Draft Voter List | जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध | ९ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

Draft Voter List | जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध | ९ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

Draft Voter List | छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr Rajesh Deshmukh) यांच्या हस्ते जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार याद्या (Draft Voter List) आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी ९ डिसेंबरपर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, तहसीलदार राधिका हावळ बारटक्के, उज्ज्वला सोरटे, शीतल मुळे, नायब तहसीलदार सिताकांत शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, समाजातील सर्व घटकांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्याकरीता भारत निवडणूक आयोगाच्यावतीने काम करण्यात येत आहे. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार यादीमध्ये वारंवार बदल होत असतात. त्यानुसार जिल्ह्यात मतदार यादी शुद्धीकरणाची मोहीम सुरू आहे. गेल्या तीन वर्षात मतदार यादीत नाव, पत्ता, छायाचित्रे दुबार असणाऱ्या, मयत, स्थलांतरीत मतदारांची सुमारे आठ लाखापेक्षा अधिक नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सहकार्याने १ ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मयत व्यक्ती, गावातून कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.

महाविद्यालयांना ‘उत्कृष्ट मतदार मित्र’ पुरस्कार

शहरी भागात मतदानाची टक्केवारी विचारात घेता युवा मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाविद्यालयस्तरावरही शिबारांचे आयोजन करण्यात येत आहेत. ‘उत्कृष्ट मतदार मित्र’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून १०० टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचा उपक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मागील निवडणुकीच्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरातील ३६ मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

एकूणच युवा मतदारांची वाढ तसेच मयत मतदारांची नावे वगळून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी सर्व ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय सहायकाची (बीएलए) नियुक्ती करुन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर ९ डिसेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दावे व हरकती सादर येणार आहे.

प्राप्त दावे व हरकतीवर २६ डिसेंबर २०२३ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर, मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्राच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादी व यादीच्या सीडीचे वितरण करण्यात आले.

जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ लाख मतदारांची वाढ
जिल्ह्यात ५ जानेवारी २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ७९ लाख ५१ हजार ४२० तर २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ८० लाख ७३ हजार १८३ इतकी आहे. जानेवारी ते ऑक्टोबर याकालावधीत १ लाख २१ हजार ७६३ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे.

पुरुष मतदारांची संख्या जानेवारीमधील ४१ लाख ६६ हजार २६५ च्या तुलनेत ऑक्टोबरच्या यादीत ४२ लाख २५ हजार ९१८ इतकी आहे. तर जानेवारीमध्ये स्त्री मतदारांची संख्या ३७ लाख ८४ हजार ६६० इतकी तर ऑक्टोबरमध्ये संख्या ३८ लाख ४६ हजार ७४१ इतकी आहे.

जानेवारीच्या मतदार यादीमध्ये १ हजार पुरुषांच्या मागे ९०८ तर ऑक्टोबरमध्ये १ हजार पुरुषांमागे ९१० स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी समुदायाच्या संख्येत ४९५ वरुन ५२४ इतकी वाढ झाली आहे.

जिल्ह्याच्या १८ ते १९ वयोगटाची लोकसंख्या ३.१३ टक्के अर्थात ३ लाख ७१ हजार ३ आहे परंतु ऑक्टोबरच्या यादीनुसार यापैकी केवळ ०.६७ टक्के म्हणजेच ७९ हजार ३६२ युवकांची मतदार नोंदणी झाली आहे. २० ते २९ वयोगटाची लोकसंख्या २३.८६ टक्के अर्थात २८ लाख २७ हजार ३७६ इतकी आहे. मात्र, ऑक्टोबरच्या यादीनुसार यापैकी केवळ ११.५१ टक्के म्हणजेच १३ लाख ६३ हजार ६२४ मतदार नोंदणी झाली आहे.

Zilla Parishad and Panchayat Samiti elections | जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

 

मुंबई| राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या 29 जुलै 2022 रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.

Final Voter List | अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 23 जुलै पर्यंत अवधी द्या  | महापालिकेची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी 

Categories
Breaking News PMC पुणे

अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी 23 जुलै पर्यंत अवधी द्या

| महापालिकेची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

पुणे | महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्ष, नागरिक आणि सामाजिक संघटना यांचेकडून 3 जुलै पर्यंत पर्यंत ४२७३ इतक्या मोठ्या संख्येने हरकती व सूचना प्राप्त झालेल्या आहेत. हरकतींबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन, स्थळ पाहणी करून हरकतींचा निपटारा करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणेकामी  राज्य निवडणूक आयोग यांचेकडून 23 जुलै पर्यंत मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे.

याबाबत महापालिकेकडून निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर 3 जुलै पर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा निपटारा करून अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी 9 जुलै रोजी प्रसिद्ध करणेबाबत कळविले आहे. त्यानुसार दि. ३१/०५/२०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या यादीच्या आधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करणेत आली आहे. सदर प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्ष, नागरिक आणि सामाजिक संघटना यांचेकडून दि.०३/०७/२०२२ पर्यंत ४२७३ इतक्या मोठ्या संख्येने हरकती व सूचना प्राप्त झालेल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने ०३/०७/२०२२ रोजीच्या शेवटच्या एका दिवशी १७४७ इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांकडून ५६२ हरकती प्राप्त झालेल्या आहेत.

आदेशामध्ये दि.०९/०७/२०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणेबाबत कळविले आहे. तथापि प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर मोठ्या संख्येने प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करता त्याचप्रमाणे कोविड १९ च्या उपाययोजनेकामी पुणे महानगरपालिकेतील बहुतांश कर्मचारी वर्ग हा कार्यरत असल्याने हरकतींचा निपटारा करणेकामी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे हरकतींबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन, स्थळ पाहणी करून हरकतींचा निपटारा करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणेकामी राज्य निवडणूक आयोग यांचेकडून मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. उपरोक्त बाबींचे अवलोकन होऊन तसेच प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीवर प्राप्त झालेल्या मोठ्या प्रमाणावरील हरकतींचा विचार करता त्या सर्व हरकती व सूचनांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, निपटारा होऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी बिनचूक व त्रुटीविरहित होणे आणि ती प्रसिद्ध करणेसाठी दि. २३/०७/२०२२ पर्यंत मुदतवाढ मिळणेस विनंती आहे. असे महापालिकेने म्हटले आहे.

Draft Voter List | महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

प्रारूप मतदारयादी | हरकती सूचनांसाठी दोन दिवसाचा अवधी वाढवला | 3 जुलै पर्यंत दाखल करू शकता हरकती

| राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

पुणे | महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र यात खूप चुका आहेत. त्यामुळे हरकती सूचना दाखल करण्यासाठी जास्तीचा वेळ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार दोन दिवसाचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. 3 जुलै पर्यंत हरकती दाखल करता येऊ शकतात. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

| असे आहेत आदेश

राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी दिलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार  २३ जून, २०२२ ते १ जुलै, २०२२ या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून  ९ जुलै, २०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावयाची आहे. मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची वेळ वाढवून मिळण्याबाबत मागणी होत आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेल्या टू व्होटर अॅपच्या माध्यमातून देखील हरकती व सूचना दाखल होत
आहेत. यास्तव, सदर १४ महानगरपालिकांकरिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याचा अखेरचा दिनांक १ जुलै, २०२२ ऐवजी ३ जुलै, २०२२ असा सुधारित करण्यात येत आहे. मात्र मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करण्याच्या दिनांक ९ जुलै, २०२२ हाच राहील.  ३ जुलै, २०२२ रोजी रविवारची सुट्टी असली तरी हरकती व सूचना दाखल करुन घेण्याच्या अनुषंगाने योग्य ती व्यवस्था महानगरपालिकेने करावी तसेच हरकती व सूचना दाखल करण्याच्या सुधारित
दिनांकास योग्य ती प्रसिध्दी महानगरपालिका क्षेत्रात देण्यात यावी.

Draft Voter List | प्रारूप मतदार याद्यामुळे संभ्रमाचे वातावरण!  | इच्छुकांचे टेन्शन वाढले 

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रारूप मतदार याद्यामुळे संभ्रमाचे वातावरण! 

😐 इच्छुकांचे टेन्शन वाढले 

पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्या करताना एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकणे, काही याद्या गायब होणे असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. धायरी आंबेगाव प्रभाग क्रमांक ५४ मध्ये तर तब्बल १ लाखापेक्षा जास्त मतदारांचा प्रभाग झाल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. या मतदार याद्या दुरुस्त  करण्याची मागणी केली जात आहे. मुळात मतदार याद्या उशिरा प्रसिद्ध केल्या. ज्या केल्या त्यामुळे संभ्रम वाढलाच आले.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती सूचना नोंदविता येणार आहेत. प्रभाग रचना अंतिम झाली तरी ल्याने राजकीय पक्ष, इच्छुकांकडून प्रभागाचा अभ्यास सुरू आहे. ज्या ठिकाणी हक्काचे मतदान आहे त्यासह अवघड भाग कोणता तेथे लक्ष घालत आहेत. पण प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरूर मतदारसंघातील व पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेरील वढू या गावातील १२५ पेक्षा जास्त मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक दोनमध्ये करण्यात आला आहे. अनेक प्रभागाच्या सीमेवरील मतदारांची विभागणी होण्याऐवजी प्रभागाच्या मध्य भागात असलेले मतदार दुसऱ्या प्रभागात टाकले आहेत. प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर येथील सोसायट्यांमधील मतदार प्रभाग क्रमांक १६ फर्ग्युसन महाविद्यालय- एरंडवणे येथे जोडले आहेत. प्रभाग क्रमांक शनिवार पेठे-नवी पेठेतील काही मतदार प्रभाग क्रमांक ५२ सनसिटी-नांदेड सिटीमध्ये टाकले आहेत. एका मतदारयादीत १ हजार ते १२०० मतदार असतात. काही प्रभागात चार ते पाच तर काही प्रभागात १० ते १५ मतदारयाद्या दुसऱ्या प्रभागात केले आहेत. अशा प्रकारे बहुतांश सर्वच प्रभागातील याद्यांमध्ये घोळ झाला आहे. प्रभाग रचनेत आपल्या सोईचा प्रभाग झाला असे वाटणाऱ्या इच्छुकांचे हक्काचे मतदार गायब झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

PMC Election | पुणे मनपा निवडणुक |  प्रारूप मतदारयादी 23 जूनला होणार,  | मतदार 1 जुलैपर्यंत हरकती मांडू शकतात

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे मनपा निवडणुक |  प्रारूप मतदारयादी 23 जूनला होणार,

| मतदार 1 जुलैपर्यंत हरकती मांडू शकतात

| सूचना आणि हरकतींचा विचार करून 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार

 पुणे | महानगरपालिकेचा (PMC) निवडणूक विभाग आगामी  निवडणुकांसाठी मतदार यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि त्याबाबत सूचना आणि हरकती मागवणार आहे.  मतदार 23 जून ते 1 जुलै या कालावधीत आपल्या संबंधित समस्यांचे निराकरण करू शकतात.
 “31 मे पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे आधीच नावनोंदणी केलेल्या पात्र मतदारांना मतदार यादीत त्यांचा समावेश सत्यापित करण्याची संधी मिळेल.  त्यांना काही समस्या असल्यास ते त्यांचे आक्षेप किंवा सूचना मांडू शकतात,” असे पीएमसी निवडणूक विभागाचे  यशवंतराव माने यांनी सांगितले.
 ते म्हणाले, प्रारूप मतदार यादी २३ जून रोजी पीएमसी वेबसाइट, प्रभाग कार्यालये आणि निवडणूक विभाग कार्यालयावर प्रसिद्ध केली जाईल.  “नागरिकांना त्यांच्या नावाची पडताळणी करता येईल आणि त्यांना कोणतीही कारकुनी चूक आढळल्यास किंवा दुसर्‍या प्रभागाच्या मतदार यादीत त्यांचे नाव आढळल्यास ते त्यांचा आक्षेप नोंदवू शकतात. निवडणूक विभाग आवश्यक ते बदल करेल.
 शिवाय, पीएमसीने तयार केलेल्या मतदार यादीतून नाव गहाळ आहे, परंतु भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत ते अस्तित्वात असल्याचे मतदारांच्या लक्षात आल्यास, त्यांनी आक्षेप नोंदवावा, अशी नावे जोडली जातील, असेही ते म्हणाले.
 ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचे आढळून आले, त्यांची खरी चिंता आहे, असे माने म्हणाले.  “मतदारांनी प्रारूप मतदार यादीतून जावे आणि त्यांचे नाव आणि मतदार क्षेत्राची पडताळणी करावी जेणेकरून त्यांना त्यांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करता येईल,” ते पुढे म्हणाले.  सूचना आणि हरकतींचा विचार करून 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 राज्य निवडणूक आयोगाच्या मते, या वर्षी 1 जानेवारी रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक भारतीय निवडणूक आयोग (ECI) मध्ये नावनोंदणी करण्यास पात्र आहेत.  तथापि, नागरी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी, 31 मे पूर्वी ECI च्या मतदार यादीत नाव नोंदवावे लागेल.
 2011 च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या 35,56,824 आहे, ज्यामध्ये 4,80,017 अनुसूचित जाती आणि 41,561 अनुसूचित जमाती आहेत.  पीएमसीमध्ये 57 तीन सदस्यीय निवडणूक पॅनेल आणि एक दोन सदस्यीय निवडणूक पॅनेलमधून 173 नगरसेवक निवडून येणार आहेत.  एससी कोट्यातून 23 आणि एसटी कोट्यातून दोन नगरसेवक असतील.  राज्यातील नागरी संस्थांमध्ये महिलांसाठी असलेल्या ५० टक्के आरक्षणानुसार १७३ नगरसेवकांपैकी ८७ महिला असतील.