल्याने पर्यायी रस्त्याचे गेटही बंद आहेत. परिणामी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या मोऱ्यांचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.

पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे जेजुरी एमआयडीसी जवळील मोरीचे काम तातडीने सुरु करण्याची गरज असून जेजुरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील वस्त्यांसाठी सर्विस रोड करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच पुरंदर तालुक्यातील अन्य ठिकाणी राहिलेली मोऱ्यांची कामेही तातडीने पूर्ण करावी. आंबळे येथील अंडरपासच्या संरक्षक भिंत, शाळेजवळील उड्डाण पूल कोथळे येथील मोरीचे काम अर्धवट अवस्थेतील काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.