Reservation Lottery | आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी महापालिकेची जय्यत तयारी | अधिकाऱ्यांना वाटून दिली कामे

Categories
Breaking News PMC पुणे

आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी महापालिकेची जय्यत तयारी 

: अधिकाऱ्यांना वाटून दिली कामे 

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी सुरु आहे.  प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे काढली जाणार आहे. ३० मे रोजी रंगीत तालिम होणार आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी आज गणेश कला येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. दरम्यान कुणी काय काम करायचे याची विभागणी देखील करण्यात आली आहे.

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. ५८ प्रभागात १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये २३ जागा अनुसूचित जाती तर २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असतील. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण असणार आहे. तीन सदस्यांच्या प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन महिला असणार आहेत. सोडतीसाठी स्वारगेट येथील गणेश कला क्रिडामंच हे ठिकाण निश्‍चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. आरक्षणाची सोडत चिठ्ठ्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले आहे.

Reservation | PMC Election | पुणे महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर  | निवडणूक आयोगाने निश्चित केला कार्यक्रम 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

: निवडणूक आयोगाने निश्चित केला कार्यक्रम

पुणे आणि पिंपरी सहित १३ महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे 2022 रोजी होणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढणे यासाठी 31/5/2022 ची वेळ देण्यात आली आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

यासाठी आरक्षण आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसुचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट-ड (मराठी)व परिशिष्ट-इ इंग्रजीमधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे. त्याआधी स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी 27/5/2022 पर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढणे यासाठी 31/5/2022 ची वेळ देण्यात आली आहे.

सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे त्याची स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी प्रसिद्धी द्यावी यासाठी 01.06.2022 ची मुदत देण्यात आली आहे. तर, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 जून ते 6 जून पर्यंत देण्यात आला असून, आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण सोबतच्या परिशिष्ट-ड मधील नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे यासाठी 13 जून 2022 ची मुदत देण्यात आली आहे.