PMC Election 2022 | प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Election 2022 | प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

सुप्रीम कोर्टाकडून पुणे महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.  हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात समाधान आहे. 

राज्य सरकारच्या सत्ता संघर्षानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीचा चुकीचे दिशेने प्रवास चालू करत, निवडणुका चार सदस्य प्रभाग पद्धती प्रमाणे घ्याव्यात असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. हा एकूणच देशातील लोकशाही व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही संपवण्याचे कट कारस्थान आहे  थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला होता.

राज्यातील महानगरपालिकांच्या (Corporation) निवडणुका पुढे ढकलून राज्य सरकार ७३ व्या घटना दुरूस्तीने झालेल्या कायद्याचा अवमान करीत आहे. ही भूमिका सर्वोच्च न्यायालयात (Suprme Court Of India)  मांडली असून या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

त्यानुसार सुप्रीम कोर्टाकडून आता पुण्याच्या प्रभाग रचना बदलला स्थगिती मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसणार आहे.

Again four member wards | पुन्हा चार सदस्यीय प्रभाग | 2017 नुसार वाॅर्ड संख्या

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुन्हा चार सदस्यीय प्रभाग : 2017 नुसार वाॅर्ड संख्या

महापालिका निवडणूक आता अजून लांबण्याची चिन्हे आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महापालिका निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता 2017 प्रमाणे चारचा प्रभाग असणार आहे. त्यामुळे सध्या तीनच्या प्रभागरचनेनुसार सुरू असलेली निवडणूक तयारी पुन्हा वाया जाण्याची चिन्हे आहेत. याचा भाजपला फायदा होणार असून महाविकास आघाडीला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.

भाजप सरकारने चारच्या प्रभागानुसार राज्यात 2017 मध्ये अनेक महापालिकांत वर्चस्व मिळवले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने तीनचा प्रभागरचना करून आपल्या सोयीनुसार मतदारसंघ केल्याचा आक्षेप होता. तसेच अनेक महापालिकांत प्रभागांची संख्या महाविकास आघाडी सरकारने वाढवली होती. ही वाढवलेली संख्याही कमी करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आज घेतलेल्या कॅबिनेटमध्ये अधोरेखित केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यातील 18 हून अधिक महापालिकांचे निवडणुकांचे गणित बदलू शकते. अनेक इच्छुकांचा खर्च वाया जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थातील नियमबाह्य पद्धतीने वाढवलेली सदस्यसंख्या त्वरीत रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. तेव्हाच शिंदे सरकार जुनीच प्रभाग रचना करण्याच्या मनःस्थिती असल्याचे स्पष्ट झाले होते.

असा आहे सरकारचा निर्णय

नगर विकास विभाग

मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा

मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे ती खालील प्रमाणे :-
३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ६५ इतकी तर कमाल संख्या ८५ इतकी असेल. ३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ८५ इतकी तर कमाल संख्या ११५ इतकी असेल. ६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक व २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी असेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १६१ इतकी तर कमाल संख्या १७५ इतकी असेल.
—–०—–

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ आणि जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल.
—–०—–

PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उद्या  | बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता होणार सोडत कार्यक्रम 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उद्या

| बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता होणार सोडत कार्यक्रम

पुणे | महापालिका निवडणुकीसाठी याआधी जाहीर केलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार OBC ना देखील आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडतीने जाहीर होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने दि. २० जुलै, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसुरून  राज्य निवडणूक आयोगाने दि.२२/०७/२०२२ रोजी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी जागा राखून ठेवणे बाबत आदेशित केलेले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवल्यामुळे या आरक्षणात कोणताही बदल होत नसल्यामुळे सदर आरक्षण दि. ३१ मे, २०२२ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार राहील. दि. ३१ मे, २०२२ रोजी काढण्यात आलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण याद्वारे रद्द करण्यात येत आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडतीने
जाहीर होणार आहे.

त्यानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला) यांचेकरिता जागा आरक्षित करण्यासाठी शुक्रवार, दि. २९/०७/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा. बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे आरक्षण सोडत आयोजीत करण्यात आलेली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या एकूण ५८ प्रभागांपैकी ५७ प्रभाग हे त्रिसदस्यीय असून एक प्रभाग क्र. १. हा द्विसदस्यीय आहे. महाराष्ट्र शासनाने दि. १५/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पद्धत) नियम, २०२१ मधील तरतुदीनुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार एकूण जागा 173 आहेत. यातील 87 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर 86 या सर्वसाधारण आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण जागा 23 आहेत. त्यातील 12 जागा महिलांसाठी तर 11 जागा सर्वसाधारण आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकूण दोन जागा आहेत. यामध्ये महिलांसाठी 1 आणि सर्वसाधारण 1 जागा आहे. OBC साठी 46 जागा आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 23 आरक्षित आहेत तर उर्वरित 23 या सर्वसाधारण आहेत. तर सर्वसाधारण या 102 जागा आहेत. त्यामध्ये 51 महिलांसाठी आरक्षित आहेत तर 51 या सर्वसाधारण साठी आहेत.

Reservation | PMC Election | महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर  | ओबीसी आरक्षणाने गणिते बदलली 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

| ओबीसी आरक्षणाने गणिते बदलली

पुणे, नवी मुंबई, वसई-विरारसह 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 29 जुलै रोजी होणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याआधी सोडत काढण्यात आली होती. मात्र ओबीसी आरक्षणामुळे नव्याने सोडत काढण्यात येत आहे. यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे.

आणि ज्याअर्थी, मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका (सिव्हील) १९७५६/२०२१ मध्ये दि. २० जुलै, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाने संदर्भाधीन आदेशान्वये महानगरपालिकांच्या सदस्य संख्या प्रभाग रचना व आरक्षण याबाबतचे दि. २८ डिसेंबर, २०२१ चे आदेश सुधारीत केले आहेत. त्यास अनुसरुन आता समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात मात्र एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही या मर्यादेत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवावयाच्या आहेत. या सुधारणेनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला) अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) यांच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र सर्वसाधारण महिलांची सोडत रद्द करून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांची सोडत नव्याने काढणे आवश्यक आहे.

दरम्यान, यासाठी आरक्षण आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
| (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट- ड (मराठी) व परिशिष्ट-इ (इंग्रजी) मधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिध्द करणे. (त्याची स्थानिक वर्तमानपत्र, वेबसाईट, सूचना फलक इ. वर प्रसिध्दी द्यावी.) यासाठी 26 जुलै तारीख देण्यात आली आहे. तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढणे, यासाठी 29 जुलै तारीख देण्यात आली आहे.

सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे त्याची स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी प्रसिद्धी द्यावी यासाठी 30 जुलै  ची मुदत देण्यात आली आहे. तर, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 30 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत  देण्यात आला असून, आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण सोबतच्या परिशिष्ट-ड मधील नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे यासाठी 5 ऑगस्ट ची मुदत देण्यात आली आहे.

PMC Election | Final voter list | अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 21 जुलै पर्यंत अवधी  | राज्य निवडणूक आयोगाचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 21 जुलै पर्यंत अवधी

| राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

पुणे | महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्ष, नागरिक आणि सामाजिक संघटना यांचेकडून 3 जुलै पर्यंत पर्यंत ४२७३ इतक्या मोठ्या संख्येने हरकती व सूचना प्राप्त झालेल्या आहेत. हरकतींबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन, स्थळ पाहणी करून हरकतींचा निपटारा करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणेकामी  राज्य निवडणूक आयोग यांचेकडून 23 जुलै पर्यंत मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली होती. मात्र आयोगाने हा अवधी २१ जुलै पर्यंत दिला आहे. नुकतेच आयोगाने हे आदेश जारी केले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर 3 जुलै पर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा निपटारा करून अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी 9 जुलै रोजी प्रसिद्ध करणेबाबत कळविले होते.. त्यानुसार दि. ३१/०५/२०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या यादीच्या आधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करणेत आली आहे. सदर प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्ष, नागरिक आणि सामाजिक संघटना यांचेकडून दि.०३/०७/२०२२ पर्यंत ४२७३ इतक्या मोठ्या संख्येने हरकती व सूचना प्राप्त झालेल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने ०३/०७/२०२२ रोजीच्या शेवटच्या एका दिवशी १७४७ इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांकडून ५६२ हरकती प्राप्त झालेल्या आहेत.

आयोगाने ०९/०७/२०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणेबाबत कळविले होते. तथापि प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर मोठ्या संख्येने प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करता त्याचप्रमाणे कोविड १९ च्या उपाययोजनेकामी पुणे महानगरपालिकेतील बहुतांश कर्मचारी वर्ग हा कार्यरत असल्याने हरकतींचा निपटारा करणेकामी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे हरकतींबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन, स्थळ पाहणी करून हरकतींचा निपटारा करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणेकामी राज्य निवडणूक आयोग यांचेकडून मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.  प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी बिनचूक व त्रुटीविरहित होणे आणि ती प्रसिद्ध करणेसाठी दि. २३/०७/२०२२ पर्यंत मुदतवाढ मिळणेस विनंती आहे. असे महापालिकेने म्हटले होते. मात्र आयोगाने हा अवधी २१ जुलै पर्यंत दिला आहे. नुकतेच आयोगाने हे आदेश जारी केले आहेत.

PMC Election | प्रभाग रचनेला स्थगिती द्या  | माजी नगरसेवकांची मागणी 

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचनेला स्थगिती द्या

| माजी नगरसेवकांची मागणी

पुणे | महापालिका अंतिम प्रभाग रचना मंजुरी बाबत निवडणूक आयोगाने दोन पत्रे दिली आहेत. ज्यातून संशय घ्यायला जागा निर्माण होत आहे. त्यामुळे आयोगाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि प्रभाग रचना रद्द करावी, अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी केली आहे.

आयोगाला दिलेल्या पत्रानुसार  चोकलीन्गम अहवालाची मागणी आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये केली होती. आयोगाच्या वकिलाने  हायकोर्टामध्ये स्टेटमेंट केल्याप्रमाणे आम्हाला ही कागदपत्र प्राप्त झाली.  या संदर्भामध्ये उल्लेख केलेल्या पत्राची छाननी केली असता
त्यामध्ये प्रभाग क्रमांक 12, 13, 15  आणि 57या प्रभाग रचनेचे राज्य निवडणूक आयोगाची मान्यतानसताना बदल झालेले आढळले ही बाब आम्हाला गंभीर वाटली म्हणून आम्ही महानगरपालिकांच्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यावेळेला त्यांनी आम्हाला असे सांगितले की आमच्या
पातळीवर आम्ही कुठलेही बदल केले नाही.  तर राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला अंतिम प्रभाग रचना मंजुरी बाबत १२ मे रोजी पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२२ / प्र.क्र.६ /का-५ दिनांक १२ मे २०२२ हे पत्र पाठवले आणि त्या पत्राप्रमाणेच आम्ही प्रभाग रचना केली त्या पत्राची प्रत त्यांनी आम्हाला दिली. आम्ही दोन्ही प्रत्र तपासले असता एक गंभीर बाब आमच्या निदर्शनास आली. आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले पत्र व महानगर पालिकेला पाठवलेले पत्र एकाच तारखेचे एकाच जावक क्रमाकाचे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामधील दोन्ही पत्रामधील मजकुरात फरक केला आहे. त्यामध्ये मुख्यता प्रभाग क्रमाक कमी जास्त दाखविण्यात आलेले आहेत.

याबाबत पुणे महानगरपालिकेची व पुणेकर नागरिकांची आणि आयुक्त म्हणून आपली देखील फसवणूक आपलेच अधिकारी अविनाश सणस यांनी केली आहे असे आमचे मत झाले आहे. कारण या दोन्ही पत्रांच्या मध्ये आयुक्त राज्य निवडणूक आयोग यांच्या मान्यतेने असा उल्लेख आहे परंतु आपण कशाला नेमकी मान्यता दिली हे स्पष्ट होत नाही. कारण याच्यामध्ये प्रभागांचे नंबर आणि क्रमांक वेगळे असल्यामुळे हा गोंधळ निर्माण केल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे या अधिकाऱ्याचा मागचा
इतिहास तपासला तर कागदा पात्रांच्या हेराफेरीमध्ये त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे असे फेरफार करून फसवणूक करायची अशी त्यांची मानसिकता आहे असे आमच्या लक्षात आले.

 हे दोन्ही पत्र जे एक पत्र आम्हाला राज्य निवडणूक आयोगाने पाठवलं दुसरं पत्र पुणे महानगरपालिकेचे अधिकाऱ्याने आम्हाला दिलं यातलं कुठलं पत्र खरं आणि खोटं याची शहानिशा आपण करावी तोपर्यंत या प्रभाग रचनेला स्थगिती द्यावी, कारण या पत्राचा परिणाम पुणे शहराच्या प्रभाग रचनेवर होतो आहे आणि अशा प्रकारे फसवणूक करून प्रभाग रचना करणे योग्य नाही. आपण
आपल्या स्तरावर या संदर्भामध्ये पुढच्या आठ दिवसांमध्ये निर्णय करावा.  जर या संदर्भात निर्णय केला नाही तर आपली राज्य निवडणूक आयोग ही संस्था ७४व्या घटनादुरुस्तीच्या नंतर निर्माण झालेली स्वायत्त संस्था आहे त्यामुळे त्या संदर्भातला कायदा राज्य विधिमंडळाने केला आहे त्यामुळे राज्य विधिमंडळाकडे याविरुद्ध दाद मागावी लागेल अन्य दुसरा कुठलाही पर्याय आमच्यासमोर दिसत नाही. त्यामुळे प्रभाग रचनेला स्थगिती द्यावी. या मागण्या आम्ही आपल्याकडे करत आहोत. असे ही पत्रात म्हटले आहे.

Draft Voter List | प्रारूप मतदार याद्यामुळे संभ्रमाचे वातावरण!  | इच्छुकांचे टेन्शन वाढले 

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रारूप मतदार याद्यामुळे संभ्रमाचे वातावरण! 

😐 इच्छुकांचे टेन्शन वाढले 

पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्या करताना एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकणे, काही याद्या गायब होणे असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. धायरी आंबेगाव प्रभाग क्रमांक ५४ मध्ये तर तब्बल १ लाखापेक्षा जास्त मतदारांचा प्रभाग झाल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. या मतदार याद्या दुरुस्त  करण्याची मागणी केली जात आहे. मुळात मतदार याद्या उशिरा प्रसिद्ध केल्या. ज्या केल्या त्यामुळे संभ्रम वाढलाच आले.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती सूचना नोंदविता येणार आहेत. प्रभाग रचना अंतिम झाली तरी ल्याने राजकीय पक्ष, इच्छुकांकडून प्रभागाचा अभ्यास सुरू आहे. ज्या ठिकाणी हक्काचे मतदान आहे त्यासह अवघड भाग कोणता तेथे लक्ष घालत आहेत. पण प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरूर मतदारसंघातील व पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेरील वढू या गावातील १२५ पेक्षा जास्त मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक दोनमध्ये करण्यात आला आहे. अनेक प्रभागाच्या सीमेवरील मतदारांची विभागणी होण्याऐवजी प्रभागाच्या मध्य भागात असलेले मतदार दुसऱ्या प्रभागात टाकले आहेत. प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर येथील सोसायट्यांमधील मतदार प्रभाग क्रमांक १६ फर्ग्युसन महाविद्यालय- एरंडवणे येथे जोडले आहेत. प्रभाग क्रमांक शनिवार पेठे-नवी पेठेतील काही मतदार प्रभाग क्रमांक ५२ सनसिटी-नांदेड सिटीमध्ये टाकले आहेत. एका मतदारयादीत १ हजार ते १२०० मतदार असतात. काही प्रभागात चार ते पाच तर काही प्रभागात १० ते १५ मतदारयाद्या दुसऱ्या प्रभागात केले आहेत. अशा प्रकारे बहुतांश सर्वच प्रभागातील याद्यांमध्ये घोळ झाला आहे. प्रभाग रचनेत आपल्या सोईचा प्रभाग झाला असे वाटणाऱ्या इच्छुकांचे हक्काचे मतदार गायब झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

PMC election 2022 | सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग धायरी-आंबेगाव  | सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या जास्त | प्रारूप मतदारयाद्या जाहीर 

Categories
Breaking News PMC पुणे

सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग धायरी-आंबेगाव

| सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या जास्त

| प्रारूप मतदारयाद्या जाहीर 

पुणे महापालिका निवडणुकीसाठी  प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या यादीनुसार  सहा प्रभागात महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत. या प्रभागात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदारसंख्येत 8 लाख 23 हजार 916 मतदारांची वाढ झाली आहे. तर सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग धायरी-आंबेगाव ठरला आहे.

या मतदार याद्यांवर 1 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. मतदारांनी त्यांची प्रभागनिहाय यादी पाहून नावाची पडताळणी करावी आणि हरकत नोंदवावी असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade PMC) यांनी केले आहे. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत माने (Yashwant Mane PMC) हे देखील उपस्थित होते.

मतदारांनी नोंदविलेल्या हरकती आणि सूचना वर कार्यवाही करून 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. प्रारुप मतदार यादीत महापालिका (Pune Municipal Election) हद्दीबाहेरील गावांतील मतदारांचा समावेश झाला आहे, तसेच दुसऱ्या प्रभागाच्या यादीत नावे समाविष्ट केली गेल्याच्या तक्रारी येत असल्याकडे बिनवडे आणि माने यांचे लक्ष वेधले असता, बिनवडे म्हणाले, या प्रकारच्या त्रुटी दूर करुन बिनचुक मतदार यादी तयार करण्यासाठीच हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या https://www.pmc.gov.in या संकेतस्थळावर आणि क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी पाहण्यास उपलब्ध आहे. (Pune PMC Election 2022)

प्रभागाच्या मतदार यादीत आपले नाव आहे का ? हे तपासून मतदारांनी हरकत (Objection) नोंदवावी. ही हरकत लेखी किवा ऑनलाईन स्वरुपात मतदाराला महापालिकेच्या मुख्य निवडणुक कार्यालय, क्षेत्रीय कार्यालयात नोंदविता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हरकत महापालिकेच्या election@punecorporation.org या ईमेलवर नोंदविता येईल.

मतदाराने नोंदविलेली हरकत निवडणूक कार्यालयाकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवली जाणार आहे. या हरकतीची पडताळणी करण्यासाठी पथक नियुक्त केले आहे. या पथकामध्ये क्षेत्रीय अधिकारी, अभियंता, लिपीक यांचा समावेश असेल. हे पथक प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन हरकतीची पडताळणी आणि कार्यवाही करून दुरुस्ती करणार आहे.

सहा प्रभागात महिला मतदारांची संख्या जास्त


नवीन प्रभाग रचनेनुसार 58 प्रभाग तयार झाले आहे. या प्रभागांची मतदार यादीचे प्रारुप तयार करताना विधानसभा मतदार यादीचा (Assembly Voter List) आधार घेण्यात आला आहे. तसेच निवडणुक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार 31 मे 2022 पर्यंत मतदार नोंदणी केलेल्यांचा समावेश केला आहे. या प्रारूप मतदार यादीनुसार प्रभाग क्रमांक 15 (गोखलेनगर (Gokhale Nagar) – वडारवाडी (Vadarwadi), प्रभाग क्रमांक 16 (फर्ग्युसन कॉलेज (Fergusson College) – एरंडवणे (Erandwane), प्रभाग क्रमांक 17 (शनिवार पेठ (Shaniwar Peth) – नवी पेठ (Navi Peth), प्रभाग क्रमांक 18 (शनिवार वाडा (Shaniwar Wada) – कसबा पेठ (Kasba Peth), प्रभाग क्रमांक 19 (छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम (Chhatrapati Shivaji Maharaj Stadium) – रास्ता पेठ (Rasta Peth), प्रभाग क्रमांक 29 (घोरपडे पेठ उद्यान (Ghorpade Peth Udyan) – महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai) या प्रभागात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या मतदारसंघाचे भवितव्य महीला मतदारांच्या हाती आले आहे. हे सर्व मतदारसंघ शहराच्या मध्यवर्ती भागातील आहेत.

—-

 एकुण मतदार : 34 लाख 58 हजार 714

 पुरुष मतदार : 18 लाख 7 हजार 663

 महीला मतदार : 16 लाख 50 हजार 807

– इतर मतदार : 244

 2017 च्या तुलनेत वाढलेले एकुण मतदार : 8 लाख 23 हजार 916

 2017 च्या तुलनेत वाढलेले पुरुष मतदार : 4 लाख 49 हजार 697

 तर 2017 च्या तुलनेत वाढलेल्या महीला मतदार : 3 लाख 74 हजार 042

 2017 च्या तुलनेत वाढलेले इतर मतदार : 177

 सर्वांत जास्त मतदार असलेला प्रभाग : क्रमांक 54 (धायरी – आंबेगाव) 1 लाख 3 हजार 959

 सर्वात कमी मतदार असलेला प्रभाग : क्रमांक 34 ( मगरपट्टा – साधना विद्यालय) 34 हजार 80

Reservation Lottery | आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी महापालिकेची जय्यत तयारी | अधिकाऱ्यांना वाटून दिली कामे

Categories
Breaking News PMC पुणे

आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी महापालिकेची जय्यत तयारी 

: अधिकाऱ्यांना वाटून दिली कामे 

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी सुरु आहे.  प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे काढली जाणार आहे. ३० मे रोजी रंगीत तालिम होणार आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी आज गणेश कला येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. दरम्यान कुणी काय काम करायचे याची विभागणी देखील करण्यात आली आहे.

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. ५८ प्रभागात १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये २३ जागा अनुसूचित जाती तर २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असतील. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण असणार आहे. तीन सदस्यांच्या प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन महिला असणार आहेत. सोडतीसाठी स्वारगेट येथील गणेश कला क्रिडामंच हे ठिकाण निश्‍चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. आरक्षणाची सोडत चिठ्ठ्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले आहे.

Reservation | PMC Election | पुणे महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर  | निवडणूक आयोगाने निश्चित केला कार्यक्रम 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

: निवडणूक आयोगाने निश्चित केला कार्यक्रम

पुणे आणि पिंपरी सहित १३ महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे 2022 रोजी होणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढणे यासाठी 31/5/2022 ची वेळ देण्यात आली आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

यासाठी आरक्षण आणि सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसुचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढण्यासाठी सोबतच्या परिशिष्ट-ड (मराठी)व परिशिष्ट-इ इंग्रजीमधील नमुन्यात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे. त्याआधी स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी 27/5/2022 पर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढणे यासाठी 31/5/2022 ची वेळ देण्यात आली आहे.

सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे त्याची स्थानिक वर्तमानपत्रं, वेबसाईट, सूचना फलक इत्यादी प्रसिद्धी द्यावी यासाठी 01.06.2022 ची मुदत देण्यात आली आहे. तर, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 जून ते 6 जून पर्यंत देण्यात आला असून, आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण सोबतच्या परिशिष्ट-ड मधील नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे यासाठी 13 जून 2022 ची मुदत देण्यात आली आहे.